Friday, 17 June 2016

कांगडामधील पहाट



हिमालयाच्या कुशीत वसलेलं हिमाचल. हिमालयाच्या ममता आणि वात्सल्यात अक्षरशः न्हाऊन निघालेलं राज्य हिमाचल. आपल्या देशाचा हा एक असा भाग आहे जिथे आजही माणूस निसर्गाबरोबर राहतो. निसर्गाचं प्रेम आणि माया तिथला माणूस अनुभवतो. हिमाचलकडे पाहिलं की जाणवतं की शहरांमधली धावपळ आणि काळज्यांनी भरलेल्या आयुष्यापासून किती दूर आहेत इथली लोकं !

याच हिमाचलमधल्या कांगडामधली एक पहाट. अजून फटफटलंही नव्हतं. मस्त ताजंतवानं वाटत होतं. मग काय ! पडले मी पण बाहेर.... एरवी हे गाव पर्यटकांनी गजबजलेलं दिसणार. ती गजबज नसलेलं साधं नैसर्गिक गाव, तिथलं वातावरण अनुभवण्यासाठी मी कांगडाच्या रस्त्यावर चालू लागले. अगदी ताजी हवा, तोंडातून बाहेर पडणाऱ्या वाफा आणि मी. रस्ते कसले, पायवाटाच त्या. खेड्यावर पांघरलेल्या त्या हिरव्या दुलईत तयार केलेल्या छोट्याशा पायवाटा. मी त्या पायवाटांवर तिथल्या निसर्गाला आणि त्याच्या कुशीतल्या त्या खेड्याला आपल्या डोळ्यात साठवत पुढे पुढे चालत होते. पहाटेच्या दवाने त्या हिरव्या दुलईच्या सौंदर्यात भरच घातली होती. छोटी छोटी घरं आणि भोवताली असणारी हिरवळ त्या घरांचं सौंदर्य वाढवत होती. ही अशी घरं बघताना एकदमच मस्त वाटत होतं. त्या घरांनाही आता जाग यायला लागली होती. कुठे पाण्याचा बंब पेटवण्याची लगबग, तर कुठे गाईच्या पहिल्या धारेचं दूध काढण्याची तयारी चालू होती. तेवढ्यात त्या छोट्याशा वाटेवर एकदम स्तब्ध व्हायला झालं. समोरून अगणित मेंढ्या येताना दिसल्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचा तो मेंढपाळ. अशा एवढ्या मेंढ्यांना एकत्रितपणे बघण्याचा योग कित्येक वर्षांनी आला होता. त्या त्यांच्या मार्गाने गेल्या आणि मी माझ्या वाटेने जाऊ लागले. आता मात्र रस्त्यावर वर्दळ दिसायला लागली. बारीक डोळ्यांचे तिबेटी आणि बौद्ध भिख्खू दिसायला लागले. हिमाचलची टोपी घातलेले तिथले मूळ रहिवासीही दिसायला लागले. बौद्ध भिख्खू, तिबेटी, नेपाळी आणि हिमाचलचे मूळ निवासी हिमाचलमध्ये अगदी गुण्यागोविंदाने राहतात.

