Friday, 24 June 2016

स्टेट बँक आणि असाही धक्का



आज दुपारी कामानिमित्त "भारतीय स्टेट बँक" या बँकेत गेले होते. बँकेत शिरल्या शिरल्या असलेल्या counter वरच माझं काम होतं .हा counter म्हणजे बँकेत शिरणारा नवखा किंवा ज्यांना अडचण आहे असा प्रत्येक माणूस या counter वरच्या माणसाकडेच प्रथम चौकशी करणार.

मी गेले तेव्हा त्यांचा lunch time चालू होता. जरा वाट बघावी लागली, थोड्या वेळात एक हसतमुख बाई counter वरच्या खुर्चीवर येऊन बसल्या .त्यांची वाट बघत असलेली बरीच लोकं तिथे बसली होती. एकेक करत प्रत्येक जण आपली शंका विचारायला त्या बाईंच्या पुढ्यात जात होतं आणि या बाई प्रत्येकाशी कमालीच्या आपुलकीने बोलत होत्या. बँकेतला कर्मचारी बोलतोय असं त्यांच्याकडे बघून वाटतंच नव्हतं. त्या लोकांची नातेवाईक महिलाच त्यांच्याशी बोलत आहे असंच वाटत होतं. परत प्रत्येकाशी बोलताना आपली बत्तीशी दाखवत त्यांच्याशी सुंदर संवाद साधताना बघून खरं तर माझाच माझ्या डोळ्यांवर आणि कानावर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाला एकदा सांगितल्यावर समजतंच असं नाही तर त्या अशांनाही समजेपर्यंत समजावून सांगत असताना त्यांना राग, वैताग आलाय हे कुठेच जाणवायचं नाही. त्यांच्या चेह-यावरची साधी रेषही बदलायची नाही.

तिथे मी साधारण तासभर तरी होतेच, जास्तच असेन. बँकेतले कर्मचारी आळीपाळीने जेवायला जात होते. त्यामुळे मला थांबावं लागलं, तर मला विचारतात, तुम्ही जेवून आला आहात ना ? (लगेच पुढच्या क्षणी ते बत्तीशी दाखवत हास्य) कारण खूप उशीर झालाय ! ही तर माझ्यासाठी सिक्सर होती .कोणी बँक कर्मचारी असा आपुलकीचा प्रश्न खातेधारकाला विचारू शकतो !

मी जे लिहिलंय त्यात एक कणही अतिशयोक्ती नाही .एक वेळ माझ्याकडून त्या बाईंबद्दल कमीच लिहिलं गेलं असेल. पण अशी सहिष्णू हसतमुख बँक कर्मचारी मी कधीच पाहिली नाही.

मूठभर चांगल्या लोकांच्या जीवावर हे जग चाललंय असं माझं मत आहे, त्या मूठभर लोकांमध्ये मी या बाईंचा समावेश करीन. कुठली गोष्ट स्वस्त झालीय याकडे आज सगळ्यांचं लक्ष होतं पण कुठलीही गोष्ट कितीही स्वस्त झाली तरी चांगुलपणा, सहिष्णुता, माणुसकी या अशा गोष्टी महाग होत्या आणि कायम महागच राहणार कारण आजच्या काळात या गोष्टी खूपच दुर्मिळ आहेत.

No comments:

Post a Comment