Tuesday, 9 May 2017

हिमाचल गाथा - भाग ५



काळ बदलला पण तो काळ या हिमाचलला काही बदलू शकला नाही, याच्या खुणा आम्हाला ठायी ठायी दिसत होत्या. पारंपारिक वेश-केशभूषा... पूर्ण बाह्यांचा जाडसर कोट आणि खाली सलवार. हा कोट ३/४ शरीर व्यापेल एवढा लांब. नाहीतर एक जाड चादर संपूर्ण शरीराला गुंडाळावी असा पेहराव. डोक्याला एखादं कापड गुंडाळलेलं. पायात गमबूट आणि मोजे. अगदी बूट नसले तरी पाय पूर्ण झाकला जाईल असे साधे बूट घातलेले असायचे. पुरुषांचा पेहराव याच आसपासचा, सलवारीच्या ऐवजी पँट. बायकांचा शृंगार असा काहीच नाही, टिकली आणि कानात एखादं छोटंसं कानातलं असलं तरंच. यांच्याकरता फॅशन ही यातच फिरते आणि कोटाच्या आत या बायका जे काही घालतात ते फारसं दिसत नाही. हिमाचल फिरायला येणाऱ्या पर्यटकांकडे नानाविध प्रकारची फॅशन दिसेल पण तीच फॅशन या इथल्या स्थानिकांपर्यंत अजून तरी पोहोचलेली नाही आणि तिकडचा निसर्ग करो ही लोकं ही अशीच राहोत, आधुनिकतेचा अजिबातच स्पर्श न झालेली... ही लोकंच अशी त्यामुळे यांचं हिमाचलही असंच सरळ साधं आणि शुद्ध नैसर्गिक...

या अशाच सात्विक मनालीतून आमची गाडी वशिष्ठ मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोहोचली. पायथ्याशी अशासाठी कारण अजून एक चढण इथे आमची वाट पहात होतं. आता इथे आम्हाला पायीच जायचं होतं, इथे रिक्षा नाहीत. अगदी मनू महर्षीसारखं उभं चढण नसलं तरी हे चढणही चांगलंच दमवणारं. वशिष्ठ नावाचं एक अतिशय छोटं गाव आणि त्यातून हा रस्ता चढून आम्हाला मंदिरापर्यंत जायचं होतं. खाद्य पेयांची छोटी छोटी दुकानं, घरगुती राहण्याची सोय असलेली घरं, स्थानिक वस्तूंची दुकानं अशी दोन्ही बाजूला एकमेकांना खेटून उभी होती. या मंदिराकडे जाण्यासाठी गर्दी मात्र चांगलीच आणि त्यामुळे आजूबाजूच्या खाण्यापिण्याच्या दुकानांमध्येही बऱ्यापैकी वर्दळ. आम्ही आपले हुह...हुह... करत चाललो आहोत आणि चार चाकी गाड्या बिनधास्त त्याच रस्त्याने वर जाताना दिसत होत्या. हाच अनुभव या आधी हिडींबा आणि मनू मंदिरांच्या इथे आला होता. आपला ड्रायव्हर चढण चढून वर येण्याचं टाळत आहे हे लक्षात आल्याने माझी चिडचिड सुरु झाली पण निदान आत्ता तरी या वशिष्ठ मंदिरापर्यंत चढून जाणं भाग होतं. सगळी गर्दी दमत भागत वर चालली होती आणि तिच्याबरोबर आम्हीही... तेवढ्यात अचानक आम्हाला मागून कोणीतरी मराठीत गप्पा मारत येत असल्याचं जाणवलं. आम्ही ज्यांना मागे टाकत पुढे जात होतो ते ही मराठीच... दमलेलं कुणी कुठली रिक्षा दिसली तर बघावी म्हणून रिक्षेला शोधणारेही मराठीच. एखाद दुसरं जोडपं असेल अमराठी किंवा अगदी किरकोळ अपवाद सोडले तर तिथे आमच्या आजूबाजूला सगळे मराठीच मराठी. कुठे चार जणं आले होते तर कुठे मोठा समूह आला होता पण सगळे मराठीच. आम्ही दोघे एकमेकांशी बोलायचो तेव्हा आमच्या शेजारचे चमकून आमच्याकडे बघायचे नाहीतर ही अशी चमकून बघण्याची क्रिया कधी आमच्याकडून घडायची. आजूबाजूला असलेली बियास दरी, तिच्यावर असलेले बर्फाने नटलेले डोंगर, खालून वाहणारी बियास नदी, त्याच रस्त्यावर आजूबाजूला असलेली स्थानिकांची दुकानं या सगळ्या गोष्टी आम्हाला थेट महाराष्ट्रात असल्याचा भास होऊ देत नव्हत्या नाहीतर एखाद्या कुठल्या महाराष्ट्रातल्या दैवताच्या दर्शनासाठी आम्ही सगळे वर जात आहोत असं वाटावं इतकं मराठीमय वातावरण तिथे होतं.

