Tuesday, 28 June 2016

बायकोचा चांगुलपणा आणि एक व्यसनी नवरा



एक सर्वसाधारण कुटुंब, त्यात एक लग्नाचा मुलगा. घरची एकंदर परिस्थिती एकदम व्यवस्थित, पण त्या मुलाला दारूचं व्यसन. घरच्यांनी खूप प्रयत्न केले पण ते निरर्थक ठरले. मुलाचं वय तर लग्नाचं झालेलं, पण व्यसन काही सुटेना. मग मुलाच्या आईवडिलांना वाटलं की आपण मुलाचं लग्न करुन देऊयात, लग्नानंतर मुलगा सुधारेल. त्याप्रमाणे मुलाचं लग्न ठरलं पण मुलीकडच्यांना आपल्या मुलाच्या व्यसनाची माहिती मुलाकडच्यांनी अजिबात दिली नाही.
 
लग्नही झालं, पण मुलगा काही सुधारला नाही. वाट्टेल तेव्हा रात्री दारू पिऊन घरी येणं हे नेहमीचंच झालं. एरवी बाकी त्याचं वागणं अगदी व्यवस्थित पण हे व्यसन सुटण्याचं काही नाव नाही. बिचारी बायको रात्री नवऱ्यासाठी जेवायला म्हणून थांबायची. नवरा कधीही दारू पिऊन घरी यायचा रात्री दोन काय आणि अडीच काय, सासूसासरे तिला जेवायला थांबू नको म्हणून समजवायचे पण तरीही ती त्यांचं न ऐकता नवऱ्यासाठी थांबायची. परत तोंडातून एक वाईट अक्षर नाही की आदळआपट नाही की कधी या व्यसनावरून भांडण नाही. हे असं कित्येक दिवस चालूच होतं.
 
पण याचा कुठेतरी चांगला परिणाम हळूहळू का होईना त्या नवऱ्यावर होऊ लागला होता. बायकोच्या चांगुलपणापुढे त्याला स्वतःचंच वागणं खटकू लागलं आणि हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. तो आधीच्या पेक्षा घरी लवकर येऊ लागला, दारूचंही प्रमाण कमी होऊ लागलं. असं करत करत त्याच्यात पूर्ण परिवर्तन झालं. तो पूर्ण सुधारला. त्याच्यातला हा एवढा बदल त्याच्या आईवडिलांनाही कधी अपेक्षित नव्हता.
 
आज पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका नवऱ्याचं रूपांतर एका आदर्शनवऱ्यात झालंय, ते फक्त आणि फक्त त्याच्या बायकोमुळे आणि बायकोच्या चांगुलपणामुळे.
 
एखाद्याचा चांगुलपणा प्रतिकूल परिस्थितीही कशी बदलवू शकतो याचं हे एक अत्युत्तम उदाहरण म्हणता येईल.
 
पण तरीही आपल्या मुलाचं व्यसन मुलीकडच्या लोकांपासून लपवून त्याचं लग्न लावून देणं हे कधीही चुकीचंच. फक्त त्यांनी एवढा विचार करावा की हीच परिस्थिती उलटी असती तर ? त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या मुलीचं लग्न एका व्यसनी मुलाबरोबर झालं असतं तर ?

No comments:

Post a Comment