Sunday, 7 May 2017

हिमाचल गाथा - भाग ४



दुसऱ्या दिवशी उठलो आणि बाहेर पाहिलं तर बाहेर सगळीकडे बर्फच बर्फ. आदल्या दिवशीचा सगळा पाऊस गोठून त्या भागात इतस्ततः पडलेला होता. जिथे जागा मिळेल तिथे हा गोठलेला पाऊस साचलेला दिसत होता. हॉटेलच्या लॉनवरच्या हिरवळीतही बर्फाचे स्फटीक चमकत होते. अगदी वेचून गोळा करावेत असे बर्फाचे तुकडे त्या हिरवळीच्या आधाराने तिथे विसावलेले होते. तसेच, समोरच्या डोंगरावर, त्यावरच्या झाडांवरही जमलेला बर्फ स्फटिकासारखा चमकत होता. हे मनालीतलं पहिलं बर्फदर्शन. इथल्या घरांची, हॉटेलांची छपरे कोनात उतरत्या दिशेने बांधलेली असतात. त्यामुळे बर्फवृष्टीनंतर किंवा हा असा बर्फ जमल्यानंतर थोडं जरी हवेचं तापमान वाढलं तरी बर्फ लगेच त्या छपरांवरून खाली पडतो. ड्रायव्हरला तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला तर त्याला एवढा आनंद झाला ! आमचा हा असा चौकशीसाठीचा फोन हा त्याच्यासाठी अनपेक्षित सुखद धक्का होता. कसं ना, छोट्या छोट्या गोष्टीच असतात या पण त्या समोरच्याला किती सुखावून जातात ! आणि त्यात एका ड्रायव्हरसाठी तर ही किती मोठी गोष्ट असावी याचा प्रत्यय आम्हाला त्या दिवशी आला. त्यालाही कधी वेगवेगळ्या प्रकारचे कटू अनुभव आले असतील, तो केवळ एक ड्रायव्हर आहे याची त्याला आठवण करून देणारे...

आम्ही मनाली फिरण्यासाठी बाहेर पडलो. मनालीचा लोकल भाग आज करायचा होता. हॉटेलच्या बाहेर पडलो आणि समोर बघते तर एक अतिशय सुंदर रस्ता, एका शैक्षणिक संस्थेच्या आत जाणारा.
हॉटेलसमोरील रस्ता
मुख्य रस्त्यावर एक मोठं फाटक आणि त्यात आत अगदी सरळ रेषेत जाणारा लांबच लांब रस्ता, बाहेरून अगदी थेट दिसणारा. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावलेले मोठाले वृक्ष आणि त्या वृक्षांच्या पायाशी नांदणारी हिरवळ. ते वृक्ष कोणते होते हे माहीत नाही पण त्यांची संपूर्ण पानगळती झालेली होती आणि त्या वृक्षांच्या उरलेल्या त्या काड्या काटक्या तेवढ्याच त्याच्या सोबतीला होत्या. साध्या काड्या काटक्यांचे हे वृक्ष दोन्ही बाजूला उभे आणि मध्ये सरळ आत जाणारा रस्ता. ही झाडं कुठली ते माहीत नाही पण ते समोरचं दृश्य काय सुंदर दिसत होतं !

