Friday, 24 June 2016

आईभक्त प्रामाणिक चोर



साधारण पस्तीशीतल्या मित्रांनी ठरवलं की १५ ऑगस्टला सकाळी आपल्या रुपारेल महाविद्यालयात एकत्र जमायचं, ध्वजवंदन करायचं, जुन्या शिक्षकांना भेटायचं, महाविद्यालयाच्या आठवणी ताज्या करायच्या आणि हमखास ठरलेल्या ठिकाणांना भेटी देत मरीन ड्राइव्ह गाठायचं .सगळ्या जुन्या आठवणी परत जगायच्या. हा सगळा प्रवास स्वतःच्या गाड्यांनी करता जुन्या आठवणींमध्ये बेस्ट बस आणि लोकल ट्रेन्सनी करायचंही ठरलं.

ठरल्या प्रमाणे या मित्रांचं १५ ऑगस्टला मजा करणं चालू होतं पण तेवढ्यात एका मित्राला आपलं पाकीट चोरीला गेल्याचं लक्षात आलं. पण बाकीच्या मित्रांनी ही चोरी आपल्या आनंदाच्या आड येऊ दिली नाही आणि जुन्या आठवणींना उजाळा देत संध्याकाळी मित्रमंडळी आपापल्या घरी परतली. ज्याचं पाकीट मारलं, तो ही घरी आला.-यापैकी मोठ्या प्रमाणावर CASH, PAN card, driving license, debit card अशा -याच गोष्टी चोरीला गेल्याने तो उदास होता .जाऊ देत हे सगळं जायचं होतं असं त्याची आई आणि बायको त्याला समजावत होत्या.

असं करत रात्र झाली. साधारण .३० च्या सुमारास दारावरची बेल वाजली .त्यानेच दार उघडलं .दारात आलेल्या माणसाने त्याच्या हातात एक पाकीट दिलं आणि म्हणाला हे तुमचं पाकीट. आईशप्पथ जसं होतं तसं परत आणलंय, रुपयालाही हात लावला नाही. अशा पद्धतीने मिळलेलं आपलं मारलं गेलेलं पाकीट बघून त्याला क्षणभर काही कळलंच नाही. त्याने त्या दारी आलेल्या माणसाला विचारलं की हे तुमच्याकडे कसं आलं ?

तो माणूस सांगू लागला, दादरला मी हे तुमचं पाकीट मारलं. हे वाक्य ऐकूनच ज्याचं पाकीट होतं तो आणि त्याच्या घरचे आश्चर्यचकितच झाले. तो चोर पुढे सांगू लागला, पाकिटात बराच माल होता, वाटलं आज बास झालं, एकातच रोजच्यापेक्षा जास्त माल मिळालाय. म्हणून भिवंडीला घरी परतलो .घरी जाऊन पाकीट उघडलं तर हाताला आधी एक फोटो लागला. फोटो पाहिला आई आठवली. आई ही देवापेक्षाही कशी महान, हे सांगणारा दोन ओळींचा शेर वाचला आणि मी सुन्न झालो .तुमच्या आईचा फोटो आणि तो शेर वाचून मी तुमच्या एकाही रुपयाला हात लावू शकलो नाही. ठरवलं हे पाकीट परत करायचं, म्हणून भिवंडीहून स्वतःच्या पैशानी तुमचं पाकीट तुम्हाला परत करायला आलोय. माफी मागण्याचीही हिंमत नाहीये पण जमलं तर कृपया मला माफ करा. मोलमजुरी करीन पण हा चोरीचा धंदा नको आता.

ही एक घटना झाली, असं खूप कमी घडत असेल पण चोरांना कोणाचं आजकाल भय राहिलं नाही या विधानाला अपवाद म्हणून सिद्ध करायला अशा घटनाही पुरेशा आहेत.

No comments:

Post a Comment