संध्याकाळ, खरं तर रोजच येते. पण आजची संध्याकाळ जरा वेगळी आहे. नेहमीच कधी निरभ्र आकाश तर कधी आकाशात दिसणारे पांढरे ढग, पण आज मात्र आकाश एकदमच वेगळं आहे.
हे आजच्या संध्याकाळचं वेगळेपण फारच सुखकर वाटतंय, कदाचित त्याच्या येण्याने. पण असं कोण हे असं हळूच आयुष्यात आलंय
! आता मला सगळीकडे तोच दिसतो, लांबूनच
मला बोलावतोय असं वाटतंय.
आज तर वारंही जोरदार सुटलंय, त्या वाऱ्याच्या
स्पर्शाने मन रोमहर्षित झालं आहे. हे वेडं मन स्वप्नांच्या जगात लगेच रमायलाही लागलं. मनात
नव इच्छांचे अंकुरही फुटायला
लागले. त्या इच्छा स्वप्नवत का होईना पण हळूहळू आकारही घेऊ लागल्या आहेत.
त्याच्या येण्याने हर्षभरीत झालेलं मन आता बागडायला लागलंय आणि त्या मनाबरोबर
मी ही. कोणीतरी माझ्याकडून हे सगळं करून घेत आहे असंच वाटतंय. खरंच त्याच्या
नुसत्या येण्याने, त्याच्या
ओढीने माझं मन अक्षरशः वेडं झालंय.
पण हा नक्की आहे तरी कोण ज्याच्या
येण्याने मला सगळंच वेगळं भासू लागलंय, मन झुलायला
लागलंय !
कडक उन्हाळ्याचे चटके सोसल्यावर
त्याने मनावर घातलेली अगदी हवीहवीशी वाटणारी फुंकरही मन रोमांचित करून टाकतीय. माझाच नाही
तर तो सगळ्यांचाच प्रिय, येतोच मुळी
तापलेल्या भूमीला शांत करायला आणि सकल जनांना भिजवून टाकायला...!
No comments:
Post a Comment