आपल्या इथे रस्त्याच्या कडेला गुलमोहर असतो तशी इथे रस्त्याच्या कडेला सफरचंदाची झाडं असतात. काश्मीर नाही तर हिमाचलमधली सफरचंद प्रसिद्ध आहेत आणि सगळ्या देशात ही इथलीच सफरचंद जातात, असं आमच्या ड्रायव्हरचं म्हणणं. वड पिंपळ जसा सहज दिसावा तशी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची झाडं दिसतात. आम्ही गेलो तो काळच पानगळतीचा असल्याने आम्हाला सगळ्या झाडांच्या काटक्याच दिसल्या. आत्ता १५ दिवसांनी हे झाड असं दिसेल आणि तसं दिसेल हे आम्हाला तिथे ऐकायला मिळालं. या सफरचंदासकट सगळ्या झाडांच्या बागाही या अशा रस्त्यांवर सहज बघायला मिळतात. हिमाचल हा भागच हिरवा त्यामुळे रुक्ष असा एकही रस्ता किंवा कुठला भाग आम्हाला कधीच दिसला नाही. काही ना काहीतरी दिसणारच रस्त्यांवर... शेत नाहीतर बाग, नाहीतर अशीच हिरवळ किंवा उंचच उंच वृक्ष.
मनाली फिरायला सुरुवात केली आणि त्यात आमच्या साथीला होती हिमाच्छादित शिखरं, डोंगर. प्रत्येक डोंगराचं सौंदर्य वेगळं आणि प्रत्येक ठिकाणाहून तोच डोंगर वेगवेगळा दिसणार. थोडी दिशा बदलली की त्याच शिखराचं किंवा डोंगराचं रुपडं बदलणार. या हिमशिखरांचे मी एवढे फोटो काढले पण तरीही यांचं सगळं सौंदर्य काही टिपता आलं नाही आणि ते असं टिपता येणंही शक्य नाही. माझ्या हातातला मोबाईल फोटोंसाठी कायम तत्पर असायचा पण निसर्गाला कधी कॅमेऱ्यात बंदिस्त करता आलंय !

हिडींबा मंदिराचा लांबून काढलेला फोटो
स्थानिक मनालीत पहिल्यांदा निघालो हिडींबा देवीच्या देवळाच्या दिशेने. खूप आधी पाहिलेल्या या मंदिराची आणि त्याच्या परिसराची प्रतिमा अंतर्मनावर छान उमटलेली होती. ते मंदीर बघून एवढा मोठा काळ लोटला होता पण ते मंदीर मला अगदी छान आठवत होतं. मंदीर आणि तो सुंदर परिसर एकदा पाहिला की कोणालाही विसरता येणं केवळ अशक्य. मंदीर जवळ आलं आणि आम्हाला दर्शन दिलं देवदार वृक्षांनी, रस्त्यावरून गाडी चालली आहे आणि त्याच्या एका बाजूला फक्त देवदारांचं राज्य... या त्यांच्या राज्यात आम्ही त्यांच्या देवीच्या जवळ येऊन ठेपलो. गाडीतून उतरून आता आम्हाला खूप चढण असलेल्या रस्त्यावरून जायचं होतं. हिडींबा आणि तिथेच जवळच तिच्या मुलाचं म्हणजेच घटोत्कचाच देऊळ. आधीच मनालीची थंडी आणि त्यात आम्ही तिथे देवदारच्या दाट जंगलात, त्यामुळे अंगावर भरपूर गरम कपडे घालूनही चांगलीच थंडी वाजत होती. ते चढण चढून देवदारच्या जंगलात शिरत आम्ही देवीच्या देवळापाशी आलो. विचार केला, या एवढ्या थंडीत पायातले बूट काढावेत आणि मोजे घालूनच मंदिरात जावं, पण तिकडे जाऊन बघतो तर काय येणारी सगळी लोकं बूट, मोजे काढून मंदिरात जात होती. आम्हीही बूट, मोजे काढले आणि पाय जमिनीवर ठेवला तर बर्फाच्या गादीवर पाय ठेवावा एवढी गार ती तिथली जमीन... बूट काढून लोकं उई उई करत तिथे पळत होते. आम्ही पट्कन जाऊन दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रांग फार काही मोठी नव्हती आणि तिथे उगाचच मी आधी मी आधी करत धक्काबुक्की न करता लोकं शिस्तीत रांगेत उभे रहात होते. ही हिडींबा तिथली मुख्य देवी. या तिच्या मंदिराचं छप्पर पॅगोडासारखं जमिनीकडे उतरत्या दिशेने बांधलंय. त्या छपरावरून बर्फाचं पाणी अखंड पडत होतं. आजूबाजूला लोकांची ये जा, त्यांची बडबड होती पण त्या दर्शनाच्या रांगेत उभं राहून मनाला एक प्रकारची शांतता जाणवत होती. मंदीर लाकडाचं आहे आणि देवी गुहेच्या आत विराजमान झालेली आहे. गुहा फार मोठी नाही पण त्या गुहेत चांगलंच वाकून जावं लागतं, आत अगदी देवीच्या समोर बसायला फारशी जागा नाही पण देवीच्या अगदी पुढ्यात तुम्हाला बसायला मिळतं. किती वेळ बसायचं हे तुमच्या हातात, तिथून तुम्हाला चला चला करत कोणीही उठवत नाही. तुम्हाला हवं तेवढा वेळ बसा, मग गंध लावून घ्या, प्रसाद घ्या आणि बाहेर पडा.