हश्श हुश्श करत आम्ही वरती वशिष्ठ मंदिराच्या बाहेर येऊन पोहोचलो. दैवी निसर्गाची या परिसरावरही असीम कृपा. आता या निसर्गाची मी प्रत्येक वेळी शब्दात तरी कशी मांडणी करू ! जगातल्या कुठल्याच भाषेचा शब्द साठा या निसर्गाचं वर्णन करू शकेल एवढा श्रीमंत नाही. काही सौंदर्य शब्दातीत असतात आणि अशा ठिकाणी शब्दांची हार होते हे आपण प्रामाणिकपणे मान्य करावं. सप्तसिंधूतली ही एक नदी व्यास किंवा बियास, हिला पाहिलं की जाणवतं की आपल्या पुराणात या सप्तसिंधूंना एवढं महत्त्व का ! कुठून स्वर्गातून आत्ताच पृथ्वीवर आलीय असं वाटावं एवढी सुंदर ही नदी. तिच्या आजूबाजूला इतस्तः पसरलेले पांढरटसर खडक तिच्या सौंदर्यात मोलाची भर टाकतात आणि तिच्या पात्राच्या शेजारी असणारी झाडं तिचा शृंगार करतात. साक्षात दैवी स्पर्श लाभलेल्या हिमाचलमधून ती वाहते आणि त्यामुळे तर ती एखाद्या देवतेप्रमाणेच भासते. हे मी सारखं दैवी, दैवी स्पर्श लिहिते याची जाणीव तिथे असताना जाणवते. एखादा उच्च रक्तदाबाचा त्रास असलेला माणूस या वातावरणात आला तर त्याचा हा दाब सामान्य होईल, अती चिडखोर माणसाचं चित्त इथे येऊन शांत होईल आणि हृदय विकार असलेला रोग्याला इथे येऊन हलकं वाटेल. सामान्य माणसाची मनःस्थिती उच्च अवस्थेत पोहोचेल आणि सर्व बाजूंनी हरलेल्या माणसाला इथे जगण्याची नवी उमेद मिळेल. ही बियास काय किंवा बाकीच्या तिच्या पंचनदमधल्या बहिणी काय, यांचं पात्र अतिशय स्वच्छ दिसणार. कुठलीही घाण, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या इथे दिसणार नाहीत. या राज्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे आणि नदीच्या पत्रात कुठलंही प्लास्टिक टाकलं तर दंड आहे त्यामुळे या नद्यांना मुक्तपणे वाहता येतं. दंड आहे म्हणून ही स्वच्छता नसावी कारण इथली एकंदर लोकंच स्वच्छतेच्या बाबतीत शिस्तप्रिय असावीत असं इथे जाणवतं.
वशिष्ठ मंदीर परिसर

दाही दिशांना पावलापावलावर निसर्ग जिथे आपल्या सौंदर्याची छाप सोडतो असं हे वशिष्ठ मंदीर आणि गरम पाण्याचं कुंड... हे मंदीर उंचावर आहे आणि तिथून खाली बियास नदी वाहते. विश्वामित्र ऋषींनी वशिष्ठ ऋषींच्या मुलांना मारल्यावर तीव्र दुःखात वशिष्ठ ऋषी याच ठिकाणी विपाशा (व्यास/बियास नदीचं प्राचीन नाव) नदीत देहाचा त्याग करण्यासाठी आले. त्यावेळी नदीने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी इथे याच स्थानी घोर तपश्चर्या केली आणि मुलांच्या मृत्यूमुळे आलेल्या आत्मग्लानीतून ते मुक्त झाले. नंतर याच स्थानी ब्रह्मर्षी या पृथ्वीवरून अंतर्धान पावले. त्यामुळे या वशिष्ठ गावाला आणि या मंदिराच्या स्थानाला विशेष महत्त्व आहे.

