Friday, 17 June 2016

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे



सकाळी उठल्या उठल्याच लक्षात आलं, आज १२ जून, पुलंची आज पुण्यतिथी. आणि एकदम मन गेलं २००० सालात. पु.ल. हे महाराष्ट्रातले पहिलेच लेखक की ज्यांच्यावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले. आमच्या घरापासून ‘वैकुंठ स्मशान भूमी’ तशी बऱ्यापैकी लांब आहे पण तरी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झाडलेल्या बंदुकीच्या फैरींचे आवाज आमच्या घरी ऐकू आले होते. १३ वर्ष झाली पण आज सकाळी सकाळी २००० सालातले ते आवाज परत एकदा स्पष्टपणे ऐकू येऊ लागले आणि काही क्षण एकदम स्तब्ध झाल्यासारखी झाले.

पु.ल., अतिशय अतिशय आवडतं व्यक्तिमत्त्व. सरळ, साधे, नीतीमूल्य जपून केलेले विनोद, केलेल्या कोट्या; यांनी परिपूर्ण त्यांचं विनोदी साहित्य. फक्त विनोदीच नाही, एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कधीही मन उदास असेल, आणि त्यांचं कुठलं पुस्तक वाचायला घेतलं की कधी आपण त्या पुस्तकात गुरफटले जातो हेच कळत नाही, मग आपण उदास होतो ? हा प्रश्न आपल्यालाच पडतो. परवाचीच गोष्ट, सागर, माझा नवरा ऑफिसमधून उशीरा घरी आला. खूप दमला होता. शांत बसून इअरप्लग लावून काहीतरी तल्लीन होऊन ऐकत होता. मला वाटलं गाणी ऐकत असावा. एकदम हसण्याचा आवाज येऊ लागला आणि एकदम त्याचा मूडही बदलेला दिसायला लागला. मग मीच कारण विचारलं तर कळलं की तो इअरप्लग लावून पुलंची “म्हैस” ऐकत होता. त्याचं दमणं, कंटाळणं कुठल्याकुठे पळून गेलं होतं. ही किमया होती पुलंच्या विनोदी साहित्याची.

माझं नशीब थोर म्हणून मला या अवलियाला प्रत्यक्ष दोन वेळा भेटण्याचं भाग्य लाभलं. त्यांच्या पुण्यातील भांडारकर रोडवरील ‘मालती माधव’ मधील निवासस्थानी झालेल्या दोन्ही भेटी मी कधीच विसरू शकणार नाही. ते भारावलेले क्षण आठवले की मन आजही रोमांचित होतं.

आजच्या काळात जिथे माणसाचं हसणं दुर्लभ होत चाललंय तिथे पुलंची पुस्तकं म्हणजे मोठा अनमोल हास्याचा खजिनाच. त्यामुळे आजच्या काळातही पुलंच्या पुस्तकांचं महत्त्व कमी होत नाही आणि होणारही नाही. म्हणूनच आजही त्यांची पुस्तकं, पुस्तक प्रदर्शनात किंवा पुस्तकांच्या दुकानात एकदम दर्शनी शेल्फ मध्ये असतात.

आज पु.ल. आपल्यात नाहीत पण त्यांच्या जाण्यानी निर्माण झालेली खूप मोठी पोकळी तशीच आहे आणि भविष्यातही तशीच राहणार. हे असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व, स्वच्छ विनोदाचा सम्राट हजारो वर्षात एकदाच जन्माला येतो.


No comments:

Post a Comment