एव्हाना तुम्हाला त्या बर्फाच्या गादीची सवय झालेली असते त्यामुळे शांतपणे तुम्ही मंदिरातून बाहेर येता. बाहेर येऊन बघता तर तुमच्या आठही दिशांना देवदारचं घनदाट जंगल असतं आणि मध्ये तुम्ही. तिथली निरव शांतता, स्वच्छ हवा, हवेतला गारठा, स्वच्छता आणि चहूबाजूंनी देवदार हे सगळं तुम्हाला मोहात पाडतं. हा परिसर किती सुरेख आहे हे मी इथे वेगळं लिहायची गरज नाही. थोडं वर चढून हिडींबाच्या लेकाच्या मंदिराकडे निघालो.

हिडींबा आणि घटोत्कच ही दोन महाभारतातली अतिशय महत्त्वाची पात्रं. हिडींब आणि हिडींबा हे दोघे सख्खे बहीण भाऊ. राक्षस योनीतले, त्यामुळे अर्थातच मायावी. हिडींबा माणसाचं मांस खात नसे पण हिडींबला मात्र माणसाचं मांस विशेष प्रिय. एकदा तो रात्री या अपेक्षेने घरी येतो की बहिणीने जेवायला माणसाचं मांस शिजवलं असेल पण त्याचा अपेक्षाभंग होतो आणि म्हणून माणसाची शिकार करण्यासाठी हिडींब घरातून बाहेर पडतो. तिथे जंगलात त्याला पाच पांडव आणि कुंती झोपलेले दिसतात. लाक्षागृहातून सुखरूप बाहेर पडलेले पांडव आणि कुंती हस्तिनापूरला जाण्याआधी अज्ञातवासात वेगवेगळ्या जंगलात, नगरात फिरत असतात. याच दरम्यान ते एके रात्री जंगलात झोपलेले असताना हिडींब तिथे येतो. सहा सहा मनुष्यप्राणी बघून तो एकदम खुश होतो आणि त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावतो, तेव्हाच भीम त्याच्या मध्ये येतो. भीम आणि हिडींब यांचं युद्ध सुरु होतं. हिडींब शेवटी मायावी राक्षस आणि भीम साधारण मनुष्य नसला तरी शेवटी मनुष्य योनीतलाच... हे युद्ध चालू असताना हिडींबा तिथे येते आणि भीमाला बघताच क्षणी त्याच्या प्रेमात पडते. आपला भाऊ भीमाविरुद्ध मायावी युद्ध करत असलेलं पाहून ती तिची मायावी शक्ती हिडींबच्या विरुद्ध वापरायला सुरुवात करते. हिडींबाच्या मदतीने भीम हिडींबचा वध करतो. त्यावेळी हिडींबा तिच्या मनातल्या भीमाबद्दलच्या भावना सर्वांसमोर स्पष्ट करते. धर्मराज युधिष्ठीर धर्माप्रमाणे विचार केला तर भीमाने हिडींबाशी लग्न करावं असं आपलं मत मांडतो आणि ती आता एकटी आहे तेव्हा भीमाने तिचा स्वीकार करावा असं कुंती भीमाला सांगते. आई आणि मोठ्या भावाचं ऐकत भीम हिडींबाशी लग्न करायला तयार होतो. अशाप्रकारे हिडींबा आणि भीम यांचं लग्न होतं आणि यांचा मुलगा घटोत्कच. घटोत्कचाचा जन्म एका खास कारणासाठी झाला होता. अतिशय शूरवीर असणारा घटोत्कच महाभारतातलं अतिशय महत्त्वाचं पात्र. महाभारताच्या धर्मयुद्धातली घटोत्कचाची भूमिका अतिशय महत्वपूर्ण. घटोत्कच कुरुक्षेत्रात येतो तेच मुळी कौरव सेनेचा काळ बनून. शेवटी दुर्योधनाला स्वतःच्या जीवाची काळजी वाटायला लागते आणि तो त्याचा मित्र कर्ण याच्याकडे घटोत्कचाचा वध करण्याची विनंती करतो. आपल्या मित्राची विनंती स्वीकारून कर्ण घटोत्कचावर इंद्राने दिलेल्या अस्त्राचा वापर करतो आणि घटोत्कचाला वीरमरण येतं. कर्णाची कवचकुंडलं काढून घेतल्यावर इंद्राने कर्णाला अचूक भेद करणारं अस्त्र दिलेलं असतं. या अस्त्राला कुठलाही तोडगा नाही आणि ज्याच्यासाठी ते वापरलं जाईल त्याचा मृत्यू निश्चित. कर्णाने हे अस्त्र अर्जुनासाठी राखून ठेवलेलं असतं पण त्याला ते घटोत्कचासाठी वापरावं लागतं.