श्रीराम यांनी रावणाचा वध केला. रावण एक ब्राह्मण होता, त्यामुळे प्रभू श्रीरामांना ब्रह्महत्येचं पाप लागलं. प्रभू श्रीरामांनी वनवास संपवून अयोध्येला परतल्यावर या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी अश्वमेध यज्ञाचं आयोजन केलं आणि त्यावेळी रघुवंशाचे कुलगुरू ब्रह्मर्षी वशिष्ठ याच स्थानी तपश्चर्या करत होते. इतर ऋषींच्या सल्ल्याने रामाने लक्ष्मणाला कुलगुरू वशिष्ठ यांना शोधण्याचं काम दिलं आणि लक्ष्मणाने याच ठिकाणी वशिष्ठ ऋषींना शोधून काढलं. त्यावेळी थंडीचे दिवस होते आणि लक्ष्मणाने पाहिलं की आपल्या गुरूंना गार पाण्याने स्नान करावं लागतंय. आपल्या गुरूंना स्नानासाठी गरम पाणी मिळावं म्हणून लक्ष्मणाने तिथे जमिनीत अग्नी बाण मारला आणि तिथून गरम पाण्याची धार बाहेर आली. वशिष्ठ ऋषी महान तपस्वी होते, स्नानासाठी गरम/गार पाणी या सगळ्या भावनांच्या ते पलीकडे गेलेले होते त्यामुळे त्यांना गरम पाण्याची गरज नव्हती. हेच ते लक्ष्मणाच्या बाणामुळे झिरपणारे गरम पाण्याचे झरे आणि त्यामुळे तयार झालेलं गरम पाण्याचं कुंड. असं म्हणतात की आपल्यासाठी लक्ष्मणाने केलेली गरम पाण्याची सोय पाहून ऋषींनी त्याचा प्रवासाचा थकवा जावा म्हणून तिथल्याच गरम पाण्यात स्नान करण्यास सांगितलं आणि त्यानंतर आशीर्वाद दिला की जो कोणी या ठिकाणी स्नान करेल त्याचा थकवा लगेच नष्ट होईल आणि त्वचा रोगही नष्ट होतील. कुल्लूचे सगळे देव इथे दरवर्षी येऊन स्नान करतात असंही म्हटलं जातं.  

तिथे बाहेरच एक शंकराचं देऊळ आहे पण वशिष्ठ ऋषींच्या मंदिराच्या ओढीने आलेलो आम्ही आधी आत महर्षींच्याच मंदिरात दर्शनासाठी गेलो. पादत्राणं काढण्यासाठी तिथे विनामूल्य चप्पलस्टँड चालवला जातो. एवढी गर्दी होती तिथे पण कुठे काही गडबड नाही की काही नाही. मंदिराच्या बाहेर दर्शनाची रांग होती. त्या रांगेत उभे राहिलो.
वशिष्ठ मंदीर
खास हिमाचली शैलीत बांधलेलं मंदीर. आतून दगडी आणि वरून लाकडाचं कोरीव काम केलेलं. ही मंदिरं मूळची दगडीच पण आता बाहेरून ती लाकडाने झाकून टाकलेली आहेत. या भागात प्रचंड थंडी पडते आणि दगडी मंदिरं तर आतून जास्त गार असतात त्यामुळे या भागात आता लाकडी मंदिरं बघायला मिळतात. काही मंदिरांचं काम पूर्ण झालंय तर काही मंदिरांचं हे काम चालू आहे. लाकडी बांधकाम असेल तर थंडीच्या दिवसातही आत ऊब जाणवते. या हिमाचलच्या लोकांनी स्वतःची अशी ही कला विकसित केलेली आहे. ही कला किती जुनी हे काही माहीत नाही पण ही कला आहे मात्र फार सुंदर. अगदी बारीक नक्षीकामाची ही कला मन मोहून घेते. मंदिरातल्या कमानी असोत नाहीतर खांब, यावर केलेलं अगदी बारीक कोरीव काम बघणाऱ्याला काही क्षण तिथेच स्तब्ध करतं. या मंदिरांना कळस नसतो. वरती त्रिकोणी आकाराचं छप्पर असतं. त्या छपरावर एक प्रकारच्या फरश्या ओळीने बसवलेल्या असतात. या त्रिकोणाच्या दोन रेषांची कड नाजूक दगडी नक्षीने रेखाटलेली असते आणि त्याला खाली लाकडी छोट्या छोट्या झिरमिळ्या असतात. इथे स्थानिकांची घरंही अशीच बाहेरून लाकडी आणि अशाच छपरांची बघायला मिळाली.

