आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या स्वभावांची माणसे असतात. काहींच्या तोंडावर फक्त
साखर असते पण मनात मात्र निराळेच असते. काहींना फक्त आपण कसे चांगले हे आणि हेच दाखवायचे
असते, काही जण आपला फक्त फायदा बघतात, असे एक ना अनेक प्रकार सांगता येतील. पण त्यात
एक प्रकार असा असतो, जो बहुतेक करून सगळ्यांकडून लाथाडलेला किंवा दुर्लक्षिलेला असतो.
तो म्हणजे शहाळं, फणस यांच्या सारख्या लोकांचा. बहुतेक करून लोकांच्या टीकेला तोंड
देणारा. कारण ही लोकं बाहेरून काटेरी, टणक अशीच असतात पण आतून मात्र कोमल आणि मुलायम,
मनानी गोड अशी असतात. या लोकांचं भावूक मन कळणारी लोकं कमीच. नेहमीच आत बाहेर न करता
बोलणे, कूटनीतीने (diplomatically) न वागणे,
तोंडावर सत्य बोलणे आणि शहाळ्याच्या बाहेरील कठोरपणाप्रमाणे कठोरच बोलणे. या लोकांचं
मन नाजूक असल्याने ते नेहमी दुसऱ्याच्या मनाचा जरा जास्तच विचार करतात. आपला विचार
करण्याऐवजी दुसऱ्याच्या मनाचा विचार जास्त करण्याची त्यांची वृत्ती असते. या वृत्तीमुळे
ते अनेकदा अडचणीत येतात. आणि जर आक्रमकता असेल ती पण फणसाच्या बाहेरील काट्यांसारखी
तर मग ही लोकं नेहमीच इतरांचं सहजपणे लक्ष्य (soft target) बनतात. पण त्याच वेळी या लोकांच्या
मनावर याचा खूप खोल परिणाम होत असतो. पण तो जगाला दिसत नाही कारण त्यांना फक्त काटेच
दिसत असतात. आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा आपल्यात कोणी फणस तर नाही ना ? हा विचार
नेहमी केला पाहिजे. त्याचे काटे न दिसता गोड गरे दिसले पाहिजेत. किती काटे आहेत फणसाला
याची सामूहिक चर्चा करण्यापेक्षा एकाने तरी त्याच्या गोड गऱ्यांचा विचार केला पाहिजे.
हे असं झालं तर खरंच आपल्यालाही या फणसाचा गोडवा चाखायला मिळू शकतो आणि त्याचे गुणविशेष
जे काट्यांमुळे लपले आहेत ते ही आपल्याला दिसू शकतात. कारण बऱ्याच वेळेला काट्यांमुळे
ते आतंच राहिलेले असतात.
No comments:
Post a Comment