Saturday, 18 June 2016

हेमा मालिनी



ती मूळची तामिळ पण नोकरी धंद्याच्या निमित्ताने तिचं कुटुंब दिल्लीत वास्तव्याला होतं. त्यामुळे तिचा जन्म दिल्लीतच झाला.
 
पण नंतर, आपल्या लेकीला नृत्याचे धडे गिरवता यावेत यासाठी तिची आई तिला घेऊन चेन्नईला आली आणि रितसर शास्त्रोक्त शिक्षण घेत एक नृत्यांगना घडण्यास सुरुवात झाली. ती चिमुरडी नृत्य साधनेत एवढी गढून गेली की जणू श्वास म्हणजे नृत्य आणि उच्छवास म्हणजेही नृत्यच. लग्न हा आपल्या साधनेतला व्यत्यय ठरू नये म्हणून तिने लहान वयातच श्रीकृष्णाशी मानस लग्नही करून टाकलं.
 
ती मोठी झाल्यावर एका तामिळ दिग्दर्शकाकडे चित्रपटात काम मिळण्याच्या आशेने गेली. तिला पाहताच एका झटक्यात त्या दिग्दर्शकाने तू फारच बारीक आहेस आणि तुला चित्रपटांमध्ये अजिबात भविष्य नाही असं म्हणत तिला नाकारलं. हा नकार तिच्या जिव्हारी लागला. तिने ठरवलं की एका तर एका, पण चित्रपटात काम करून दाखवणारच...
 
...आणि तिचा हाच निश्चय तिला मुंबईला घेऊन आला. चार वर्षांच्या अपयशानंतर ती एकदा चित्रपट मिळण्याच्या आशेने मेहबूब स्टूडियोत येऊन पोहोचली. तिथे राज कपूर त्यांच्या "सपनोंका सौदागर" या चित्रपटाच्या तयारीत होते. ही मुलगी खूप मोठ्या आशेने राज यांच्याकडे गेली. राज एका नवीन चेहऱ्याच्या शोधात होतेच. त्यांनी तिची स्क्रीन टेस्ट घेतली.
 
टेस्ट सुरु झाली आणि ती म्हणायला लागली, नाही मला हे नाही जमणार. मला संवाद नाही म्हणता येणार.

त्यावर राज म्हणाले, तू बाकी कुठलाही विचार करू नकोस. मी जसा संवाद म्हणेन, तू फक्त तो तसाच्या तसा म्हण.
 
तिने तसंच केलं आणि राज तिच्याकडे बघतच बसले. टेस्ट सुरु झाल्यावर कॅमेरा चालू झाल्यावर तिचे रंगच बदलले. एक कमालीचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर आला आणि तोच आत्मविश्वास तिच्या संवादफेकीतही दिसू लागला आणि तिथेच राज कपूर यांना त्यांच्या सिनेमाची नायिका मिळाली.
त्यावेळी राज तिला म्हणाले, तू खूप मोठी अभिनेत्री होशील...
 
मग त्यानंतर तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. ही ती म्हणजेच बसंती, ड्रीम गर्ल.... हेमा मालिनी. आपल्या योग, नृत्य कला आणि योग्य संतुलित आहार या जोरावर तिने चिरतरुण राहण्याचं वरदान मिळवलं आहे.





No comments:

Post a Comment