Tuesday, 28 June 2016

पक्षी मित्रांना सापडलेला पोपट



आमच्या इमारतीत एक पक्षी प्रेमी / मित्र राहतात. त्यांना त्यांच्या कंपनीत बेशुद्धावस्थेत पडलेला एक पोपट मिळाला होता. त्याचे ह्रदयाचे ठोके थोडे मंदावले होते. ते त्या पोपटाला घेऊन घरी आले.
एरवी बाहेर एवढे पोपट कॅव कॅव करत ओरडत फिरत असतात. ओरडत नसले तरी एका जागी शांत बसलाय असा पोपट क्वचित पहायला मिळतो. पण हा अगदी शांत निपचीत पडलेला पोपट ते घरी घेऊन आले. एवढी मोठी ती त्याची लांब शेपूट, जवळजवळ एक फूटभर तरी..
 
घरी आणलं खरं त्याला, पण तो शुद्धीत नसल्याने त्याला खायला घालणंही कठीण.. म्हणून आधी त्याला ड्रॉपरने पाणी पाजलं. त्यात त्याचं तोंड अर्धवटच उघडं आणि तो नीट तोंडही उघडेना.. मग त्यांनी त्या त्याच्या लाल चोचीच्या फटीतून त्याला पाणी पाजायला सुरुवात केली.
 
थोडं पाणी पोटात गेल्यावर तो शुद्धीवर आला. मग जरा वेळाने आपल्या पायांवर अडखळत उभा राहिला, पण थोडाच वेळ. मग त्याला चिरलेली द्राक्ष, मिरच्या खायला घालायला लागले, लटपटणारे त्या पोपटाचे पाय एकदम ताठ झाले.. अंगात एकदम हुशारी आली... तसं या घरातल्यांच्याही जीवात जीव आला.
 
असं करत करत तो घरातल्या घरात उडू लागला. तसं त्याला पिंजऱ्यात वगैरे ठेवलं नव्हतं. घरात मोकळंच ठेवलं होतं पण तो उडून घराबाहेरही जात नव्हता. काय उडायचं वगैरे ते घरातच. कदाचित त्या पोपटालाच आत्मविश्वास वाटत नसावा आणि तो बाहेर जात नसावा.
 
बाहेरच्या पोपटांनाही हा आजारी पोपट एका घरी असल्याचं कळलं आणि मग ते पोपटही रोज यांच्या घरी येऊ लागले. त्याला खायलाही आणायचे, गप्पा मारायचे आणि मग जरा वेळाने ते पोपट तिथून निघून जायचे पण हा मात्र त्यांच्याबरोबर काही जायचा नाही.
 
आज दुपारी त्यांच्या पत्नी त्याच्यासाठी खायला आणायला म्हणून तीन चार मिनिटांसाठी आत स्वयंपाकघरात गेल्या. त्या आत गेल्या तेव्हा तो पोपट त्यांच्यासमोरच होता आणि परत आल्या तर हा गायब. उडून गेला होता तो पोपट. खिडकीतून बाहेर डोकावलं तर कुठेही तो दिसत नव्हता.
जरा त्यांना वाईट वाटलं. चार पाच दिवसात त्यांना नाही म्हटलं तरी त्याचा लळा लागला होता.
कदाचित त्या पोपटाचे या लोकांशी कुठले ऋणानुबंध असावेत. चार दिवस यांच्या घरातलाच बनून राहिला, बंध संपले... उडून गेला. 

No comments:

Post a Comment