Tuesday, 28 June 2016

माणूस.....एक पुस्तक



प्रत्येक माणूस हा एक स्वतंत्र पुस्तक असतो असं मला वाटतं.

त्यात काही गोष्टी अगदी सरळ सरळ असतात. कोणालाही त्या अगदी समजून घेता आल्या नाहीत तरी सहजपणे वाचता येतात.

काही गोष्टी मात्र गूढ असतात. लगेच लक्षात येत नाहीत, त्यासाठी समोरच्याला थोडा जास्त समजूतदारपणा दाखवावा लागतो, थोडं सबुरीने घ्यावं लागतं आणि त्या गूढ गोष्टी समजून घ्याव्या लागतात.

काही गोष्टी फसव्या असतात. वरवर जे दिसत असतं, त्याच्या अगदी उलट मनात असतं. हा फसवेपणा नेहमी वाईटच असेल असं नाही हं कित्येकदा चांगल्यासाठीही असतो.

काही गोष्टीत फक्त चांगुलपणा असतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, या उक्तीला प्रमाण मानलेलं दिसून येतं आणि त्याच वेळी काही गोष्टी याच्या अगदी विरुद्ध असतात, फक्त द्वेष पसरवणाऱ्या.

काही गोष्टीत सच्चा मित्र, साथीदार असतो. आयुष्यात चांगल्या, वाईट दिवसात सोबत करणारा, वेळोवेळी चांगला सल्ला देणारा, अडखळल्यावर पडू नये म्हणून हात पुढे करणारा आणि वेळ प्रसंगी अगदी कान धरणाराही.

काही गोष्टीत वैरी डोकावतो, अगदी दोघांमधून विस्तवही जात नाही म्हणतात ना तसा.
काही गोष्टीत खरा मार्गदर्शक असतो, अगदी अचूक सल्ले देणारा.

काही गोष्टी उबदार असतात, त्यांना एक प्रकारचा ओलावा असतो. कठीण प्रसंगी मन मोकळं करावसं वाटलं की हमखास आपला खांदा पुढे करणाऱ्या.

काही गोष्टी फक्त चुका काढणाऱ्या असतात. चांगल्याला चांगलं कधीच म्हणणार नाहीत पण काही चूक झाली की ती दाखवण्यासाठी हमखास हजर राहतील, अशा.

काही गोष्टी फक्त गोड गोड बोलणाऱ्यांच्या असतात. मनात काहीही असूदेत जीभेवर फक्त साखर.
काही गोष्टी या आदर्श व्यक्तीच्या असतात, त्यांच्याकडून घेण्यासारखं बरंच काही असतं.

किती आणि काय लिहिणार ! या अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं पुस्तक म्हणजे एक माणूस. आपण किती गोष्टी वाचायच्या हे समोरच्या व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. जेवढ्या जास्त गोष्टी आपण समजून घेऊ तेवढा तो माणूस आपल्याला जास्त समजतो. प्रत्येकाने समोरच्या व्यक्तीच्या जास्तीत जास्त गोष्टी समजून घ्याव्यात, त्यामुळे त्या दोन व्यक्तींमधले बंध घट्ट होण्यास मदत होते आणि अर्थातच हा प्रयत्न दुतर्फा होणं गरजेचं आहे.

पुस्तकं तर वाचावीतच पण आजूबाजूला वावरणारी चालती बोलती पुस्तके जास्तीत जास्त वाचण्याचा आणि आपलं त्या पुस्तकाबरोबरचं नातं फुलवण्याचा प्रत्येकाने जरुर प्रयत्न करावा.

No comments:

Post a Comment