एक विस्मृतीत गेलेली बाहुलीसारखी दिसणारी अभिनेत्री, दिव्या भारती. अगदी लहान वयात तिने भरपूर यश, पैसा पाहिला होता, अर्थात तिच्या जवळच्या लोकांना तिच्याकडून हवंही हेच होतं. मुलीच्या पैशावर ऐश करणारे आणि मुलीला पैसे कमावण्याचं साधन समजणारे आईवडील आणि ज्याच्याशी फक्त आणि फक्त भांडणं व्हायची असा नवरा अशा कुटुंबाबरोबर ती जगत होती.
एका पाठोपाठ एक सिनेमे सुपरहिट होत होते. पैसा तर पायाशी लोळण घेत होता. पण ती एकटी होती. खऱ्या प्रेमासाठी भुकेली होती. मनाने अगदी साधी. मृदू स्वभावाची. युनिटमधल्या कोणालाही पैशाची गरज आहे तर एका क्षणाचाही विचार न करता त्याला लगेच मदत करणारी, चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळवणारी, भरपूर मेहनती अशा या दिव्याला मनापासून समजून घेणारं असं कोणीच नव्हतं.
वयाच्या १९ व्या वर्षी तिचं नाव यशस्वी अभिनेत्री म्हणून श्रीदेवीनंतर घेतलं जात होतं. संध्याकाळी तिने आपल्या भावाबरोबर जाऊन वांद्रे येथील एक आलिशान फ्लॅट नक्की केला होता. त्याचे सगळे सोपस्कार पार पाडून आईवडिलांच्या घरी रात्रीचं जेवण घेऊन अगदी आनंदात ती घरी परतली होती आणि त्याच रात्री तिचा गूढ मृत्यू झाला. अर्थात गूढ म्हणणंही तसं योग्य नाही कारण जे काही घडलं ते बाहेर येऊ न देता आतल्या आत दडपून टाकलं होतं.

No comments:
Post a Comment