या हिडींबा आणि तिचा मुलगा घटोत्कच यांचं इथे मंदीर आहे. काही म्हणतात की इथेच हिडींबा रहायची तर काही म्हणतात की इथे तिने तपश्चर्या केली. हिडींबा मंदिरात असलेल्या गुहेत तिने तप केलं. तिथे तिची पितळ्याची मूर्ती आणि पादुकाही आहेत. असंही म्हणतात की हिडींबा राक्षस योनीतून तिच्या साधनेने आणि पतिव्रतेने मनुष्य योनीत आली आणि पुढे देवी बनली. तिला कालीचं रूपही मानतात. कुल्लूच्या राजाच्या नोकराला तिने दर्शन दिलं आणि त्यावेळच्या क्रूर राजाच्या कुळाचा नाश करत तिनेच या नोकराला राजा बनवलं, अशीही आख्यायिका आहे. दसऱ्याच्या वेळी इथे ३ दिवसांची जत्रा भरते आणि त्यावेळी या देवीची पालखी निघते, हा एक खूप मोठा सोहळा असतो.

तिकडे हिमाचलच्या पहाडी भागात घटोत्कचाची बरीच मंदिरे आहेत. एका झाडाखाली पारावरच असणारं हे मनालीतलं मंदीर खूप प्राचीन आहे. या जागेच्या संदर्भात जे काही पौराणिक सत्य असेल ते असेल पण या जागी आल्यावर मनाला एक प्रकारची शांतता लाभते. तिथला निसर्गही अतिशय प्रसन्न आणि सात्विक आहे.
देवदारचं जंगल
आईच्या मंदिराकडून मुलाच्या मंदिराकडे जाताना वाटेत तिथल्या स्थानिकांची लोकरीच्या कपड्यांची अगदी छोटी दुकानं आहेत. हिमाचलचा पारंपारिक पेहराव घालून फोटो काढण्याची सोयही तिथे आहे. सशांना हातात देण्यासाठी स्थानिक बायका आपल्या मागे लागतात. तिथेच याकही आहेत. त्यांच्यावर बसता येतं, बसून एक अगदी छोटी फेरीही मारता येते. दोन्हीचे पैसे वेगवेगळे आणि काहीच्या काही. तिथल्या याककडे बघत होते. याकवर लोकं बसत आहेत, हसत खिदळत आहेत, फोटो काढून घेत आहेत. पण त्या याकचं काय ? याकच्या नाकात वेसण घातलेली होती. वेसण घालण्यासाठी इतकं मोठं भोक पाडलं होतं की ते भोकही अक्षरशः लोंबत होतं. याक जर डावीकडे बघायला लागला की त्या वेसणाची दोरी पकडलेला त्याचा तो मालक जोरात दोरी ओढायचा आणि त्याला उजवीकडे किंवा समोर बघायला लावायचा, हे असं सारखं घडायचं. तिकडे तो जो काही प्रकार चालू होता तो पाहून त्या याकवर बसण्याचा विचार करावा असा विचारही मनात आला नाही.

