Monday, 20 June 2016

ललिता पवार



ललिता पवार यांच्याबद्दल लिहिण्यासारखं बरंच काही आहे. आपण नैसर्गिक अभिनय करून दाखवावा, म्हणजे आपली एक चांगली छाप दिग्दर्शकावर पडेल असा विचार करत नवख्या भगवान दादांनी ललिता बाईंच्या श्रीमुखात अशी वाजवली की त्यांचा डोळा जबरदस्त सुजला आणि अर्धांगवायूने बाई आजारी पडल्या. दादांच्या या उत्साहाची कल्पना दिग्दर्शकालाही नव्हती आणि बाईंनाही याची थोडी जरी कल्पना असती तरी त्यांनी आयत्यावेळी थोडी मान हलवली असती, पण यामुळे ललिता पवार यांचा एक डोळा बारीक झाला आणि त्यांची अभिनय कारकीर्द वेगळ्याच रुळावर गेली.
 
ललिता हे त्यांचं रुपेरी पडद्यावरचं पहिलं नाव, जे त्यांना आवडलं आणि तेच त्यांनी खऱ्या आयुष्यातही स्वीकारलं. पवार हे त्यांच्या पहिल्या नवऱ्याचं आडनाव, लग्न काही फार टिकलं नाही पण रुपेरी पडद्यावर "ललिता पवार" हे असंच नाव तोपर्यंत लोकप्रिय झाल्याने ललिता नावाबरोबर पवार हे आडनाव जोडलं गेलं ते कायमचंच..
 
श्री ४२० या सिनेमात ललिता पवार यांनी एक प्रेमळ केळीवाली बाई साकारली होती. या चित्रपटासाठी राज कपूर जमवाजमव करत होता आणि त्यातल्या या भूमिकेसाठी त्याने पवार बाईंना घेतलं. चित्रीकरणासाठी त्या सेटवर गेल्या. त्यांच्या पहिल्या दृश्याआधी राज त्यांना ही भूमिका कशी करायची हे समजावू लागला. त्याने बोलणं सुरु केलं आणि त्याला मध्येच तोडत त्या म्हणाल्या, आता तू मला सांगणार का ही भूमिका कशी करायची ते... माझ्या भूमिकेचं मी बघून घेईन, तू बाकी चित्रपटाचं बघ... राज गप्प बसला, समोरून वारच जो असा झाला होता ! (हा होता अस्सल रांगडा मराठी हिसका)
संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण झालं. तेव्हा राज बाईंना म्हणाला, मला जेवढी अपेक्षित होती त्यापेक्षा कितीतरी अधिक नैसर्गिक भूमिका तुम्ही वठवलीत..
 
ललिता पवार यांनी स्वतःची अशी कठोर, कजाग अशी छाप चित्रपटसृष्टीवर सोडलीय, त्यामुळे रामानंद सागर यांना मंथरा फक्त आणि फक्त यांच्यातच दिसली. रामायणात मंथरा तर साकारली, पण तोपर्यंत त्या थकायला लागल्या होत्या. तब्येतही बरोबर नसायची. पुढे तर त्यांना कर्करोग झाला, या रोगाचे परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ लागले आणि त्या चित्रपटसृष्टीपासून दूर होऊ लागल्या. २६ फेब्रुवारीला नवरा मुंबईहून त्यांना पुण्याला फोन करत होता, फोन उचलत नाही म्हणून त्यांचं मुंबईला गेलेलं कुटुंब तडक पुण्याला आलं पण दोन दिवस आधीच २४ फेब्रुवारीलाच ललिता पवार आपल्या कुटुंबाला सोडून, त्यांच्या चित्रपटसृष्टीला, चाहत्यांना सोडून गेलेल्या होत्या.

 

No comments:

Post a Comment