Friday, 17 June 2016

इतिहासाच्या पाऊलखुणा



एखादी प्रभावशाली घटना घडते. ती घटना घडून जाते. काळ काही कोणासाठी थांबत नाही, त्याप्रमाणे काळ सरतो आणि ती घटना इतिहासात जमा होते. घटनेचा प्रभाव जबरदस्त असतो, त्यामुळे त्याचा परिणाम तिथल्या भूमीवर, लोकांवर, सगळ्या प्रकारच्या संस्कृतीवरही होतो. तरीही काळाबरोबर माणसं पुढे पुढे चालत राहतात. नवीन काळाच्या ढाच्यात स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करत राहतात, पण तो इतिहास खरंच पुसला जातो ? नाही. इतिहास त्याच्या पाऊलखुणा मागे ठेवतोच ठेवतो. मुघल आणि ब्रिटीश इतिहासाचा विचार केला तर हे नक्कीच पटेल.
 
आजचं महाराष्ट्रातलं शहर "पुणे". मुळात या नावातच इतिहास दडलाय. पुण्याचं खरं नाव पुनवडी, इंग्रजांना हे नाव उच्चारता यायचं नाही. त्यामुळे पुनवडीचं पूना होत होत पुणे हे नाव शहराला पडलं ते कायमचं. इंग्रज तर गेले पण पुनवडी या नावावरच त्यांच्या पाऊलखुणा कोरुन गेले.
 
मुंबई महानगर, या महानगरात धावणारी लोकल आणि तिची स्थानकं. या स्थानकांची काही नावं तसेच दक्षिण मुंबईतल्या काही पुरातन इमारती यांची नावं अजूनही इंग्रजांच्या काळातलीच आहेत. इंग्रज गेले तरी या पाऊलखुणा आपण अजूनही पुसू शकलेलो नाही, अपवाद छत्रपती शिवाजी टर्मिनसचा.
 
देशाची राजधानी, दिल्ली. मुघलांनंतर इंग्रज येऊन गेले तरी मुघलांच्या पाऊलखुणा आपल्या अंगाखांद्यावर स्पष्ट मिरवणारी. निज़ामुद्दीनसारख्या कितीतरी भागांची नावं मुघलकालीन म्हणून ओळखली जाणारी तसेच हुँमायू रोड, अकबर रोड, औरंगज़ेब रोड अशी रस्त्यांची नावंही एक ओळख म्हणून सांगणारी, या पाऊलखुणा अजूनही कायम आहेत. आता अपवाद औरंगज़ेब रोडचा.
 
ही तीन फक्त उदाहरणं आहेत पण आपल्या देशावर आक्रमण करणाऱ्या आक्रमणकर्त्यांच्या पाऊलखुणा आजही आपल्या देशातल्या भागांवर कायम आहेत.
 
काहीही म्हणा, इतिहास सरतो पण त्याच्या पाऊलखुणा मात्र अगदी कायम राहतात.

No comments:

Post a Comment