तिथून आम्ही रस्ता उतरत परत गाडीकडे आलो. आमचा ड्रायव्हर मस्त सीट आडवी करून झोपलेला होता. आम्ही आलेलो बघताच ताडकन उठला आणि म्हणाला की ते संग्रहालय पाहिलंत का ? बघून या. इथलं स्थानिक संग्रहालय आहे, अगदी बघण्यासारखं. परत तो उभा रस्ता चढून घटोत्कच मंदिरापर्यंत गेलो. मंदिराच्या डावीकडेच ते संग्रहालय होतं. तिथेच शेजारी असणाऱ्या खेळांमध्ये बसायला गर्दी पण त्या संग्रहालयात कोणी नाही. आम्ही आलेलो बघून तिथे बाहेरच उभा असलेला तिथला व्यवस्थापक आमच्याबरोबर संग्रहालयाच्या इमारतीत शिरला. इमारतीच्या बाहेर बर्फ होता. बर्फवृष्टीचा साधारण काळ सरल्यावर आणि तिथला पर्यटनाचा मुख्य हंगाम सुरु व्हायच्या आधी आम्ही हिमाचलमध्ये असल्याने आजूबाजूला बर्फ दिसणे ही खूपच साधी गोष्ट होती.
हिमाचलमधली प्राचीन देवळं, तिथली संस्कृती, जुन्या काळात घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, घरांमधल्या खोलींची रचना, भांडीकुंडी, पेहराव असं एकंदर हिमाचलचं चित्र रेखाटणारं ते छोटंसं संग्रहालय अगदी बघण्यासारखं. 

तिथून निघालो, आमचा पुढचा थांबा होता “क्लब हाऊस”. मनालीच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून आमची गाडी निघाली. मनाली हे आपल्या देशातलं अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने, रस्त्यांवर सगळी हॉटेलंच दिसतात. हे कमी म्हणून की काय घरांमध्ये रहायची सोय केलेली घरं, तसेच खाण्यापिण्याची ठिकाणं, छोटी छोटी दुकानं. या सगळ्यातून जागा मिळाली तर कुठे कुठे इथल्या स्थानिकांची निवासाची जागा.

अगदी कुठल्याही शहरातलं क्लब हाऊस असावं असंच हे क्लब हाऊस, एका जुन्या इमारतीला नवीन छटा देत बनवलेलं, इमारतीच्या आत तसेच बाहेर मोकळ्या जागी खेळायचे खेळ असलेलं, बियास नदीच्या काठचं. बियास नदीत खेळायचे खेळही तिथे आहेत. खास हिमाचली वस्तू एकत्रित मिळण्याचं हे ठिकाण. हिमाचलमध्ये बनणारी मिठाई, साठवणूक करता येतील अशी पेये इथे विक्रीस होती. आम्ही इथली मिठाई घेतली. दूध आणि खवा यांचा वापर न केलेली आणि अगदी सहा आठ महिनेही आरामात टिकणारी. हातमागावर बनणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या स्थानिक वस्तू ते अगदी चपलांपर्यंत सगळं इथे मिळत होतं. शाली, साड्या, पिशव्या, घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू, महिलांसाठी असलेलं शृंगाराचं स्थानिक सामान, ड्रेस मटेरियल्स, वगैरे अनंत प्रकारच्या स्थानिक गोष्टी इथे अगदी खूप छान बघायला मिळाल्या. बघताना अगदी काय घ्यावं आणि काय नाही असं वाटत होतं पण आमची विमानातून सामान नेण्याची कठीण परिस्थिती असल्याने मोह आवरायला लागला. किमतीही फार नाहीत हो पण अशा हौसेने कुठून कुठून आणलेल्या वस्तू घरी आल्यावर फारशा न वापरता कुठे कुठे ठेवून दिल्या जातात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. मी एक ड्रेस मटेरियल घेतलं, जे हमखास शिवून वापरलं जाणार याची मला हमखास खात्री होती.

