मुकेश, एक राजबिंडा गायक. आवाज गोड नव्हता असं नाही पण कमालीचा अनुनासिक. त्यांच्यावर सैगल यांचा खूप मोठा प्रभाव होता
म्हणून असेल, कदाचित. भावना ओतून गाणं म्हणजे काय असा प्रश्न असेल तर
खरंच मुकेश यांची गाणी ऐकावीत. एकन् एक गाणं मनापासून आणि त्या गाण्याशी
पूर्ण एकजीव होऊन म्हटल्याचं नक्की जाणवेल. दुःखी, दर्दभरी गाणी यात तर मुकेश यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. गाण्याची उत्कृष्ट अशी जर कुठली
पातळी असेल तर मुकेश यांची दर्दभरी गाणी त्या उत्कृष्ट पातळीच्याही खूप
वरची असायची. थोडं तत्वज्ञान शिकवणारीही बरीच गाणी मुकेश यांनी म्हटली. राज कपूर, मनोज कुमार
यांचा तर आवाजच मुकेश होता. पण, मला त्यांची थोडी लाईट मूडमध्ये असणारी किंवा प्रेम गीतं फार
आवडतात. सलील चौधरी यांच्याबरोबरची मुकेश यांची गाणी वेगळी आणि विशेष
लक्षात राहण्यासारखी आहेत. सलीलदांनी मुकेश यांचा आवाज फार सुंदर
प्रकारे आपल्या गाण्यांमध्ये वापरला होता. सिनेमात एखादंच गाणं असायचं
पण एकदम क्लास...! बासु चॅटर्जी यांच्या बऱ्याच सिनेमात मुकेश यांचं गाणं
असायचंच असायचं. गीतकार योगेश आणि मुकेश यांचीही एक विशेष जोडी जमली होती.
No comments:
Post a Comment