आज “हरियाली तीज”. श्रावणातली शु. तृतीया, सगळीकडे हिरव्या दुलईने नटलेली सृष्टी,
म्हणून या श्रावणी तीजला हरियाली तीज म्हणतात. हा महिलांचा उत्सव मध्य प्रदेश, उत्तर
प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थान या राज्यांत साजरा केला जातो. जयपूरमध्ये
या तीजचं खूप महत्त्व आहे. हा ३ दिवसांचा उत्सव अविवाहिता आणि विवाहिता पूर्ण उत्साहाने
साजरा करतात. ही तीज साजरी करण्यासाठी नवविवाहिता आपल्या माहेरी जाते. देवी पार्वतीची
पूजा आणि उपासना या उत्सवात केली जाते.
जेव्हा देवी ‘सती’ने हिमालयाच्या घरी जन्म घेतला तेव्हा या जन्मातही आपल्याला
‘शिव’ हे पती म्हणून लाभू देत यासाठी पार्वतीने १०८ वर्ष घोर तपश्चर्या केली आणि श्रावण
शुद्ध तृतीयेलाच शंकर पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल
असा आशिर्वाद त्यांनी पार्वतीला दिला.
यासाठीच ही तीज अविवाहित मुली शंकरासारखा नवरा मिळावा म्हणून आणि विवाहीत स्त्रिया
सुखी वैवाहिक जीवनासाठी शिवपार्वतीची पूजा करून साजरी करतात.

No comments:
Post a Comment