अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मदन पुरी यांचे धाकटे
भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून
मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं
ते स्वतःच्या जोरावर करायचं. नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं
नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे
मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची
नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे
वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू
त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल
नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही. ते हिंदी चित्रपटांमध्ये नायक नाही बनू शकले
पण खलनायक आणि चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी घडवलेली कारकीर्द कुठल्याही यशस्वी नायकाच्या
तोडीची नक्कीच आहे.
त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की
त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत
असत. खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते.
आपण त्यांना अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. त्यांचे ते डोळे, खलनायकी, गंभीर चेहरा कोण विसरेल ? पण प्रत्यक्ष जीवनात ते किती
साधे आणि कुटुंबवत्सल होते हे दर्शवणारा हा त्यांचा एक कौटुंबिक फोटो. या फोटोत त्यांची
पत्नी उर्मिला दिवेकर पुरी, मुलगा राजीव, मुलगी नम्रता आणि स्वतः अमरीश पुरी.

No comments:
Post a Comment