आजची संध्याकाळची गोष्ट. मी
रस्त्याच्या कडेने चालत होते. माझ्या साधारण १०-१५ फूट पुढे एक मुलगी मोबाईलमध्ये डोकं
घालून चालत होती. आपण कोणावर आदळत तर नाही ना, कुठल्या वाहनाची आपल्याला धडक तर बसणार नाही ना याचं तिला भानही
नव्हतं. चालणारी लोकंच हिला न धडकण्याची काळजी घेत होते.
सध्या हे असे नग बरेच दिसतात.
या apps च्या फारच आहारी गेलेले लोक्स...
ही मुलगी अशीच चालत होती तितक्यात
रस्त्याच्या कडेला पार्क केलेली एक गाडी हळूहळू बाहेर येऊ लागली. गाडी काढणाऱ्याला
ही मुलगी दिसणं शक्यच नव्हतं कारण त्याच्या शेजारी अजूनही गाड्या होत्या. मी विचार
केला की हिला ओरडून सांगावं. ऐकू आलं तर ठीक आहे नाहीतर तिचं कर्म.
मी ओरडणार तितक्यात या बाई
गाडीच्या डाव्या बाजूला मागे जोरात जाऊन आदळल्या. आदळल्यावर त्या भानावर आल्या आणि
जोरात ओरडल्या. हातातला मोबाईल जोरात खाली पडला. त्याचे तीन भाग झाले. मोबाईल तुटला
म्हटल्यावर ती अजूनच रडायला लागली. त्या गाडीवाल्या माणसाला तर काही कळेनासंच झालं.
मी मागे बघून गाडी रिव्हर्स घेतोय तर ही मधेच कुठून आली ?
ती मोबाईल जोडायचा प्रयत्न
करायला लागली. तिला पटकन तो जोडता येईना. मोबाईल जोडून तो सुरू करायचा प्रयत्न करत
होती तर तो चालू होईना. मोबाईल सुरू होत नाही म्हटल्यावर ती अजूनच घाबरली. मी तिला
म्हटलं, रस्त्यावर चालताना कशाचं काही
भान नाही म्हणजे काय ? मगाशी दोन वेळा लोकांना
धडकता धडकता वाचली आहेस आणि ते ही त्या लोकांमुळेच !
मला म्हणते, मोबाईल नवीन आहे. दिवाळीत घेतलाय आणि लगेच तो माझ्याकडून
आत्ता पडला. मी whatsapp वर चार जणांशी चॅट
करत होते. त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं.
मी म्हणाले, आत्ता मोबाईल तुटला. अगं उद्या तुझ्या जीवावर बेतलं
म्हणजे ? किती ते apps चं व्यसन ! पुढे ती काय बोलणार ? गप्प झाली.
रस्त्यावर चालताना दिसतं,
लोकं मोबाईलमध्येच डोकं घालून चालत असतात...
मला एक प्रश्न पडतो,
आपल्यासाठी ही apps आहेत की या apps साठी आपण आहोत ?
No comments:
Post a Comment