या रांगेत आमच्या पुढे मागे सगळे मराठी. एक मोठा समूह होता आणि खूप मोठा दौरा त्यांनी आखलेला होता असं त्यांच्या बोलण्यावरून कळत होतं. नुकतेच ते वैष्णौ देवीचं दर्शन घेऊन परतले होते आणि या समूहाकडे लक्ष देण्याचं काम विशेषतः तरुण मुले करत होती. महाराष्ट्रापासून इतक्या लांब भेटलेलो आम्ही मराठी त्या रांगेत उभे राहून कधी एकाच समूहाचे बनलो हे आम्हाला आणि त्यांनाही कळलं नाही. इतक्या लांब एखादं कोणी मराठी भेटलं तर एवढा आनंद होतो आणि इथे तर मराठी बहुसंख्येने होते. बाहेर लिहिलं होतं की मंदिरात छायाचित्र घेण्यास मनाई आहे त्यामुळे वशिष्ठ ऋषींच्या दगडी मूर्तीचं छायाचित्रण मी केलं नाही. खूप प्राचीन मंदिरात आल्याचा भास त्या मंदिरात होत होता. एका महान ब्रह्मर्षींनी केलेल्या घोर तपश्चर्येने या स्थानाला पावन केलं आणि तिथे आम्हाला जायला मिळालं. गरम पाण्याचं कुंड बघावं, अगदीच काही नाही तर निदान त्या पाण्याने पाय तरी धुवावेत म्हणून निघालो. पुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी वेगवेगळी कुंड बांधली आहेत. महिलांच्या कुंडाच्या ठिकाणी फक्त डोकावून पाहिलं आणि मनात शिव शिव करत तिथूनच मी परत फिरले. चप्पलस्टँडकडे गेलो तर मंदिरात येणाऱ्या लोकांच्या वहाणांकडे लक्ष देणारा तिथे मार्गदर्शकाचं कामही करत होता. त्याने आम्हाला सांगितलं, राम मंदिरात पण जा. तिथेच थोड्या पायऱ्या चढून वर श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचं एक मंदीर आहे.
तिथे गेलो तर तिथेच जमिनीवर पसरलेला बर्फ दिसला, वर छपरावरही बर्फ आणि त्यातून पडणारी बर्फाच्या पाण्याची संततधार. आता हा असा बर्फ दिसणं आमच्यासाठी नवीन नव्हतं पण या अशा जमिनीवर पडलेल्या बर्फाचं प्रत्येक वेळी नव्याने कुतूहल मात्र नक्की वाटायचं. त्या बर्फाच्या मागेच एक दरवाजा होता, लाकडी आणि त्याच हिमाचली शैलीत छान नाजूक नक्षीकाम केलेला.

हे मंदिरही हिमाचली शैलीत बांधलेलं. लाकडातलं अतिशय बारीक कोरीव काम मन थक्क करत होतं. या कोरीव कामात कोरलेल्या अवधी बोलीतल्या ओळी लक्ष वेधून घेत होत्या. तिथेच रामभक्त मारुतीची एक भावमुद्राही कोरलेली होती. या मंदिराला बाहेरून लाकडी आवरण देण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नसल्याने मूळचं दगडी मंदिरही तिथे बघायला मिळालं.

