Friday, 17 June 2016

मॅगी आणि भारतीय पदार्थ



उपमा, पोहे, शीरा, थालिपीठ, उकड, पोळीचा लाडू, फोडणीची पोळी अशा प्रकारच्या रुचकर आणि पौष्टीक पदार्थांची जागा घ्यायला " मॅगी " आली होती. दोन मिनिटात बनायची आणि चवदारही होती. स्वस्त होती आणि तयार करायलाही सोपी. मधल्या वेळचं खाणंच नाही तर जेवायलाही घरात मॅगी बनू लागली. कधीकधी करत करत आठवड्यातून हमखास एक दोन वेळा बनायला लागली.
 
मॅगी भयंकर यशस्वी ठरली. भारताबाहेरही विकली जाते पण सगळ्यात जास्त भारतातच विकली जायची. आपल्या पारंपारिक पदार्थांना मागे सारू लागली. पोहे, उपमा यापेक्षा लोकांना मॅगीच आवडू लागली.
 
शेवटी मॅगीच ती, दोन मिनिटात बनणारी. एक फास्ट फूड. मॅगी खाल्ल्यावर असं कायसं पोषण मिळणार ? पण या मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं.
 
पण आज ती मॅगीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हळूहळू तिच्यावर बंदी येऊ लागली आहे. हे वाद खरे की खोटे यात मला शिरायचं नाही पण शेवटी परत हेच सिद्ध होत आहे की फास्ट फूड नाहीच शेवटी आपले पारंपारिक पदार्थच काय ते शाश्वत, हे पदार्थ हेच आपलं खरं अन्न. मॅगी, एक अतिक्रमणच होतं आपल्या मूळ पदार्थांवर झालेलं...!
 
मॅगीच नाही तर कुठलेही झटपट बनणारे नूडल्स योग्य नाहीतच. वेळ नाहीये ? घाई आहे ? मग कुठलंही फळ खाणं योग्य. फळं महाग वाटत असतील तर किमान केळं हे फळ नक्कीच परवडणारं, निदान ज्यांना मॅगी परवडते त्यांना तरी. मॅगी बनवायला दोन मिनिटं तरी लागतात, केळ्याला तर तेवढाही वेळ लागत नाही.
 
पण, आपले पारंपारिक भारतीय पदार्थच काय ते आपल्याबरोबर कायम राहणार... हेच नक्की...!

No comments:

Post a Comment