Saturday, 25 June 2016

थोडी उघडीप......अती पावसानंतरची



आज भास्कररावांना जरा मुंबईच्या धरतीकडे येऊन डोकावता येईल असं वाटलं होतं. तासभर झालाय वर्षाराणी जरा विश्रांती घेत असल्याने नारायणराव आले खरे प्रजेची पाहणी करायला पण मेघराजांनी त्यांचा मार्ग अडवलाच आणि त्या तेजस्वी किरणांचं दर्शन होणार असं वाटत असतानाच अचानक मेघराजांनी हाताबाहेर जाणारी परिस्थिती सांभाळली. चालायचंच.... एकेकांचे दिवस असतात आणि त्या दिवसात त्यांचीच चलती असते आणि असायलाही हवी.

जवळजवळ गेले पाच दिवस अविरत फलंदाजी करणारा महान फलंदाज पाऊसकर सध्या विसावलाय आणि त्यामुळे परिसराला एक प्रकारची शांतता लाभली आहे. नेहमीचे रस्त्यावरचे आवाज येऊ लागले आहेत. नेहमीच्या पक्षांचे आवाज आज इतक्या दिवसांनी ऐकायला मिळाले. अगदी कर्कश्श आवाजाचे पक्षी, कांठळ्या बसवत उडणारे राघू, फारसा न आवडणारा कावळ्यांचा आवाज, कर्णकर्कश्य आवाजात ओरडणारी खारुताई, असे ज्यांचा आवाज कधीकधी अगदी नकोसा होतो, यांचे आवाजही आज कसे कानाला गोड लागत आहेत ! वर्षाने न्हाऊ माखू घातल्यावर एकदम स्वच्छ झालेले चिऊताई, साळुंकी, शेपटी हालवणारा पक्षी असे सगळे पक्षी आज इतक्या दिवसांनी दिसले ! काहींनी तर माझ्यासमोर ओलंचिंबं अंगं झटकलं. अंगावर चोच फिरवून ते स्वच्छ केलं. एक क्षण वाटलं, इतके दिवस हे पक्षी कुठे राहिले असतील ?

बाहेरची झाडं तर अजून ओली चिंबच आहेत. कुठे खोडात, कुठे फांद्यांवर सगळीकडे पाणी अंगावर घेऊन उभी आहेत. एवढंच काय पण वेटोळ्या पानांच्या मुठीही पाण्याने काठोकाठ भरलेल्या आहेत. नुकत्याच न्हाऊन आलेल्या केसांमधून थेंब थेंब पाणी गळावं तसं आता हळूहळू या वेटोळ्या पानांमधूनही पाणी गळेल. वर्षाराणी विश्रांती घेत असली तरी समीरराजे आपलं कार्य करत असल्याने ही झाडं, पानं, फुलं वर्षाराणीच्या पाऊल खुणा पुसत नेहमीच्या पण स्वच्छ, तेजस्वी रुपात येतील.

थोडा वेळ असंच आपलं नवीन सौंदर्य मिरवावं असं या झाडांना वाटेल, जरा मनसोक्त बागडावं असं पक्षांनाही वाटेल आणि तोपर्यंत वर्षाराणीची विश्रांती संपेल आणि ही सृष्टी पुन्हा ओली चिंब होईल.

No comments:

Post a Comment