Tuesday, 5 July 2016

कावड़ यात्रा


श्रावण महिन्यातली ही एक महत्त्वाची यात्रा समजली जाते. फक्त शिवच्या आराधनेत मग्न असणारे आणि अगदी दूर दुर्गम भागात राहणारे कावड किंवा कावर श्रावण महिन्यात गंगा किनारी गंगाजल घेण्यासाठी येतात. आपल्याजवळच्या कावडमध्ये गंगा जल भरून घेतात आणि नंतर आपल्याजवळच्या शिव मंदिरांमध्ये या जलाने पुढच्या वर्षीच्या यात्रेपर्यंत अभिषेक करतात. श्रावण महिन्याला शिवाचा महिना म्हटला जातो आणि गंगा जल शंकराला विशेष प्रिय असल्याने ही यात्रा श्रावण महिन्यात गंगा घाटांवर आयोजित केली जाते.
 
रावण जो शिवाचा खूप मोठा भक्त होता, तो अशा प्रकारे कावडमध्ये गंगा जल भरून आणायचा आणि लंकेत या जलाने शिवाभिषेक करायचा. म्हणजे खरं तर ही प्रथा रावणानेच सुरु केली.

पण रुढार्थाने ही यात्रा भगवान परशुराम यांनी  सुरु केली. कावड़मध्ये गंगाजल आणून आपल्या आराध्य शिवाची पूजा पद्धत म्हणजेच या कावड़ यात्रेची सुरुवात भगवान परशुराम यांनी केली, जी आजही "बोल बम"चा जयजयकार करत उत्साहाने चालू आहे. भगवान परशुराम श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी कावड़मध्ये गंगा जल आणून शिव पूजा अर्चना करायचे.
 
आजही श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हे कावर लोक कावड़मध्ये आणलेल्या गंगाजलाने शिवाभिषेक करतात, त्यामुळे गंगाकाठच्या काशी विश्वनाथ मंदिरात या कावर लोकांची विशेष गर्दी असते. अगदी भल्या पहाटेपासून यांच्या "बोल बम" करत बाबा विश्वनाथांच्या दर्शन आणि अभिषेकासाठी भल्या मोठ्या रांगा लावायला सुरुवात होते.
 
उत्तर भारतातल्या पंचांगाप्रमाणे आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार.



No comments:

Post a Comment