Saturday, 18 June 2016

जयोस्तुते....



जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे !!
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे !!


या गाण्यात काय जादू आहे काही कळत नाही. अर्थात कळण्यासारखं काहीच नाही म्हणा, हे गाणं साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून ____/||\____ अवतरलंय आणि त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे ते साक्षात लताबाईंनी गायलंय.

पण हे गाणं कधीही ऐका, त्याचा सकारात्मक परिणाम फक्त मनावरच नाही तर शरीराच्या नसानसावर होतो. मन प्रफुल्लित होतं. अंग मोहरून जातं. अंगात एक उत्साह संचारतो. मनावरची मरगळ झटकली जाते. आता हे असं किती लिहिणार ? कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे, शब्दच अपुरे आहेत.

मी जाते त्या जॉगिंग ट्रॅकवर रोज सकाळी च्या आधी दिवसाप्रमाणे भक्तीसंगीत आणि भाव गीतं लागतात. आज सकाळी मी तिथे चालायला (brisk walking) गेले होते. चालायला सुरुवात करून बराच वेळ झाला होता. अंग घामट्ट झालं होतं, नाही म्हटलं तरी व्यायामाचा थोडा थकवा जाणवत होता आणि अचानक हे गाणं सुरू झालं. त्या क्षणाला मन उल्हसित झालं. थकवा तर कुठल्या कुठे पळून गेला. या गाण्याने आजच्या दिवसाची सुरुवात तर फार सुंदर झाली.

वाटलं काय जादू आहे या गाण्यात ! जादू म्हणण्यापेक्षा एक शक्ती आहे, सावरकरांच्या लेखणीची, आणि त्या शब्दांना साथ साक्षात लताबाईंच्या दैवी स्वरांची आणि अर्थात मधुकर गोळवलकर यांच्या संगीताची.

No comments:

Post a Comment