Friday, 17 June 2016

वाघा बॉर्डर.....lowering of the flags ceremony



आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. निसर्गसौंदर्य, धार्मिक, आध्यात्मिक स्थळे यांसारख्या अनेकविध प्रेक्षणीय स्थळांनी नटलेल्या आपल्या या देशात अमृतसर, पंजाब पासून जवळ असणाऱ्या अटारी गावातील वाघा सीमेवरील 'lowering of the flags' (देशाचे झेंडे खाली उतरवणे) हा समारंभ कोणाही भारतीयांनी चुकवू नये असाच आहे. अमृतसरला जाणाऱ्या पर्यटकांनी या समारंभासाठी पुरेसा वेळ जरूर ठेवावा.

वाघा सीमा ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना जोडणारी सीमा. ग्रांड ट्रंक रोड (Grand Trunk Road) या सीमेवरील दोन देशांना जोडणाऱ्या रस्त्यावर, सन १९५९ पासून दररोज संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी, भारताचे सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी कमांडोज यांच्यातर्फे 'lowering of the flags' (देशाचे झेंडे खाली उतरवणे) हा समारंभ पार पाडला जातो. या समारंभाची सुरुवात दोन्ही देशांच्या सैनिकांनी केलेल्या अतिशय उत्साहवर्धक आणि आक्रमक परेडनी केली जाते व तिचा शेवट अतिशय अचूक संयोजन केलेल्या 'lowering of the two nations flags' (दोन्ही देशांचे झेंडे खाली उतरवणे) ने केला जातो. ही परेड चालू असताना दोन्ही देशाचा एक एक जवान सीमेवर असणाऱ्या गेटपाशी उभा असतो. सूर्यास्त झाला की ते लोखंडी गेट उघडले जाते आणि दोन्ही देशांचे झेंडे खाली उतरवले जातात. झेंड्यांची घडी घातली जाते आणि दोन्ही देशांच्या सैनिकांचं रुक्ष हास्तांदोलन होऊन समारंभ संपतो.

हा शानदार समारंभ दोन्ही देशांचे नागरिक तसेच परदेशी पर्यटक यांना आकर्षित करतो. हा समारंभ चालू असतानाच लाहौर-दिल्ली ही बस सीमेवरून भारतात प्रवेश करते. तसेच हा समारंभ चालू असताना आपल्याला पलीकडच्या देशातील नागरिक सहजपणे दिसू शकतात.

समारंभ सुरु होण्यापूर्वी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ यासारख्या दिलेल्या घोषणा, देशभक्तीची सीमेवर लावलेली गाणी, कार्यक्रम चालू असताना दोन्ही देशांकडून घोषणांची चाललेली चढाओढ हा सगळा अनुभव खरंच शब्दात न सांगता येण्याजोगा. पण प्रत्येक भारतीयाने किमान एकदा तरी हा अनुभव घ्यावाच. या कार्यक्रमाचा एकदा तरी साक्षीदार व्हावंच. 


No comments:

Post a Comment