Tuesday, 28 June 2016

आल इज वेल



एका गाजलेल्या हिंदी चित्रपटातील एक गाजलेले वाक्य ‘आल इज वेल’. खरं तर खूप आधार देणारं वाक्य. संपूर्ण नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्यांना थोडा दिलासा. खरं तर आल इज वेल किंवा सर्व काही ठीक होणार आहे असा विचार करून काही समस्या सुटते का ? तर नाही नक्कीच नाही. पण हा असा सकारात्मक विचार करून मनाला धीर मात्र नक्की येतो. मनाला थोडा दिलासा मिळतो. कधी कधी नैराश्य एवढं येतं की माणूस म्हणतो नको हे जगणं, नको हे आयुष्य पण त्याच वेळी जर समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा सकारात्मक ठेवला, तर या नैराश्यातही कुठेतरी आशेचा किरण दिसू शकतो. काळ्याकुट्ट अंधारात समोरचं काही दिसत नसताना, अतिशय मंद जळणारी ज्योत जशी वाट दाखवू शकते, तसाच कितीही मोठी समस्या असली तरी सुद्धा हा सकारात्मक दृष्टीकोन, ही समस्या सोडवायला मदतच करतो. जसा एक पाण्याचा पेला पूर्ण काठोकाठ पाण्यानी भरलेला आहे, त्यात अजून पाणी भरलं तर ते वाहू लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना जर आपण त्या पाण्यात ‘मीठ, साखर, लिंबू’ घातलं तर तेच पाणी एक चविष्ट सरबत बनू शकतं. तसंच आकंठ बुडालेल्या नैराश्येच्या गर्तेत असताना ‘आल इज वेल’ हे तीन जादुई शब्द मनाला समजावले तर त्या मनाला दिलासा मिळून समोर असलेल्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हे मन नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करतं आणि हे आपलं आयुष्य सरबताप्रमाणे परत एकदा चविष्ट बनू शकतं. त्यामुळे आपले १००% प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टीकोन या दोन गोष्टी कोणत्याही समस्येचं निदान करू शकतात हे नक्की.

No comments:

Post a Comment