Friday, 24 June 2016

देशपांड्यांच्या घरच्या गौरी



आपल्या संस्कृतीत सणांची अक्षरशः रेलचेल आहे, पण बहुतेक ठिकाणी काळापरत्वे बदल होत गेले. पण आजही आपली जुनी संस्कृती टिकवून सण साजरे करणारी कुटुंबं आहेत, खेडेगावांमध्ये तर आहेतच पण मुंबईसारख्या शहरातही आहेत. मग - प्रकारची नवरात्र असू देत नाही तर गौरी-गणपती.

आमच्या इमारतीत एक देशपांडे (आडनाव बदललेले, पण आहेत देशस्थच) आडनावाचे कुटुंब आहे. राहणीमान आजच्या काळाप्रमाणेच पण आजही त्या घरात १०० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे सणवार साजरे होत असतील, त्याप्रमाणेच आजही साजरे होतात. वार्षिक सण तर झालेच पण महिन्याचा सत्यनारायण, प्रदोष यासारख्या गोष्टीही शास्त्राप्रमाणे यथायोग्य पार पाडल्या जातात. कुठेही short cut नाही. रोजचा स्वयंपाक सोवळ्यात, आणि यात कोणावरही बंधन नाही. जो तो स्वखुशीने हे सर्व करत असतो.

काल देशपांड्यांच्या सुनेनी मला घरी बोलावलं होतं. काल येवल्याहून त्यांच्या घरच्या गौरींच्या नऊवारी पैठण्या आल्या होत्या, त्या दाखवायला बोलावलं होतं आणि शिवाय गौरी गणपतींचे दागिने पॉलिश करून आले होते ते ही दाखवायचे होते .खास ऑर्डर देऊन पैठण्या बनवून घेतल्या होत्या. इतक्या सुंदर पैठण्या मी खरंच प्रथमच पाहिल्या .शेवटी काय, पैठणीच्या दामाप्रमाणे त्यांचं सौंदर्य तर असणारच ना !

आमच्याकडे उभ्याच्या गौरी नसतात पण लहानपणापासून बऱ्याच घरांमध्ये या गौरी पाहिल्या आहेत. प्रत्येक जण आपल्या हौसेने गौरींचं यथायोग्य स्वागत करत असतोच. पण मी उभ्या आयुष्यात जेवढे खऱ्या सोन्याचे गौरींचे दागिने पाहिले नाहीत तेवढे काल देशपांड्यांच्या घरी पाहिले. बहुतांश दागिने हे १००-१५० वर्षांपूर्वीचे पण जसजसा काळ बदलत गेला, त्या नवीन काळाप्रमाणे सुनांनी नवीन दागिन्यांची भर त्यात घातली. पण आजही ते जुने दागिनेच त्या घरासाठी महत्त्वाचे .भारतीय स्त्री ज्या ज्या अवयवांत दागिने घालते, तो प्रत्येक दागिना यांच्या गौरींसाठी बनवलेला आहे .मंगळसूत्र, कंबरपट्टा, पुणेरी नथ, बाजुबंद, व्रजटीक, लक्ष्मीहार, पोहेहार, चार पदरी गौरी हार, नवखाली हार, सोन्याचे मुकुट, बोरमाळ, ठुशी, बांगड्या, तोडे, पाटल्या, गंठण, वाकी, किती नावं घेऊ ! माझ्या तर सगळी लक्षात पण नाहीत. सोन्याची वेणी, सोन्याचे फूल, असे प्रकार वेगळेच .याप्रमाणे गणपतीचे पण सोन्याचे दागिने, हार, मोदक, मुकुट, वगैरे आहेच. परत मोत्यांचेही असेच जुने दागिने आहेत.

गौरी-गणपतींसाठी जी सजावट त्यांच्याकडे केली जाते, तीही विशेष लक्षवेधी असते .अशा प्रकारे पूर्ण हौसेने सजवलेल्या गौरी काय सुंदर दिसतील ! आपण जुन्या मराठी मालिकांमध्ये (स्वामी, पेशवा, उंच माझा झोका (नऊवारीतल्या स्त्रिया पहातो ना, तशा पेहरावात या घरच्या बायका, विशेषतः सासू या अशा मोठ्या सणांना असतात. ते ही स्वखुशीने.

एरवी आजच्या काळाप्रमाणे राहणाऱ्या या देशपांड्यांच्या घरातल्या गौरीगणपतींची आता खरोखर मी आतुरतेने वाट पहात आहे, त्या गौरींचं सौंदर्य आणि त्या बरोबरच पावित्र्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी.

No comments:

Post a Comment