वसंत ऋतूची चाहूल म्हणजे कैऱ्यांची चाहूल आणि ग्रीष्माची चाहूल म्हणजे आंब्याची
चाहूल. खरं तर चैत्राच्या नव्या पालवीबरोबरच आंब्याचे वेध लागतात. उन्हाळा म्हटलं की
मुंबईकराच्या नशिबात घामाची नक्को करणारी चिकचिक, पण उन्हाळा येतो तोच मुळी आंब्यांना
घेऊन.
खरं तर आंबा हे फळ अखिल मानव जातीचं आवडीचं फळ. पण अस्सल मराठी माणूस ह्या आंब्याच्या
मौसमाला एक उत्सव बनवतो. त्याची सुरुवात कैऱ्यांपासून होते. कैऱ्या बाजारात दिसायला
लागल्या की घरात बरण्या भरून कैऱ्यांचे निरनिराळे प्रकार दिसू लागतात. मग कैरीचा एखादा
पदार्थ जेवणाच्या ताटात महत्त्वाची जागा पटकावतो. मग येतात आंबे आणि मग कैरी थोडीशी
बाजूला पडते आणि हा फळांचा राजा ती जागा घ्यायला पुढे सरसावतो. हा उत्सव आंबे बाजारातून
जाईपर्यंत चालूच असतो.
मुंबईचा विचार केला तर, बाहेरच्या राज्यांमधून लोकं मुंबईत आली पण येताना आपल्याबरोबर
आपापली खाद्यसंस्कृती घेऊन आली आणि ही संस्कृती इतरांनीही आत्मसात केली, म्हणूनच आज
मराठी घरांमध्येही छुंद्याला स्थान आहे आणि गुजराथी घरांमध्ये आंब्याची डाळ आणि मराठी
पद्धतीचं लोणचं पोहोचलंय. ह्या लोकांबरोबर ह्या राज्यांमधल्या कैऱ्या आणि आंबेही मुंबईत
येऊन पोहोचले. आंबा कितीही महाग असू देत पण अस्सल मराठी मुंबईकर आंबा खाल्ल्याशिवाय
रहात नाही. खरं तर हे वैशिष्ट्य अस्सल मराठी माणसाचं सुद्धा म्हणा. हापूस हा लाडका
असला तरी मुंबईत अनेक जातींचे आंबे मिळतात आणि हा अस्सल मुंबईकर त्या प्रत्येक प्रकारच्या
जातीचा मनमुराद आस्वाद घेतो. अगदी तोतापुरी बाजारातून जाईपर्यंत खऱ्या मुंबईकराच्या
घरात आंबा नाही असं होत नाही.
या आंब्याबद्दल चर्चा करायलाही मुंबईकर पुढे, मोठमोठ्या चर्चा रंगतात या आंब्यांच्या.
डिसेंबर उलटून गेला आणि अवेळी पाऊस पडला तर इथे मुंबईत बसून या मुंबईकराला चिंता असते
ती कोकणातल्या आंब्याच्या मोहराची. चर्चांना सुरुवात ती तिथूनच. मग लोकल असू देत नाही
तर सोसायट्यांमधल्या गप्पा असू देत या चर्चांना अगदी ऊत येतो. पहिली हापूसची पेटी मुंबईत
आली की त्याची ठळक बातमी वर्तमानपत्रात येते आणि ती कितीला विकली गेली तो ही मग एक
अजून चर्चेचा विषय. आंब्याच्या मोहरापासून ते कुठल्या मार्केटमध्ये आंबा कसा आहे, त्याचे
भाव कसे आहेत किंवा कुठे कसा पिकवलेला आंबा मिळतो, सगळे सगळे विषय हे खास चर्चेचे.
आता आंबा खाण्याची पद्धत. काही लोकं आंब्याच्या फोडी करणार, आणि त्या फोडी एकेक
अलगद खाणार. अलगद अशासाठी, खाताना एकही थेंब कपड्यांवर पडून डाग पडायला नको, म्हणून.
कोयी चोखून खायच्या !.......शीsss... चांगलं
दिसत नाही. छे छे, हा असा आंबा खायचा म्हणजे फारंच अवघडल्यासारखं वाटतं बुवा. आंबा
खायचा तर कसा, असा साहेबी नाही. आंबा चोखून खाल्ला पाहिजे, खाताना रस त्या आंब्याच्या
बाहेर येऊन त्याचा ओघळ हातावर आला पाहिजे, दोन्ही हात बरबटले पाहिजेत. साल, कोय व्यवस्थित
चोखून खायला पाहिजे. रस असा कपड्यांवर पडला पाहिजे. हे सगळं होत असताना आपलं लक्ष मात्र
फक्त आंब्यावर पाहिजे, हातावरून खाली ओघळणाऱ्या रसावर नाही. मग खरा आंबा खाल्ल्यासाराखा
वाटतो. पायरी आंब्याचा रस काढला तरी तिथेही हेच, साली, कोयी या व्यवस्थित चोखून खाल्ल्याच
पाहिजेत.
आता तुम्ही नक्की म्हणत असाल, कसली हावरट आहे ही. पण काय करणार, अस्सल सदाशिव पेठी
पुणेकर आहे, एखाद्या गोष्टीचा मनमुराद आस्वाद घेणं रक्तातच आहे.
No comments:
Post a Comment