तिथे खाण्यापिण्याची छोटी दुकानं होती. चाट हा प्रकार मनालीत भयंकर लोकप्रिय. चव कशी का असेना, खाणाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडत असतात. तिथेही होतं एक दुकान, पावभाजी आणि चाटचे प्रकार. पावभाजी तिथे अगदी चवीने चाखली जात होती. एकंदर तिथेच नाही पण एकंदर त्या भागातच आपली पावभाजी आवडीने खाल्ली जाते. मी खाण्याचं धाडस नाही केलं आणि तसंही इतक्या लांब जाऊन आपलेच पदार्थ कसले खायचे ! स्थानिक पदार्थ खाऊन बघावेत. तिथेच पाणीपुरीही होती. चंदीगडची भेळ खाऊन बघितली होती, आता हिमाचलची पाणीपुरी खाऊन बघायची इच्छा होती. तिकडे पांढऱ्या वाटाण्यांचा स्टोव्हवर गरम होत असलेला रगडा नसतो, त्यामुळे पुरीच्या आत गरम गरम काहीच नाही. तिथे एवढी थंडी होती की साधं पाणीही बर्फाच्या पाण्यापेक्षा जास्त थंड त्यामुळे पाणीपुरीतलं पाणी हे थंडगारच... तिथली थंडी आणि ते गार गार पाणी बघून पाणीपुरी खायची माझी हिंमत काही झाली नाही. मुळातच आईस पाणीपुरी हा प्रकारच आवडत नसल्याने तिकडची पाणीपुरी खायची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही.

आम्ही तिथे क्लब हाऊसच्या आवारात असताना अचानक हवामान बदललं, एकदम थंडी वाढली आणि काळोखून आलं. तिथल्या हवामानाचा काहीही नेम नाही. त्याप्रमाणे ते अचानक बदललं आणि पावसाळी बनलं. आता आमचं पुढचं ठिकाण होतं, “मनू महर्षी मंदीर”...

महर्षी मनू यांचं हे पृथ्वीवरचं एकमेव मंदीर असल्याचं म्हटलं जातं. जलप्रलयानंतर मनू या ठिकाणी अवतीर्ण झाले. ज्या ठिकाणी हे देऊळ आहे तिथेच त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथेच त्यांनी तपश्चर्याही केली. या प्रलयानंतर महर्षी मनू यांनी मानवाची पुनर्निर्मिती केली. म्हणजेच आज जो काही मनुष्यप्राणी आपण बघतो ती या मनूचीच लेकरं. हे मनाली जे नाव आहे ते नावही महर्षी मनू यांच्या नावावरूनच दिलं गेलेलं आहे. मनू+आलय यावरून मनाली झालं.


मनू मंदिरात जाण्याचा रस्ता अतिशय चढण असलेला, अगदी उभं चढण आणि अंतरही बरंच. रस्ता चांगला आहे आणि खाली रिक्षेची सोयही आहे. तिथे रिक्षावाल्यांची संघटना आहे आणि हे रिक्षावाले चार चाकी गाड्यांना वर जाऊ देत नाहीत. आम्हीही रिक्षेने निघालो आणि ते भयंकर चढण बघून पायी न जाता रिक्षा केली हे बरं झालं याचं समाधान मनात मानू लागलो. आपल्याकडे कसे घाटात किंवा कुठला डोंगर चढताना रस्त्याच्या कडेला मोठाले दगड पडलेले असतात, तसेच इथेही पडलेले दिसत होते. फक्त ते दगड बर्फाचे होते. एका बाजूला डोंगराच्या अध्येमध्ये स्थानिक लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्या होत्या आणि त्यांना पार करत आमची रिक्षा चालली होती तर दुसऱ्या बाजूला सुंदर बियास दरी, त्याच्यावर प्रत्येक कोनातून वेगवेगळी आणि अप्रतिम दिसणारी हिमशिखरं, त्या हिमातून डोकावणारी उंचच उंच झाडं आणि खाली जमिनीवर मुक्तपणे वाहणारी बियास नदी. हिमाचलच्या भागात तुम्ही अगदी कुठेही फिरा, तिथे कानाकोपऱ्यात तुम्हाला निसर्ग भेटणारच, स्वच्छ, सुंदर, पवित्र निसर्ग. ते निसर्गाचं पावित्र्य, प्रामाणिकपणा तुम्हाला हिमाचलच्या हवेत जाणवणारच.
मनु महर्षी मंदीर, येथून दिसणारं दृश्य

एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला बियासचं सौंदर्य बघत आम्ही मंदिरापाशी येऊन पोहोचलो. मध्ये मंदीर आणि चहूबाजूंनी अक्षरशः वेड लावणारा निसर्ग. बियासची दरी इथून फार सुंदर दिसते. आम्ही गेलो तेव्हा आकाश अगदी निरभ्र होतं. क्लब हाऊसमध्ये ढग दाटून आले असं वाटत असताना मनूच्या मंदिरापाशी मात्र आकाश स्वच्छ होतं. निळं आकाश आणि त्यात कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरे ढग. या भागात हवा इतकी स्वच्छ होती की आकाशातला हा निळा आणि पांढरा हे दोन्ही रंग आम्हाला अतिशय स्वच्छ आणि तेजस्वी दिसत होते. या निळ्या पांढऱ्या सौंदर्याला बघणाऱ्याने भुलू नये म्हणून की काय निसर्गाने हे बियास दरीचं सौंदर्यही तशाच थाटात रेखाटलेलं होतं. इथल्याच एखाद्या ढगाची सावली बर्फाच्या डोंगरांवर पडलेली दिसली आणि वाटलं, निसर्गाला या बियास दरीच्या सौंदर्यात अशी कुठली कमतरता जाणवली की त्याने एखाद्या सुंदरीच्या हनुवटीवर किंवा ओठांवर अगदी नाजूकसा तीळ द्यावा तशी ही ढगाची सावली या निसर्गाने बर्फाच्या डोंगरांवर पाडली !

मनु महर्षी मंदीर
हे मनु महर्षी मंदीर छोटेखानीच आहे. मंदिरात फार गर्दी नव्हती. आमच्या पाठोपाठ नवराबायको आत मंदिरात शिरले. बायको विचारते, कोणाचं मंदीर आहे ? नवरा म्हणते, मनु ऋषी. आपण कुठल्यातरी अतिशय पावन ठिकाणी आलो आहोत अशा अविर्भावात ती बायको लगेच हात जोडून मनोमन नमस्कार करताना दिसली. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की हे तेच “मनुस्मृती”कार मनु आहेत पण इथे या मंदिरात येणाऱ्या लोकांच्या मनात मात्र त्यांच्यासाठी नतमस्तक करणाऱ्या भावना आहेत. मंदिरात छायाचित्र घेण्यास मनाई होती आणि आम्ही पडलो नियमांचं पालन करणारे त्यामुळे मंदिराच्या आत आम्ही आमच्या कॅमेऱ्याला अजिबातच त्रास दिला नाही.  


त्या मंदिराच्या बाहेरच एका बाजूला वयस्कर स्थानिक बायका जोरजोरात हसत खिदळत गप्पा मारत बसल्या होत्या.
त्या सगळ्या त्यांच्या हिमाचली पेहरावात इतक्या छान दिसत होत्या की त्यातल्या कोणाचा तरी फोटो घ्यावा असं वाटलं. त्यांच्यातल्याच उभ्या असलेल्या बाईला म्हटलं तुमचा फोटो काढू ? हसत लगेच तयार झाली आणि छानशी भावमुद्रा देत म्हणली, काढ काढ... कसा मस्त येईल बघ फोटो. 

हे मंदीर आधुनिकतेपासून खूप लांब आणि अतिशय सुंदर निसर्गाच्या जवळ असल्याने या मंदिराच्या परिसरात खूप सुंदर वाटतं. स्वर्ग वगैरे काही कुठे असेल तर त्या स्वर्गात जाण्याच्या रस्त्यात हे असं ठिकाण लागत असावं. तिथल्या निसर्गात फिरताना तिथे सगळीकडे असलेली कमालीची स्वच्छता तुमच्या मनाला लाभणारा दैवी स्पर्श अगदी सहजतेने घडवून आणते. देवभूमी हिमाचलच्या जुन्या मनालीतलं हे महर्षींचं मंदीर झाल्यावर दुसऱ्या एका ऋषींच्या मंदिराकडे आम्ही निघालो, वशिष्ठ ऋषींचं मंदीर आणि गरम पाण्याचे झरे... 

2 comments:

  1. मस्त...����������
    हिमाचल सफ़र तुमच्या मुळे अनुभवता येतीये ताई..☺��
    मला तिकडे जावस वाटतंय खुप.

    ReplyDelete