Friday, 17 June 2016

मला एकदा पुसा नाहीतर विका



आमच्या वरती राहणारा १० वर्षांचा मुलगा काल संध्याकाळी इतर मुलांबरोबर खाली खेळत होता. तेवढ्यात त्याचे आई वडील आणि त्याच्या वडलांचे मित्र आणि त्याची बायको त्याला इमारतीच्या आवारात दिसले, ते दोघे परत चालले होते .त्यांनी त्या मुलाला अगदी हाक मारून अच्छा वगैरे केला आणि बाहेर लावलेल्या आपल्या गाडीकडे जाऊ लागले .हा मुलगा पण खेळ सोडून त्या चौघांजवळ आला.

ते दोघे त्यांच्या गाडीजवळ गेले. तेवढ्यात तो मुलगा जोरात ओरडला " काका मला एकदा पुसा नाहीतर विका " हे ऐकलं आणि सगळे विचित्र नजरेने त्या मुलाकडे बघायला लागले. त्याची आई म्हणाली, काय बडबडत आहेस ?  त्या मुलाच्या काकांनी अगदी गोड भाषेत विचारलं, बाळा, म्हणजे काय ? तर तो मुलगा म्हणाला, काका फेसबुकवर धुळीने माखलेल्या गाडीवर " मला एकदा पुसा नाहीतर विका "असं लिहिलेला फोटो नाहीये का, तुमच्या गाडीवर पण किती धूळ आहे.

हे ऐकलं आणि त्याच्या वडलांचे मित्र आणि त्याची बायको जोरात हसायला लागले आणि त्या मुलाला म्हणाले, घरी गेल्या गेल्या गाडी पुसतो.

त्या मुलाचे आई वडील त्याला बोलायला लागले, असं बोलतात का, काका मोठे आहेत ना, sorry म्हण त्यांना. मित्र आणि त्याची बायको म्हणायला लागले, नका बोलू त्याला.......लहान आहे तो.......... त्या मुलाने पण लगेच sorry म्हटलं.

मी तिथेच उभी होते. त्याचं ते अचानक आलेलं वाक्य ऐकून माझं तर हसू आवरत नव्हतं. मी अक्षरशः तोंड दुसरीकडे करून हसत होते.

काही म्हणा त्या छोट्या निरागस मुलाने त्या पुणेरी पाट्यांमधल्या वाक्याचा वापर मात्र एकदम झक्कास केला होता.

No comments:

Post a Comment