Monday, 20 June 2016

काळाघोडा वेस्टसाईड आणि श्रीमंत



काल ससून लायब्ररीजवळच्या “वेस्टसाईड” या दुकानात गेलो होतो. एकसे एक पुरातन अशा ब्रिटीशकालीन इमारातींच्यामधेच टाटांचं हे दुकान. दुकान जरी वेस्टसाईड वगैरे नावाचं असलं तरी इमारत मात्र जुनी, आजूबाजूच्या पुरातन इमारतींसारखीच. तो काळाघोडा आणि एकंदर आजूबाजूचा भाग म्हणजे मुंबईतला एक गर्भश्रीमंत भाग. त्यामुळे त्या दुकानातही खानदानी किंवा गर्भश्रीमंत अशीच लोकं दिसत होती. आपली श्रीमंती ही कशी आपल्या डोक्यापासून पायापर्यंत बरोबर दिसली पाहिजे, याची ही लोकं पुरेपूर काळजी घेताना दिसत होती. चेहरा दिसला की आधी त्यांची धनिकता, श्रीमंत अॅटिट्युड दिसणार आणि मग चेहरा आणि हेच देहबोलीतूनही दिसत होतं. असो.... त्यांची श्रीमंती त्यांच्यापाशी. तर अशा धनिक लोकांमध्ये थोडा वेळ या लोकांचाच एक भाग बनत आम्ही त्या दुकानात फिरत होतो.

रोज लागणाऱ्या गोष्टी जसं फळं, भाज्या, धान्य वगैरे या भागात गेलो. एके ठिकाणी आंघोळीचे साबण ठेवले होते. पण नेहमी जे बाहेर मिळतात किंवा ज्यांची जाहिरात असते ते अजिबात नाही, तर हाताने बनवलेले साबण आणि ते ही अगणित प्रकारच्या वासाचे. ज्या ज्या नैसर्गिक गोष्टींना वास असतो त्या त्या सगळ्या प्रकारचे साबण तिथे होते आणि ते ही त्या अती उच्चभ्रू लोकवस्तीत शोभणारे. आता वेलदोडा, मालती माधव असे जर तिथे साबण असतील आणि ते घ्यायचे असतील तर स्वाभाविक आहे, माणूस वास घेऊन बघणार. पण इथेही ही लोकं आपला श्रीमंती बाणा सोडत नव्हती. असे येणार ताठ मानेने, साबण हातात घेऊन बघणार ठेवून देणार. मग आपल्या बरोबरच्या माणसाला म्हणणार की पुदिना साबण.....कसा असेल, वास असा असेल का, वगैरे... आता तुला वास कसा असेल हा प्रश्न पडलाय तर ने की नाकाजवळ तो साबण. पातळ प्लॅस्टीकमधून येईल की वास, पण नाही आणि त्यांची मुलं पण तशीच. नीट काही कळत नाही म्हणून तिथेच घुटमळत रहात होती. फिरून फिरून चार वेळा तिथेच येत होती पण आपला अती श्रीमंती बाणा सोडत नव्हती.

आम्हालाही ते साबण घ्यायचे होते. म्हणून आम्हीही त्या साबणांजवळ गेलो. आता मोती साबणाचा वास कसा असतो हे माहीत आहे पण हे असे चाफा आणि संत्रं अशा वासाचे साबण तिथे असतील आणि ते घ्यायचे असतील तर माणूस वास घेऊन बघणारच की आणि कुतूहल असतं ते वेगळंच. हे असले अती शिष्टाचार वगैरे प्रकार आपलं मन मानत नाही. मनाला कसं एकदम मोकळं वागायला आवडतं. मग काय एकेक साबण घे, त्याचा वास घे..... अगदी तो वास कसा आहे हे चेहऱ्यावरही दाखवत नवऱ्याच्या नाकाजवळ साबण नेत त्यालाही साबणांचा वास दाखव असं माझं सुरू झालं. तशी ती लोकं परत आजूबाजूला दिसायला लागली. हळूच माझ्याकडे बघत साबण हातात घेणं चालू झालं, कदाचित नीट वळून न बघता हळूच बघणं आणि माझ्या कृतीचा अंदाज घेणं हे एवढंच त्यांच्या शिष्टाचारात बसत असावं. माझं लक्ष होतं पण त्यांना काय कसं वाटत आहे, हा विचार करणं मला गरजेचं वाटलं नाही. आम्ही साबण घेऊन तिकडनं थोडे बाजूला झालो तर ही लोकं गेली त्या साबणांजवळ. चेहरा तसाच श्रीमंत अॅटिट्युडवाला पण हळूच साबण मात्र नाकाजवळ जाऊ लागला. मी बघत होते आणि त्यांचंही माझ्याकडे लक्ष होतंच. वास नाकात जाताच त्या श्रीमंत अॅटिट्युडवाल्या चेहऱ्यावर मंद हसू दिसायला लागलं. एक, दोन, तीन करत मगाशी घुटमळत बसणारी लोकं तिथे यायला लागली आणि मोकळेपणे तिथे वावरायला लागली. साबणाचा वास घायची. वास घेऊन झाल्यावर हा.... करत वास कसा आहे ते व्यक्त करू लागली आणि ते ही अगदी जोरजोरात. ते सगळं बघून मला अक्षरशः हसू येत होतं. मगाशी हळूच माझ्याकडे बघणारे चेहरे आता मात्र माझ्याकडे बघत मंद हास्य देऊ लागले. मी पण त्यांच्याकडे बघून मंद हासले आणि तिथून पुढे गेले.

परत जाताना त्यातली एक म्हणाली, thanks या अशा मोकळेपणामुळे खूपच छान वाटलं. तिच्या सुरात सूर मिसळायला अजून तीन चार जणं आली.

आपला श्रीमंत अॅटिट्युड बाजूला ठेवल्याने यांना छान वाटलं आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलं. पण मुळात असं बंदिस्त मानसिक जीवन जगावंच का आणि ते ही अशा दुकानांमध्ये ? तुम्हाला स्वतःच्याच शहरामध्ये आपल्या कुटुंबीयांबरोबर असताना मनमोकळेपणाने वागता येत नसेल तर, तुम्ही खूपच कमनशिबी आहात असंच वाटतं. तुम्ही किती का श्रीमंत असेनात, मनाला जर बंदिस्त करून ठेवण्याची वेळ येत असेल तर त्या पैशाचा काय उपयोग ?

खरंच, ते आपलं “सदाशिव पेठी” अॅटिट्युड बाळगत मध्यमवर्गीय असणंच बरं, निदान मनाला असं बंद करून तरी ठेवावं लागत नाही.

No comments:

Post a Comment