श्रीराम मंदीर

राम मंदीर कलाकुसर

बाहेर आलो. खाली वशिष्ठ मंदीर, समोर पसरलेले हिमाच्छादित डोंगर, खालून वाहणारी बियास... एकंदर वातावरण कसं अगदी मुग्ध करणारं होतं... आणि अचानक मला एक आठवण झाली. सिनेमात असतं ना नायक किंवा नायिकेला एखाद्या परक्या ठिकाणी गेल्यावर मागच्या जन्मातलं काहीतरी आठवतं, वगैरे. तसं काहीसं मला तिथे उभं राहून समोरचं ते मुग्ध करणारं दृश्य बघून झालं. एका पहाटे एक स्वप्न पाहिलं होतं. मी एका अनोळख्या ठिकाणी आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाण. मी एका सुंदर परिसरात चालत आहे आणि अचानक मी एका मंदिरात शिरते. तिथे गरम पाण्याचं कुंड असतं. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि डावीकडे मंदीर. मागे सुरेख बर्फाच्छादित डोंगर. या मंदिरातल्या देवांच्या एकेका मूर्तींचं दर्शन मी घेत आहे हे ही मी स्वप्नात पाहिलं होतं. याबद्दल मी फेसबुकवर लिहिलेलंही होतं. ते स्वर्गीय असं त्या वसिष्ठ मंदिराच्या परिसरातलं दृश्य बघून मला माझं ते स्वप्नच आठवलं आणि वाटलं अगदी सारखं नाही पण स्वप्नातल्या बऱ्याचशा गोष्टी अगदी अशाच आहेत. बर्फाचे डोंगर, डावीकडे मंदीर, उजवीकडे कुंड, सुंदर पुनीत निसर्ग.... स्वप्नातली ती जागा माझ्यासारखी अनोळखी होती, अगदी तंतोतंत जरी नसली तरी बरीचशी अशीच तर होती. तेव्हा वाटलं, आपल्याला स्वप्नाने याच मंदिराचा आभास तर नसेल ना करून दिला ! आणि आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष हजर. हा विचार मनाला सुखावून गेला.

शंकराचं देऊळ
शिव मंदीर - कलाकुसर
बाहेर आलो. शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं राहिलं होतं. ते घेतलं आणि अतिशय समाधानाची पुरचुंडी गाठीशी बांधत परत जायला निघालो. तर तिथेच आम्हाला एक कुत्रं दिसलं. भटकं म्हणाल तर सावधान, असं हे कुत्रं. हेच नाही तर तिथली रस्त्यावरची कुत्री सगळीच धष्टपुष्ट. आपल्याकडची कुत्री कशी बिचारी असतात, माना टाकलेली. कुठला रोग झालेली. विस्कटलेल्या अवस्थेतली... पण इथली सगळीच ऐटबाज कुत्री. जाडजूड, धिप्पाड आणि तब्येतीने एकदम दणकट. इथली हवाच चांगली त्यामुळे इथली साधी रस्त्यावरची कुत्रीही तब्येतीने चांगलीच.. त्या कुत्र्याला जरा कुरवाळलं, फोटो वगैरे काढले आणि परतीच्या मार्गाला लागलो. या कुत्र्यांचे फोटो काढण्याचा मोह मला मनालीत बऱ्याच ठिकाणी आवरला नाहीच. मगाशी चढलेला तो चढ आता उतरायचा होता. थंडी तर होतीच पण आता बरोबर एक प्रकारचं मानसिक समाधानही साथीला होतं. वाटेत एके ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो. मी कॉफीवाली असले तरी त्या कडाक्याच्या थंडीत आलं आणि कुठले कुठले मसाले घालून केलेला चहा प्यायला बरा वाटत होता. त्या चहावाल्याकडे खायचे पदार्थही होते. तिथेच एका मोठ्या तव्यावर बटाटेवड्यासारखं काहीतरी होतं. तो बटाटेवडा नव्हता हे बघून समजत होतं पण आपल्या महाराष्ट्रापासून इतक्या दूर आलेल्या मराठी लोकांना बटाटेवडा खावासा वाटत होता आणि मराठी सारखे सारखे येऊन त्या दुकानदाराला त्या पदार्थाबद्दल विचारत होते. तो होता दहीवड्याचा वडा. हा वडा कुठला आहे हे समजल्यावर मराठी तिथून निघून जात. हे पाहिलं आणि मीच त्या दुकानदाराला म्हटलं की तुम्ही खरं तर बटाटेवडाही ठेवायला हवा, चांगला चालेल. तर त्यावर तो म्हणतो, मी ठेवायचो बटाटेवडा पण महाराष्ट्रातली लोकं सोडून कोणीही त्या बटाटेवड्यात रस दाखवत नव्हतं म्हणून मग बंद केला. तिथे पावभाजीही होती. मग मी विचारलं की पावभाजीला मागणी आहे कारण ती ही महाराष्ट्राचीच...? तर त्यावर तो म्हणतो, हो... पावभाजी इथे चांगली खपते.

