स्वामी रामदेव यांना बऱ्याच
स्त्रियांनी मागणी घातलेली होती आणि अगदी त्यांचं
सर्वस्व अर्पण करण्याची तयारीही दर्शवली होती, अशी बातमी
वाचली. त्यावरून मला एक किस्सा आठवला.
एकदा दुपारी मी पार्ल्याला लोकलमध्ये चढले. काही कामानिमित्त मला महालक्ष्मीला जायचं
होतं. दुपारची वेळ होती, गर्दीच्या
उलट्या दिशेने मी प्रवास करत असल्याने लोकलच्या महिला डब्यात
अजिबात गर्दी नव्हती. माझ्याबरोबरच कॉलेजच्या मुलींचा एक गृपही डब्यात चढला आणि मी जिथे बसले होते, तिथेच माझ्यासमोरच या मुली बसल्या. त्यांचे उंची कपडे, त्यांच्या गप्पा आणि त्यात डोकावणारे
विषय, त्यांच्याकडे असणाऱ्या महागड्या ब्रँडच्या वस्तू, या सगळ्यातून त्यांची श्रीमंती अगदी सहज लक्षात येत होती.
पुढे वांद्रे स्थानकात यांच्या अजून दोन मैत्रिणी आमच्याच डब्यात चढल्या, अशाच श्रीमंत वर्गातल्याच.
त्यातल्या एकीच्या हातात टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र होतं आणि त्याच्या
पहिल्याच पानावर रामदेवांची एक बातमी अगदी फोटोसहीत छापलेली होती.
ती बातमी दिसताच त्यांच्यातल्याच एका मुलीने बातमी वाचण्यासाठी पेपर हातात
घेतला आणि पुढे माझ्या जे कानावर पडलं ते माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक
होतं. या स्वतःच्याच मस्तीत जागणाऱ्या श्रीमंत मुलींकडून असं काही ऐकायला मिळेल
हे स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं.
जिने बातमी वाचायला पेपर हातात
घेतला ती म्हणते, यांची मी एकही बातमी सोडत नाही. मी यांची फॅन आहे. यांच्यामुळे
मी सकाळी उठून प्राणायाम करायला आणि सूर्यनमस्कार घालायला सुरुवात
केली. तर दुसरी म्हणते, मी तर यांच्यासाठी
काहीही करायला तयार आहे, आपला प्राण पण हजर. कोणी म्हणते, आत्ता लग्न करायला तयार आहे मी यांच्याशी. अजून दुसरी
म्हणते की यांच्याबरोबर लग्न करून तर मी कायम साडी किंवा सलवार
कमीजही घालायला तयार आहे....
मी यांची ही बडबड ऐकत होते, ऐकत होते आणि ऐकतच होते. सगळंच शॉकिंग.
एखादा श्रीमंत व्यावसायिक किंवा एखादा करमणूक क्षेत्रातल्या अविवाहिताला
मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हटलं जातं, एखादा गोंडस हिरो मुलींच्या हृदयात
असतो हे सगळं माहीत होतं पण बाबा रामदेव ? कायम भगवी
वस्त्रं परिधान करणारे, दाढी मिश्या
वाढवलेले बाबा रामदेव आणि कोण या श्रीमंत घरच्या आपलं आयुष्य
ऐषारामात घालवणाऱ्या मुली....?
हे सगळंच माझ्यासाठी खरंच
शॉकिंग होतं...
मी महालक्ष्मी स्थानक आल्यावर
उतरले पण त्या मुलींची त्यांच्या क्रशबद्दल म्हणजेच स्वामी रामदेव यांच्याबद्दलची बडबड
चालूच होती.
आता रामदेवांना कुठल्या वर्गातल्या
महिलांनी मागणी घातली हे माहीत नाही, पण श्रीमंत
वर्गातल्या अती हायफाय अशा कॉलेजमधल्या मुलींनाही त्यांच्यात भारी रस
आहे...
...अगदी latest heartthrob किंवा most
eligible Bachelor मध्ये असतो, अगदी तस्साच... हे मात्र नक्की...
बाबांची लोकप्रियता आणि चाहता
वर्ग याला कुठल्याही सीमा नाहीत...
No comments:
Post a Comment