Tuesday, 28 June 2016

जुन्या गाण्यांच्या व्हिडीओजचं घबाड



मला घबाड मिळालंय घबाड...

...हो अगदी बरोबर.. मला घबाड मिळालंय, माझ्या हाती खजिना लागलाय..

खजिना म्हणजे तरी काय.. जी गोष्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची, अनमोल, आपल्याला अतिशय प्रिय, तिचा मोठा साठा मिळणे म्हणजेच की घबाड...
 
मला जुन्या हिंदी गाण्यांचे विडिओ मिळाले आहेत आणि थोडे थोडके नाहीत तर चांगले २५०. फार फार सुंदर आणि अवीट गोडीच्या गाण्यांचा खजिना आहे हा... अनेक अनमोल आणि पारखी रत्नं आहेत त्यात... त्यात माझा देव रफी आहे, किशोर आहे, मुकेशही आहे...त्यात स्वयंप्रकाशित आणि मौल्यवान अशा लता-आशा भगिनी आहेत, मन्ना डे आहे...कोणाकोणाची नावं घेऊ ! अशी मौल्यवान रत्नं त्या खजिन्यात आहेत. अलका, कविता, उदित अशा नवीन रत्नांनाही त्या खजिन्यात अगदी थोडीशी का होईना पण जागा मिळाली आहे.
 
गाण्यांचे विडिओ सुरु केले की हे घबाड मला नवनवीन सुखद धक्के देत राहतं... या सगळ्या रत्नांना ज्यांचा चेहरा आहे, ती देखील रत्नच की...! या सगळ्या रत्नांचा बोलका चेहरा हीच यांची अनमोलता... लग जा गले, करत साधना समोर येते.. या गाण्यात आपण डुंबलेलो असतानाच गाणं संपतं आणि देखो रुठा ना करो, करत देव-नूतन आपल्या भेटीला येतात, लगेच ए गुलबदन, करत शम्मी हजेरी लावतो...लगेच, तेरे बिना ज़िन्दगी से कोई, करत सुचित्रा-संजीव हजरच असतात... किती गाणी लिहू आणि रत्नं....! मधुबाला, नर्गिस, नूतन, मीना, नंदा, साधना, वैजयंती, आशा, देव, दिलीप, राजेश, अमिताभ, सुनील, राज, शम्मी, शशी,.....किती आणि कोणाकोणाची नावं लिहू..! तरी मी अजून सगळी गाणी पाहिलेली नाहीत, तेव्हा अजून कुठली रत्नं झाकलेली आहेत देवच जाणे...!

हे विडिओ सुरु करायचे आणि घबाडात रममाण व्हायचं...एका मागोमाग एक असे सुखद धक्के बसत असतात, ते खायचे आणि त्या खजिन्यातच रत्नांचं कौतुक करत, विधात्याने अशी रत्नं निर्माण म्हणून त्याचे आभार मानत त्या खजिन्यातच फिरत बसायचं... वेळ, काळ, स्थळ कशाकशाचं भान रहात नाही अशावेळी... आपण वेगळ्याच विश्वात जाऊन पोहोचतो, याचा अनुभव मी घेतलाय.
 
गाणी हा माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आणि त्यात जुनी तर आयुष्याचा अविभाज्य घटक, यांच्याशिवाय माझं आयुष्य म्हणजे पूर्ण निरसता... आणि त्याचाच एवढा मोठा साठा म्हणजेच "गीतमंजुषा" माझ्या हाती लागलाय, ही गोष्ट माझ्यासाठी अनमोल आहे, खजिना आहे, हेच माझ्यासाठी खरं घबाड...

...माझ्या हाती घबाड लागलंय घबाड...

No comments:

Post a Comment