Thursday, 16 June 2016

तीन पायांचं कुत्रं



मी रोज सकाळी चालायला घराबाहेर पडले की मला नेहमीची लोकं हमखास दिसतात. तेच काका, त्याच काकू, तेच समवयस्क सगळे चुकता शाली पांघरून, स्वेटर घालून, पायात शूज बीज घालून फिरायला बाहेर पडलेले दिसणारच. या सगळ्या लोकांबरोबर मला ठराविक ठिकाणी हमखास रस्ता हेच घर असलेली श्वान जमातही दिसतेच. ठराविक ठिकाणी ठराविक कुत्रं हे असणारंच, कोणी आपल्या शरीराला वेटोळं करून थंडीपासून स्वतःला वाचवत झोपलेलं तर कोणी काही खायला मिळतंय का या शोधात, शेवटी आपापल्या पोटाचा विचार यांना आपापलाच तर करायचा असतो. याच कुत्र्यांमध्ये सकाळी सकाळी आपल्या मालकाबरोबर मॉर्निंग वॉकला आलेली लाडाकोडात राहणारी कुत्रीही हमखास दिसतात. नशीब हा काय प्रकार असतो, हे त्या वेळी या दोन्ही प्रकारच्या कुत्र्यांकडे बघून चांगलंच जाणवतं.

पण आज सकाळी मी घराबाहेर पडले तेव्हा एक नवीन कुत्रं माझ्या पुढे होतं, अगदी राजेशाही थाटातलं. चांगलं धिप्पाड, एकदम उंच आणि तोंड साधारण भयानक वाटावं असं. ते रस्त्याने चालत असताना आजूबाजूने जाणारी लोकं पण जरा अंतर ठेवून जायची, किंवा एकदम दचकल्यासारखी थांबायची. मी जिथे चालायला जाते तिथल्याच रस्त्यावर एक तीन पायांचं कुत्रं आहे. म्हणजे एका पायाने लंगडं नाही तर त्याला मोजून तीन पाय आहेत. कसं तरी बिचारं लंगडत लंगडत चालत असतं. फार दया येते बिचाऱ्याची. हे धिप्पाड भयानक कुत्रं माझ्या पुढेच होतं आणि जिथे ते तीन पायांचं कुत्रं असतं त्या दिशेलाही ते वळलं. तिथे ते तीन पायांचं कुत्रं होतंच.

हे धिप्पाड कुत्रं त्या तीन पायांच्या कुत्र्याजवळ गेल्यावर त्याला काय झालं माहीत नाही, एकदम अचानक त्या कुत्र्यावर धावून गेलं. ते पायानं अधू कुत्रं एकदम घाबरलं. त्या धिप्पाड कुत्र्याबरोबरच्या बाईला पण आपलं कुत्रं आवरेना. पण क्षणात त्याच रस्त्यावरची अजून चार भटकी कुत्री त्या धिप्पाड कुत्र्यावर चालून आली. त्या पायाने अधू कुत्र्याला त्या चौघांनी पूर्ण cover केलं आणि त्या कुत्र्यावर जोरात भुंकू लागली .हा एक अनपेक्षित हमला असावा, त्या धिप्पाड कुत्र्यासाठी. ते धिप्पाड कुत्र वरमलं किंवा घाबरलं म्हणू हवं तर आणि शांतपणे आपल्या मालकिणीबरोबर निघून गेलं.

या एका घटनेने मला खरोखर अंतर्मुख केलं. एका रस्त्यावरच्या दुबळ्या कुत्र्यावर शक्तीशाली कुत्र्याने हल्ला चढवला तर रस्त्यावरचीच चार कुत्री त्याला वाचवायला आली तर परमेश्वराची सर्वात सुंदर आणि प्रगत कलाकृती असणाऱ्या मानवजातीची 'माणुसकी' कुठे गेलीय ? दिवसेंदिवस ही माणुसकी दुरापास्त का होत चालली आहे ? माणूस आपलाच धर्म का विसरतोय ?

No comments:

Post a Comment