Tuesday, 28 June 2016

रस्त्यात अनुभवलेली माणुसकी



नेहमी आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींमध्येही आपण काही चांगलं घडत आहे का, हे पहावं. १०० वाईट गोष्टी घडत असतील तर त्यातही कुठे ४ गोष्टी चांगल्या घडत असतात, त्यासाठी नेहमीच समाधान मानावं; वाईटात सुद्धा चांगल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न नेहमी करावा, असं मला वाटतं.

आता परवाचीच गोष्ट, संध्याकाळची. आता खरं तर यात फार काही नाहीये. संध्याकाळी आमच्या कॉम्प्लेक्समधून बाहेर पडत होते, तर एक सर्वसामान्य मुलगी रिक्षावाल्याशी, अमुक ठिकाणी जाण्याचं भाडं नाकारलं म्हणून वाद घालत होती. तसं हे नवीन नाही म्हणून जास्त लक्ष तिकडे दिलं गेलं नाही, पण दुसऱ्या क्षणी आवाज वाढला म्हणून मागे वळून बघितलं. तर ती मुलगी चक्क त्याच्यावर दमदाटी करत होती. “येत कसा नाहीस चल आधी मुकाट्याने”, त्यांच्यातली वादावादी वाढली. शेवटी ती मुलगी रिक्षेत बसली, तिनेच स्वतः रिक्षेचा मीटर टाकला, आणि त्याला म्हणाली, “रिक्षा चालू कर आणि चल” आणि खरंच तो रिक्षा घेऊन गेला. वाटलं अरे वाह, मस्त, छान.

मग स्टेशनच्या जवळ गेल्यावर एका शहाळंवाल्याकडे एक मुलगी आणि तिचे वडील शहाळं घेत होते. एक शहाळं तर तिच्या १० सूचना होत्या. स्टेशनच्या बाहेर एक नेहमी दिसणारी म्हातारी भिकारी बाई होती, नेहमीप्रमाणेच भीक मागत होती. तेव्हा तिथून ही मुलगी आणि वडील स्कूटरवरून जाताना दिसले. त्या बाईच्या इथून स्कूटर पुढे गेली, आणि थोडी पुढे गेल्यावर थांबली. ती मुलगी उतरली आणि तिने ते शहाळं त्या बाईला दिलं. त्या बाईलाही क्षणभर काही कळलं नाही. पण शहाळं असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे, अशी चिकित्सा करून घेतलेलं भलंमोठं शहाळं त्या मुलीने त्या बाईला दिलेलं पाहून मनाला खूप बरं वाटलं.

घरी परतत असताना, सिग्नलला गाड्या थांबल्या होत्या. २ भिकारी मुलं एका रिक्षेपाशी गेली, आत एक बाई आणि एक माणूस बसले होते. त्या माणसानी त्याच्या जवळच्या पिशवीतले २ वडापाव त्या मुलांना दिले. मुलं खुश. ते बघून अजून मुलं आली, अशा एकून ७ ते ८ मुलांना त्या माणसाने वडापाव दिले. अगदी गरम वडापाव, मुलांचा आनंदाने चेहरा प्रफुल्लित झाला. त्या माणसानी एवढे वडापाव घेतले होते, काहीतरी कारण असेल म्हणूनच. पण एका क्षणाचाही विलंब न करता त्याने ते त्या मुलांना दिले. मला खरंच ते दृश्य बघून खूप कौतुक वाटलं आणि मानसिक समाधानही.

खरंच अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि वाईट घटनांना दूषणं देत बसतो. कुठेतरी ऐकलंय, आजही जगात चांगली माणसं आहेत, आणि त्यावरच हे जग चाललंय. हे असे प्रसंग पाहिले की ते मनोमन पटतं.

No comments:

Post a Comment