शक्यतो चित्रपट बघायला आम्ही
फार चित्रपटगृहांमध्ये जात नाही. चित्रपट असाच हवा आणि तसाच हवा, हे फार असतं आमच्याकडे. काल वर्तमानपत्रात "म्हैस"
सिनेमाची जाहिरात पाहिली आणि सिनेमा बघावासा वाटला. म्हैस, पुलंचं
एक अतिशय आवडतं कथानक आणि संवाद लेखक म्हणून नावही पुलंचंच. संगीत आनंद मोडक यांचं.
इथेच खरं तर चित्रपटाने निम्मी बाजी मारली होती. तेव्हा हो नाही हो नाही करत मनात पुलंना
ठेवून काल रात्री आठच्या शोसाठी आम्ही बाहेर पडलो. पण तिकीट खिडकीपर्यंत आम्हाला पाच
सात मिनिटं उशीर झाला. सिनेमा वेळेवर सुरु झाला होता. सुरुवात बुडवून सिनेमा बघायला
जायला मलाच आवडत नाही. सिनेमा बघायचा तर पहिल्या जाहिरातींपासून शेवटच्या नावांपर्यंत
आणि त्यात म्हशीला तर अजिबात अर्धवट बघायचं नव्हतं. मग काय मूड आॅफ करत तिकडनं बाहेर
पडलो. मराठी सिनेमाची तहान काल मराठी मिसळ आणि पन्ह्याने भागवली.
आज परत नवीन जोमाने म्हशीचा
बेत आखलाच आणि वेळेच्या बरंच आधी तिकीट खिडकीवर येऊन धडकलो. मागच्या दोन रांगा भरलेल्या
होत्या. मनात म्हटलं, अरे वाह... सोमवार असून सुद्धा लोकांनी बुकींग केलंय.
आत गेलो. आमच्या स्क्रीनच्या बाहेर बसलो. आम्ही दोघेच. सिनेमा सुरु व्हायला पाच मिनिटं
होती आणि कोणीही आलेलं नव्हतं. आपण बरोबर ठिकाणी आहोत ना, हा प्रश्न
पडला. तिकिटावर स्क्रीन क्रमांक लिहिलेला असूनही परत एकदा जाऊन खात्री केली. ही मराठी
सिनेमाची अवस्था बघून फार वाईट वाटत होतं. मन उदास झालं. त्या उदास मनानेच चित्रपटगृहात
गेलो. एवढं मोठं थिएटर आणि प्रेक्षक दोन, आमच्यासाठी
खास शो असावा असं वाटावं. जन गण मन सुरु झालं. दोन्ही प्रेक्षक उभे राहिले. मागच्या
भरलेल्या दोन्ही रांगा रिकाम्याच. तेवढ्यात एक प्रेक्षक येऊन बसला. इकडे सिनेमा सुरु
झाला होता आणि रत्नागिरी-मुंबई एसटीत एकेक प्रवासी येऊन बसायला लागले तसे इकडे प्रेक्षकही
एकेक यायला लागले. असं करत करत प्रेक्षक संख्या सहा झाली. सहा प्रेक्षक आणि नंतर मध्येच
हळूच दोघांची पळ काढल्यावर उरलेले फक्त चार आणि एवढं मोठं थिएटर, AC नेहमीप्रमाणेच. थंडी वाजायला लागली.
सिनेमा चालू होता आणि राहून
राहून फक्त पुलं आठवत होते. शेवटी त्यांच्या प्रेमाखातरच सिनेमा बघायला गेले होते.
आणि दुसरे आनंद मोडक, ते ही आता आपल्यात नाहीत.
सिनेमा सुरु झाल्यापासून डोक्यात
पुलंची म्हैस अगदी घट्ट बसलेली होती. एक असं कथानक जे अमर आहे. कधीही वाचा, तुम्हाला असीम आनंद देऊन जातं. कुठेही मध्ये कंटाळा न
येणारं, पण सिनेमा याच्या विरुद्ध. दिग्दर्शकाचा एक फसलेला प्रयत्न.
मध्ये बऱ्याच वेळा कंटाळवाणा होणारा. दिग्दर्शन हा प्रकारच सिनेमात नाही. थोडक्यात
सांगायचं तर पुलं दिग्दर्शकाला झेपलेच नाहीत.
पुलंच्या प्रेमाखातर आपण त्यांच्या
म्हशीला बघून आलो, असं म्हणत शेवटी घरी परतलो...
आता या सिनेमाचा उतारा करणार
पुलंची म्हैस त्यांच्याच आवाजात ऐकणार आणि मगच झोपणार...
No comments:
Post a Comment