आम्ही उतार उतरायला लागलो आणि अचानक थंडी वाढली. तेच ते मगाचचे सगळे दुकानदार, चाटवाले, स्थानिक या सगळ्यांचा निरोप घेत आम्ही पायथ्याशी आलो आणि गाडीपाशी पोहोचल्यावर ड्रायव्हरला मी पहिला प्रश्न विचारला, काय हो हिडींबा, मनू, वशिष्ठ सगळीकडे चारचाकी गाड्या वरपर्यंत येत होत्या, मग तुम्हीच का येत नाही ? त्यावर तो म्हणतो, येतात ना गाड्या वर पण त्या सगळ्या हिमाचल प्रदेशच्या HP वाल्या गाड्या. माझी गाडी पंजाबची PB वाली आहे. मग काय, माझं तोंड बंद....

आता जवळजवळ संध्याकाळ होत आली होती आणि आता आम्ही निघालो तिबेटन मॉनेस्ट्रीकडे, तिबेटच्या लोकांचं बुद्ध मंदीर. हिमाचलची तिबेटी मंदिरं हे माझ्यासाठी विशेष आकर्षण. ही मंदिरं एक तर छानशा निसर्गाच्या जवळ असतात आणि तिथली ती एकापाठोपाठ एक घंटा वाजवत जाण्याची पद्धत याने मनात आणि आठवणीत एक छोटीशी जागा व्यापलीय. मी किती पूर्वी हिमाचलला आले होते ! पण तेव्हा पाहिलेली बुद्ध मंदीरं पुसटशी का होईना माझ्या आजही लक्षात आहेत. हे तिबेटी लोकांचं मंदीर गजबजाटात होतं. मनालीतला गर्दीचा माल रोड आणि याच रस्त्यावर थोडसंच आत हे मंदीर. रस्त्यावरून पाहिलं तर आत एक छानसं मंदीर आहे हे पट्कन लक्षातही येत नाही. गर्दीच्या रस्त्यावर गाड्या पार्क करण्याची दोन तीन मजली जागा आहे आणि या जागेच्या मागे आहे हे मंदीर. म्हटलं तर गजबजाटात पण म्हटलं तर शांत. आजूबाजूला एवढे आवाज आहेत पण त्या परिसरात शिरलं की हळूहळू शांतता तुमचं मन, डोकं व्यापायला लागते. स्वच्छ परिसर, स्वच्छता हा प्रत्येक बुद्ध मंदिराचा पहिला धर्म आणि हे ही मंदीर याला अपवाद नाही. बौद्ध भिख्खूंच्या काही खोल्या आहेत तिथे आणि त्यांना पार करत आम्ही त्या मॉनेस्ट्रीच्या दिशेने जाऊ लागलो. पिवळ्या छताचं हे पॅगोडाच्या आकाराचं मंदीर. स्वच्छ, एकदम शांत. आत गेलो. बुद्धाची अवाढव्य मोठी मूर्ती, काही तिबेटी रंगीत चित्रं. अगदी आवर्जून बघण्यासारखी. तिथे एका बाजूला एक भिख्खू शांतपणे काहीतरी साधना करत बसला होता. काही फुलं, उदबत्त्या नाही की समया, हळद कुंकू नाही, अंगारा, धूप नाही काही नाही. तरीही त्या मंदिरात अगदी शांत वाटत होतं. या बुद्ध मंदिरांचं हे वैशिष्ट्य, इथे हे काहीही नसतं, पण मनाला कमालीचं शांत वाटतं. ती गर्दी नाही, धक्के बुक्के नाहीत, चला चला करत पुढे ढकलणं नाही काही नाही.
एक बुद्धाची काय ती मूर्ती असते, कधी भलीमोठी तर कधी आकारने त्यामानाने छोटी, कधी झोपलेली तर कधी उभी तर कधी बसलेली. या तिबेटी मंदिरात रंगीत चित्रं होती त्यांना थांगकास असं म्हणतात, हे नेपाळी नाव आहे. तिबेटी मंदिरांमध्ये ही अशी चित्रं बघायला मिळतात आणि आपल्या इथल्या प्राचीन लेण्यांमध्ये नुसताच बुद्ध असतो. मी एक अतिशय धार्मिक आणि आपल्या मंदिरांमध्ये, त्यातल्या वेगवेगळ्या सुंदर मूर्तींमध्ये विशेष रस असणारी पण तरीही हिंदू मंदिराचं ठराविक कुठलंही वातावरण नसलेल्या बुद्ध मंदिरांमध्ये गेल्यावर एक प्रकारची मानसिक शांतता अनुभवायला मिळते, हे मी प्रामाणिकपणे कबूल करते. तिथेच वर एक ध्यानधारणा करण्यासाठी जागा होती. आम्ही तिथे पहिल्या मजल्यावर गेलो. मगाशी बुद्धाकडे बघताना मान मागे पाठीला टेकत होती. वरच्या मजल्यावरून कसा तो बुद्ध सरळ रेषेत बघायला मिळाला. तिथे वरतीही काही रंगीत चित्रं रेखाटलेली होती. काहीतरी छान बघायला मिळालं या समाधानात बाहेर आलो. तिथेच डाव्या हाताला एकमेकांना लागून त्या घंटा ठेवलेल्या होत्या. त्या वाजवायच्या असतात. डावीकडून सुरुवात केली. एक घंटा सोडली नाही आणि पहिली दुसरीवर, दुसरी तिसरीवर आपटत निघाले ते मंदिराच्या उजव्या हाताला येऊन पोहोचले. या घंटा वाजवण्याच्या मागेही काही कारण असतं पण मला हे असं वाजवायला आवडतं म्हणून मी या अशा घंटा नेहमी वाजवते.

