Monday, 20 June 2016

चिमणी

आई गं..... परत या चिमण्यांनी इथे घरटं बांधायला सुरुवात केलीय बघ...
 
दोनच दिवसांपूर्वी आमच्या समोरच्या घरातून हा असा आवाज ऐकायला मिळाला. हे आता नेहमीचं झालंय, इमारतीतल्या घरांमध्ये या चिमण्या सर्रास घरटं बांधायला म्हणून गवत आणून ठेवायला सुरुवात करतात. लोकांनी ते गवत काढून टाकलं की परत परत येतात आणि शेवटी घराच्या बाल्कनीच्या, खिडक्यांच्या बाहेर जिथे शक्य असेल तिथे या चिमण्या घरटी बांधतात. लिफ्टच्या बाहेर, इमारतीच्या प्रवेश स्थानी केलेल्या इंटिरियरमध्ये जिथे जागा मिळेल तिथे या चिमण्यांनी घरटी बांधली आहेत. त्यामुळे आमच्या इथे सगळ्या पक्षांमध्ये आता चिमणीचा दबदबा निर्माण झाला आहे. पोपटांच्या कर्कश्य कॅव कॅववर चिमण्यांची चिव चिव आता वरचढ ठरू लागली आहे. घाबरट पारवे तर चिमण्यांच्या जवळपासही फिरकत नाहीत.

मधली काही वर्ष अशी स्थिती होती की चिमणी हा पक्षीच दिसेनासा झाला होता. अर्थात याची आठवणही बहुतेकांना वृत्तपत्रांनीच करून दिली होती. लोकांच्या या विषयावर भरपूर गप्पा रंगत, अर्थात काळजीपोटीच... आता चिमणी हा पक्षी इतिहास जमा होणार की काय याची चिंताही सर्वांनाच लागून राहिली होती.
 
पण अचानक दिवस पालटले, सर्वांना सुखाचा धक्का देत चिऊताईंचं दर्शन हळूहळू घडायला लागलं. एखादी चिमणी जरी दिसली किंवा तिचा आवाज जरी ऐकला तरी एकदम बरं वाटायला लागलं. असं करत करत आता चिमण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. निदान, कधी काळी एक चिमणी नावाचा पक्षी होता, असं म्हणायची वेळ तरी निदान आता आपल्यावर येणार नाही.
 
जागतिक स्तरावर चिमण्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट पाहता २० मार्च हा दिवस "जागतिक चिमणी दिन" म्हणून साजरा होऊ लागला आणि चिमण्यांची संख्या वाढावी म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रयत्न केले जाऊ लागले.
 
एक होती चिऊ आणि एक होता काऊ, या गोष्टीतल्या काऊबरोबरच चिऊही कायम सर्वसामान्यांना सहजपणे दृष्टीस पडो, हीच इच्छा.

No comments:

Post a Comment