Wednesday, 29 June 2016

गांधी वध कट रचल्याचं ठिकाण



एखाद्या आवडत्या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास ज्या वास्तूत घडतो, ती वास्तू त्या व्यक्तिमत्वाच्या चाहत्यांसाठी विशेष महत्त्वाची असते. त्या वास्तूसाठी ह्रदयात कुठेतरी विशेष स्थान असतं. "तेथे कर माझे जुळती" अशी भावना असते. मग असं व्यक्तिमत्व म्हणजे कलाकार, नेता, स्वातंत्र्य सैनिक, वगैरे कोणीही असू शकतं.
 
इतिहासात काही उल्लेखनीय घटना घडल्या आहेत, ज्यांचे दीर्घ परिणाम आपल्या मातृभूमीवर दिसले आहेत. काही परिणामांचे भोग लोकांना भोगावे लागले आहेत तर काही परिणामांची चांगली/वाईट फळं या देशाने चाखली आहेत. अशा अनेक घटना आहेत, त्यातली एक घटना 'गांधी वध'. गांधी वध आणि त्याचे परिणाम याबद्दल वेगळं लिहायची गरज नाही.
 
गांधी वध करण्यापूर्वी त्याचा कट रचला गेला. तो कसा करावा याबद्दल बरीच खलबतं झाली. गोडसे, आपटे सहीत चार हिंदूमहासभा सदस्य यांच्या छुप्या बैठकी व्हायच्या आणि त्या बैठकीत हा वधाचा कट रचला गेला. जिथे हा कट रचला गेला ती वास्तू खरंच महान म्हणायची, त्या जागी हे कटाचं कार्य घडलं !
 
माझं जे माहेर आहे, त्याच्या अगदी शेजारी ही वास्तू आहे, एकदम लागून. यासाठी मी स्वतःला नशिबवान समजते. लहानपणी आम्ही तिथे खेळायला जायचो. एवढंच नाही तिथे काही काळ राहण्याचं भाग्यही आम्हाला मिळालं. मूळ मालकांनी ते एक मजली घर दुसऱ्यांना विकलं. नवीन मालकांनी त्या घराच्या मूळ साच्यात काहीही बदल केला नाही. त्यामुळे आजही त्या घराच्या त्या खोल्या गोडसे, आपटे सहीत चौघांच्या त्या ऐतिहासिक कटाची साक्ष देतात.
 
मी याही बाबतीत स्वतःला नशिबवान मानते कारण आमचा वाडा शांत उभा राहून त्या चौघांना पहात होता, ऐकत होता...!

Tuesday, 28 June 2016

नेपाळी वॉचमन आणि नेपाळचा भूकंप



आमच्या इमारतीचा रात्रीचा वॉचमन नेपाळी आहे. खूप प्रामाणिक, हसतमुख, कधीही कुठलंही काम त्याला सांगा व्यवस्थितच करणार. उगाच करायचं म्हणून नाही. त्याचं जे काम नाही ते ही तो आपणहून करणार. परत कुठलीही अपेक्षा नाही. दिवाळीही घ्यायला नाही नकोच म्हणणार. रोज संध्याकाळी नेपाळी गाणी ऐकत बसलेला असतो. गाणी ऐकताना बऱ्याचदा मी त्याला भावुक झालेलं पाहिलंय, कुठेतरी शून्यात बघत. त्याला हे असं पाहिलं की मला नेहमी वाटतं की याला आपल्या गावाची आठवण येत आहे. त्या आठवणीत हा नेपाळी गाणी ऐकतो आणि ती गाणी ऐकतोय म्हणून त्याला अजूनच आपल्या घरच्यांची आणि नेपाळची आठवण येत असावी...

आज नेपाळची ही दुर्घटना घडल्यावर मला आमचा वॉचमनच आठवला. वाटलं, हा इथे. याच्या घराचं आणि घरच्यांचं काय झालंय काय माहीत ! पण आज कामावर आलाय म्हणजे घरचे बरे असावेत असं वाटलं.

मगाशी बाहेर जाण्यासाठी घराबाहेर पडलो होतो. माझी नजर त्यालाच शोधात होती. मेन गेटपाशीच दिसला.

त्याला विचारलं की घरचे कसे आहेत ? घरचे नेपाळमध्येच असतात ना ? का इथे असतात ?
जरा गोंधळलाच....

ही अशी विचारपूस त्याला अपेक्षित नसावी. हल्ली लोकं आपल्यातच एवढे गुंग असतात की वॉचमनकडे लक्ष द्यायला, त्यांची चौकशी करायला कुठला आलाय लोकांकडे वेळ ? आणि इच्छाही नाहीच.

गोंधळतच त्याने विचारलं, काय ?

मग मीच त्याला नेपाळच्या भूकंपाचा उल्लेख करत त्याच्याकडे त्याच्या घरच्यांची, गावची चौकशी केली.

हे ऐकल्यावर त्याचा चेहराच बदलला. चेहऱ्यावर हास्य फुललं. आपल्याबद्दल ही अशी चौकशी इमारतीतलं कोणी करेल असं त्याला कधी वाटलंच नसावं. अचानक आपल्या घरच्यांबद्दलची ही चौकशी त्याच्यासाठी "सुखद धक्का" होता.

नाही आमच्या इथे काही झालं नाहीये. गोरखा, काठमांडू तिकडे भूकंप झालाय. आमचं गाव लांब आहे तिथून. हे असं सांगताना त्याचा चेहरा फुललेला होता.

मी ही अशी विचारपूस माझ्या नवऱ्यालाही अनपेक्षित होती. मला नवरा म्हणाला की त्याला कोणी हे असं विचारलंही नसेल. त्यालाही हे अनपेक्षित असेल.

मी नवऱ्याला म्हणाले, चांगला आहे तो. आणि जर माहीत आहे की तो नेपाळी आहे आणि एवढं घडलंय तिकडे तर चार शब्द विचारावेत चौकशीचे...

.... आपल्या आजूबाजूच्या प्रामाणिक, कामसू लोकांना कधी विसरू नये. हे असे चौकशीचे चार शब्दही त्यांना आनंद देतात आणि त्यांचे आनंदी चेहरे आपल्यालाही एक समाधान देऊन जातात.