Tuesday, 5 July 2016

विवाह पंचमी



आज मार्गशीर्ष शुक्ल पंचमी म्हणजेच “विवाह पंचमी”. आजच्या दिवशीच दशरथनंदन ‘श्रीराम’ यांचा विवाह जनकपुत्री ‘जानकी’ हिच्याबरोबर संपन्न झाला. हा विवाह जनकपुरी येथे संपन्न झाला होता.

सीता स्वयंवरात रामाने धनुष्य तोडल्यानंतर राजा जनकाने अयोध्येला राजा दशरथाकडे दूत पाठवला आणि त्यानंतर राजा दशरथ अयोध्येहून बारात घेऊन जनकपुरीला आले होते. त्यानंतर विवाह पंचमीला सीताराम यांचा मोठ्या उत्साहात विवाह संपन्न झाला.    

अयोध्येसह देशाच्या अनेक मंदिरांमध्ये आजचा दिवस साजरा केला जातो. अयोध्येत आज संपूर्ण नगर दिव्यांनी सुशोभित केलं जातं. विवाह सोहळ्याचे देखावे बनवून मिरवणूक काढली जाते. कित्येक ठिकाणी राम बारात-राम विवाह यांचं आयोजन केलं जातं. अयोध्येहूनही राम बारातीचं आयोजन केलं जातं. ही बारात जनकपुरी जिथे त्रेता युगात विवाह सोहळा जिथे संपन्न झाला तिथे नेण्यात येते.    

जनकपुरी, नेपाळ इथल्या ‘जानकी मंदिरा’त हा महोत्सव हर्षोल्हासात साजरा केला जातो. संपूर्ण मंदिराला एखाद्या भव्य लग्न स्थळाच्या स्वरूपात सजवलं जातं. जानकी आणि श्रीराम यांना लग्नाचा जोडा, दागिने घातले जातात. लग्नासाठी खास शृंगार केला जातो. सीताराम यांच्या लग्नाचे विधी पार पाडत पारंपारिक हिंदू पद्धतीने आजच्या जानकी मंदिरात हा विवाह सोहळा साजरा केला जातो. आजच्या दिवशी इथे मोठ्या जत्रेचं आयोजन केलं जातं. जनकपुरीमध्ये प्रत्येक मंदिरात आजचा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

जनकपुरी आणि सीतामढी, बिहार (जानकीचे प्रकट स्थान) येथे रामाची कथा सीताराम यांच्या लग्नापर्यंतच सांगितली जाते. कारण यापुढचा सीतेचा जीवन प्रवास, १४ वर्ष वनवास, अग्निपरीक्षेला तोंड देणं, वनवासातून परतल्यावर गर्भारपणात परत वनवास, आणि शेवटी पृथ्वीच्या पोटात निघून जाणं हा असा अत्यंत दुर्दैवी आणि त्रासदायक आहे.  

कित्येक घरांमध्ये आजच्या दिवशी लग्नाचे मुहूर्त असूनही हा मुहूर्त टाळतात. 

भगवान विष्णूंचा संपूर्ण पुरुष अवतार आणि देवी लक्ष्मीचा संपूर्ण स्त्री अवतार यांचा हा लग्नाचा दिवस अतिशय शुभ मानला जातो.  


No comments:

Post a Comment