सकाळी सकाळी प्रत्येक मनुष्य प्रातःविधी पार पाडतो. शरीर नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकतं आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात करतं. हा विधी एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो विधी जर पार पाडता आला नाही तर आपल्या शरीराला आणि पर्यायाने मनाला तो विधी पार पडेपर्यंत कमी जास्त प्रमाणात त्रास होतो.
अगदी हेच आपल्या मनाचं आहे. आपण कालच्या दिवसाचं अतिरिक्त ओझं घेऊन जर नवीन दिवसाला सामोरे गेलो तर त्रास हा आपल्यालाच होतो. त्यापेक्षा "रात गई बात गई" म्हणत कालच्या दिवसाच्या नको त्या गोष्टी सकाळी मनातून बाहेर टाकाव्यात, तरच उगवलेला नवीन दिवस आनंदी आणि उत्साही जाऊ शकेल. हे जर नाही केलं तर हा नवीन दिवसही वैतागवाणा जाईल. जिथे अस्ताला गेलेला सूर्य अंधाराला मिटवत रोज सकाळी उगवतो, तिथे प्रत्येक माणसानेही हेच करणं अपेक्षित आहे, नाही का ?
सकाळी सकाळी फारच ज्ञान दिलं. आज सकाळी प्रातःविधीला जाताना सुचलेला हा महान विचार लगेच थोबाडपुस्तिकेच्या भिंतीवर लिहून मनावरचा भार हलका केला, बाकी फार काही नाही..
No comments:
Post a Comment