मन नेईल तिथे आणि वाट फुटेल तिकडे जात असतानाच तिकडे लांब, चमकणारा हिमालय दिसायला लागला आणि माझ्याही नकळत माझी पावलं त्याच्या दिशेने वळाली. अजून सूर्योदय व्हायचा होता आणि स्फटिकाप्रमाणे चमकणारा तो हिमालय सूर्योदयाच्या वेळी कसा दिसतो याची ओढ मला त्या पर्वतरांगांकडे घेऊन गेली. हा रस्ता आणि त्याचं रुपडं अगदीच निराळं होतं. या रस्त्यावर असणारी उंच झाडं आणि मधूनच दिसणारी मोहरीची शेती त्या रस्त्याच्या सौंदर्यात भरच घालत होती. मोहरीची ती हवेवर डोलणारी छोटी छोटी फुलं मनाला अगदी मोहवून घेत होती. या मोहक शेताच्या शेजारीच, रस्त्याला अगदी खेटून उभी असणारी विचित्र पण तेवढीच सुंदर अशी झाडं होती. ती झाडं पाहिल्यावर त्यात कुठे शरीराला बाक देऊन एका पोझमध्ये उभी असलेली ओडिसी नृत्य करणारी नृत्यांगना दिसत होती तर कुठे सूर्यनमस्कारातल्या एकेका अवस्थेत किंवा योगमुद्रेत उभी असावीत अशी झाडं होती. या झाडांना बघताना फार मजा वाटत होती. त्या मोहरीच्या शेतांमध्ये जायचा खूप मोह होत होता पण मी तो आवरला आणि पुढे चालू लागले. माझ्या आजूबाजूला आता थोडे पर्यटकही दिसायला लागले होते आणि ते घाईघाईने कांगडाच्या पर्वतरांगांकडे चालले होते. तिथे खूप सुंदर सूर्योदय दिसतो असं म्हणतात. मलाही ती संधी सोडायची नव्हती. त्यामुळे मोहरीच्या शेतांना आणि त्या बाकदार झाडांना मागे ठेवून मी त्या पर्यटकांमधलीच एक होऊन जाऊ लागले. सूर्योदयाची जागा जवळच होती. तेवढ्यात एक चहाची छोटीशी टपरी दिसली. चहाचा वास दरवळत होता आणि छान एकावर एक रचून ठेवलेले कुल्हड दिसत होते. ही एक टपरी सोडली तर बाकी तिथे काही नाही. त्या चहावाल्याला लांबूनच बघत मी पुढे जाऊ लागले.

...आणि अखेर निसर्गाची जी किमया बघण्यासाठी मन आसुसलं होतं ती जागा आली. सूर्यदेवांच्या आगमनासाठी उत्सुक असणारे आठदहा जणं माझ्याबरोबर तिथे होते. समोर लांबच लांब पर्वतरांगा आणि त्या रांगांच्या अंगाखांद्यावर खेळणारा तो स्फटिकासारखा दिसणारा बर्फ. तेवढ्यात सूर्यदेवांच्या येण्याची चाहूल लागली. पर्वतांना न्हाऊ घालणारी सूर्यदेवांची पवित्र किरणं आणि सकाळच्या पहिल्या प्रहराच्या आगमनाने अक्षरशः सोन्यासारख्या चमकणाऱ्या कांगडाच्या त्या पर्वतरांगा. असं वाटत होतं की एखाद्या कलाकुसरीत तरबेज असणाऱ्या सोनाराने आपल्या कलेचं उत्तम प्रदर्शन घडवत त्या पर्वतांवर जणू सोन्याची चादरच पसरवली आहे. हे दृष्य इतकं मनमोहक होतं की ते पाहून निसर्ग आपल्याच रुपावर भाळेल...!

एवढा मोहक सूर्योदय बघितला...आणि मी मलाच विसरून गेले. मी कोण आणि कुठे आहे याचं भानच हरपून गेलं होतं. पण स्वतःला सावरत भानावर आले. थोडावेळ त्या निसर्गाशी संवाद साधत तिथेच थांबले. परतीचे वेध लागले तशी परत फिरले. मनात येणाऱ्या विचारांवर आता माझा ताबा राहिला नव्हता. निसर्गाला भेटण्यासाठी मी सुरू केलेला पायी प्रवास आता एका अत्युच्च पातळीवर येऊन पोहोचला होता, मनावर कुठला ताबा रहायला !

या सुंदर हव्याहव्याशा वाटणाऱ्या क्षणांची शिदोरी मनात साठवत आणि निसर्गाला मनोमन दंडवत घालत मी तेथून परतले.

No comments:

Post a Comment