हिमाचलमध्ये तिबेटी बौद्ध मोठ्या प्रमाणावर राहतात आणि त्यांची छान छान मंदिरं इथे बरीच आहेत. हिमाचलमध्ये यायचं पण अशा एकाही मंदिरात जाता आलं नाही तर काय उपयोग ! पण आम्हाला आमच्या हिमाचलच्या पहिल्याच दिवशी या मंदिरात जाण्याचा योग आला. ज्याने हे मंदीर बांधलं त्याचंही इथे समाधीवजा मंदीर आहे. तिथून बाहेर पडलो तर तिथेच तिबेटी वस्तूंची छोटी छोटी दुकानं दिसली. किती सुंदर सगळ्या वस्तू ! स्वयंपाकघरात लागणाऱ्या चिनीमातीच्या बरण्या, कप तर एकपेक्षा एक सुंदर, बारीक नक्षीकाम केलेल्या, कितीही इच्छा असली तरी नुसतंच बघण्याखेरीज आमच्या हातात काहीच नव्हतं. इतर सगळ्या गोष्टीही खूप सुंदर, नुसतंच डोळ्यांनी बघत आम्ही तिकडून निघालो. 

मोबाईल आले आणि ते दिवसेंदिवस अद्ययावत होऊ लागले आणि एक दिवस त्यात मॅप्स आले आणि त्या त्या ठिकाणच्या बारीकसारीक गोष्टीही अतिशय खुबीने दाखवू लागले. जगात लोकं आधीपासूनच फिरत होती पण यातल्याच काहींनी काही अशा साईट्स सुरु केल्या की त्यात त्या त्या ठिकाणची अगदी छोट्यातली छोटी गोष्टही नमूद करण्याची सोय होऊ लागली आणि या अशा साईट्समुळे अगदी बारीकसारीक ठिकाणंही पर्यटकांना माहीत होऊ लागली. ही ठिकाणं कशी वाटली याबद्दलही लोकं त्या त्या साईट्सवर जाऊन लिहू लागली. हे जाळं वाढत गेलं आणि त्याचा उपयोग इतरांनाही होऊ लागला. त्या त्या ठिकाणी गेलं की हे पर्यटक आपल्या गाईडला ही अशी कुठली चांगली ठिकाणं दाखवणार नाही का म्हणून विचारणा करू लागली आणि या गाईड लोकांची पुरती पंचाईत होऊ लागली. पर्यटक येताना पूर्ण अभ्यास करून येतात आणि एवढंच काय यांच्याकडे तर तिथपर्यंत जायचा नकाशाही तयार असतो. असंच मनाली गावभागातलं शंकराचं एक प्राचीन मंदीर आम्ही आमच्या ड्रायव्हरला विचारलं पण त्याला त्याचं साधं नावही माहीत नव्हतं. आम्ही कुठे आहे हे ही सांगितलं तर त्याने कारण पुढे केलं की माल रोडवर गाडी जात नाही. आम्ही पहिल्या दिवशी त्याच्यामागे फार लागलो नाही आणि आजचं पर्यटन संपवून परत निघालो. पहिल्या दिवशी नाही पण या आमच्या सहलीत या अशा ठिकाणी आम्ही त्याला घेऊन जायला लावलं.

No comments:

Post a Comment