आत्ताची सकाळची गोष्ट. एक म्हातारा माणूस रस्त्यावर भीक मागत बसला होता. त्याचा चेहरा फार दयनीय दिसत होता. तेवढ्यात दोन बायका त्याच्या जवळ आल्या. त्या बायका गरीब किंवा अती गरीब वर्गात मोडणा-या होत्या. रोजंदारीवर जगणा-या वाटत होत्या.
पदराच्या टोकाला त्या दोघींनी पैसे बांधून ठेवले होते. त्या पदराच्या गाठी सोडल्या तर त्यात ४-५ नाणी आणि एखाद दुसरी दहाची नोट म्हणजे फार फार तर २५ रुपयांच्या आसपास प्रत्येकी त्या दोघींकडे पैसे असावेत. त्यातली एकेक नोट त्या दोघींनी त्या माणसाला दिली.
तशी त्यातली एक बाई दुस-या बाईकडे बघू लागली, तेवढ्यात दुसरी बाई त्याला अजून पैसे देऊ लागली, तेव्हा बरोबरची बाई तिला म्हणाली, "अगं अशी काय करतीया, म्या बी दिले हायेत. तुझं पैसं संपलं तर खाणार काय ग, पोरास्नी बी भूक लागल. दिसभर काय नाय मिळालं तर रातच्याचे बी वांदे." तर दुसरी तिला म्हणते की, काय नाय व्हत बग. पोरं आज जरा कमी खातील आणि म्या काय नाय खाल्ल तर चालतया. मला काय नाय व्हत .ह्यो म्हातारा बग कसा दिसतोया, कधी खाल्लया ह्यानं काय म्हाइत. चार घास खाईल बिचारा.
आपल्याकडचे बरेचसे पैसे त्या दोघींनी त्याला दिले. त्याने पण त्या दोघींना हात वर करून आशिर्वाद दिले आणि त्या तिकडून गेल्या.
रस्त्यावर ५-६ लोकं ही घटना बघत होते. त्यातली काही पुढे आली आणि त्या म्हाता-या माणसाला पैसे देऊन गेली. ते दृष्य पाहून माझाही हात आपसूक पाकिटाकडेच गेला. प्रसन्न चित्ताने त्याने आम्हालाही आशिर्वाद दिले.
कोण कुठला तो म्हातारा त्याच्यासाठी त्या बायकांनी आपल्या जेवणाचे पैसे दिले .खरंच खूप मोठा धडा शिकवून गेल्या त्या दोघी.
No comments:
Post a Comment