गेले दोन तीन दिवस आभाळ येतंय. आकाश मस्त पिंजलेल्या ढगांनी भरलेलं असतं. सूर्याचा लख्ख प्रकाश आणि मध्येच ढगांमुळे सूर्याचा क्षीण झालेला प्रकाश असा पाठशिवणीचा खेळ चालू असतो. श्रावणात कसा आत्ता पाऊस सुरु आहे म्हणेपर्यंत ऊन पडतं, अगदी तसंच आत्ता आत्ता ऊन पडलंय म्हणेपर्यंत पांढरे ढग दाटून आभाळ येतं.
उकाडा कमी आहे का ? तर नाही अजिबात नाही पण कुठेतरी मनात पावसाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. हे सध्याचं ढगाळ वातावरण पाहिलं की वाटतं पावसाळ्याची पार्श्वभूमी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आता एकदम धाडधाड तो जूनपासून थोडीच झोडपायला लागणार ! त्यालाही पूर्व तयारी करावी लागणारच की ! हा विचार येतो आणि मनाला थोडं बरं वाटतं. आता खरं तर उकाड्याचा फार कंटाळा आलाय. पण हे असं आभाळ दिसलं की वाटतं, आत्ता मे चा शेवटचा आठवडा चालू आहे.... आत्ता जून उजाडेल आणि पुढे एक दीड आठवड्यात हवाहवासा पाऊस भिजवायला येईलंच की..... आणि का माहीत नाही पण या मधुर कल्पनेच्या शीतल झुळकीमुळे आत्ताचा उकाडा थोडा सुसह्य होतोय...
हे जे आपले ऋतू आहेत ना त्यांचा माणसाच्या आयुष्याशी खूप जवळचा संबंध आहे असं मला वाटतं. माणसाच्या आयुष्यातला कठीण काळ आणि तो काळ सरल्यानंतर येणारे सुखाचे दिवस, मला कडक उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्याची आठवण करून देतात. तापलेल्या धरतीवर पहिल्या पावसाचे थेंब पडतात आणि आपलं मन अक्षरशः बागडू लागतं. हीच भावना आपल्याला दुःख सोसल्यानंतर सुखाचा शिडकावा झाल्यावर जाणवते.
पण आत्ता जो दिवसभर ऊन, आभाळ हा खेळ चालू असतो तो पाहिल्यावरही मला माणसाच्या आयुष्यातल्या कठीण काळाचीच आठवण होते. अगदी समोर सुखाचा दरवाजा असतो आणि आपण आयुष्याचे भोग भोगत असतो. आयुष्यातल्या कठीण काळाने मन आणि शरीर दमलेलं असतं. तेव्हाच काही अनुकूल गोष्टी घडायला सुरुवात होते, अगदी छोट्या छोट्या.... आणि मनात कुठेतरी आशा निर्माण व्हायला लागते की अजून फक्त थोडं सहन करायचंय आणि मग... आणि मग नंतर परिस्थिती बदलेल, अनुकूल परिस्थिती आयुष्यात सुखाची आणि आनंदाची सुखद पर्जन्यवृष्टी घेऊन नक्की येईल... आणि ही मनाची सकारात्मकताच तो सुखाचा दरवाजा अलगदपणे उघडेल...
आणि एकदा दरवाजा उघडला की तापलेल्या धरतीवर पावसाच्या थेंबांनी जो आनंद मिळतो, सुख मिळतं तेच आयुष्यातले भोग सरताना आणि त्यानंतरही मिळेल.....
No comments:
Post a Comment