आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच
समर्थ रामदास स्वामींचा जन्म दिवस. समर्थांना सविनय नमन. स्वामींच्या या ईश्वरी अवताराबद्दल
लिहिण्यासारखं बरंच काही आहे.
समाजाविषयीच्या अपार तळमळीतून
समर्थांनी विपुल वाङमय निर्मिति केली. रोखठोक विचार तसेच स्पष्ट निर्भीड
मांडणी पण साधी सरळ सर्वसामान्यांना सहजपणे समजेल अशी भाषा ही त्यांच्या समृद्ध
वाङमयाची ठळक वैशिष्टये होती.
रामदास स्वामींच्या प्रमुख
रचनांमध्ये दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता
दुःखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची
आरती, 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' ही शंकराची
आरती, यांसारख्या आरत्या, कितीतरी अभंग, स्तोत्रे, पदे, रामायणातील काही कांडे यांचा समावेश आहे.
तसेच शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना पाठवलेली पत्रे, आपल्या शिष्यांना केलेले मार्गदर्शन, तसेच सर्वसामान्यांना
त्यांच्या रोजच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरेल असं विपुल लेखन समर्थांनी केले
आहे.
`श्रीमत्ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक
ग्रंथाची रचना समर्थांनी शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली. तेथे रामदास स्वामींच्या सुबक मूर्ती
आहेत. या मूर्तींची निर्मिती माझे आजोबा आणि प्रभात चित्रचे कला
दिग्दर्शक बी.डी. थत्ते यांनी केली. हा तिथलाच रामदास स्वामी आणि कल्याण
स्वामी यांच्या मूर्तींचा फोटो.

No comments:
Post a Comment