Friday, 24 June 2016

सासूसाठी जणू वरदान असणारी सून



आज आपल्या समाजात वृद्धांची अवस्था खूपच बिकट होत चालली आहे. आईवडलांच्या वाढत्या वयांत एक तर त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करणे नाहीतर घरातच त्यांची अवस्था अडगळीचं सामान करून टाकणे, अशा प्रकारांची संख्या वाढत चाललीय. पण यात एक सुखद घटना मध्यंतरी ऐकिवात आली.

एक पंचकोनी सुखी कुटुंब. वयस्कर आजी, त्यांचा मुलगा व सून आणि दोन नातवंडं. ह्या आजींना अचानक दुर्धर व्याधींनी ग्रासलं. त्यात वाढतं वय. शेवटी अशी वेळ आली की त्यांना स्वतःचं स्वतःला काहीही करता येईना. प्रत्येक अन् प्रत्येक गोष्टीत त्या परावलंबी झाल्या. डॉक्टरांनी पण सांगितलं की यांच्या प्रकृतीत आता फार काही सुधारणा होणार नाही.

ह्या आजींच्या अवस्थेत त्यांच्या सुनेकडून त्यांना जी वागणूक मिळाली ती खरोखरीच अतिशय स्तुत्य आहे, निदान आजच्या जगात तरी. ह्या सुनेनी तिच्या सासूची मनोभावे सेवा केली. काहीच आजींना करता येत नसल्याने लहान बाळाची जशी काळजी त्याची आई घेते अगदी तश्शी काळजी ह्या सुनेनी घेतली. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे. त्यांच्या पूर्ण स्वच्छतेची काळजी घेणे. अक्षरशः त्यांच्या सावलीसारखी सून, सासूच्या बरोबर असायची. जे काही करावं लागेल ते सगळं या सुनेनी केलं आणि ते पण अतिशय प्रसन्न चित्ताने, कधीही औपचारिकता हा भाव नव्हता.

ह्या आजारपणात केवळ सासूकडे दुर्लक्ष होईल या भावनेनी तिने नाटक-सिनेमा बघणे, कुठे गावाला जाणे, बाहेर जेवायला जाणे, कोणीही नातेवाईक, ओळखीचे यांच्याकडे जाणे, कोणतीही चैन या अशा प्रकारच्या गोष्टी केल्या नाहीत. तिचं जीवन हे फक्त सासू भोवतीच होतं. अशी तब्बल ७ ते ८ वर्ष, सासूच्या शेवटच्या श्वासापर्यंत, तिने त्या सुनेनी सासूची अखंड सेवा केली. मनात फक्त हाच भाव होता, आज सासूचं वय झालंय, त्या आजारी आहेत, तर अशा वेळी हे आपलं कर्तव्य आहे त्यांची सेवा करणं आणि ती पण मनापासून.

No comments:

Post a Comment