चंदीगडला एक दिवस राहणे ही
तर केवळ एक सोय होती कारण चंदीगडहून मनालीला जायला १०-११ तास लागतात. दुसऱ्या दिवशी
सकाळीच आम्ही मनालीसाठी निघालो. चंदीगडमधली सकाळ, फार थंडी नसूनही केवळ साध्या गारव्यासाठी
अंगात स्वेटर घातलेले चंदीगडवाले दिसायला लागले. तिकडे रिक्षांची गर्दी नाही, आदल्या
संध्याकाळपासून मला फार फार तर दोन चार रिक्षा दिसल्या असतील... बसेसची संख्याही कमालीची
मर्यादित त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दीही कमीच. सकाळची कचेरीला जायची वेळ असली
तरी चंदीगडच्या रस्त्यांवर मात्र अगदीच सुटसुटीत गर्दी, शिस्तीत आपल्या मार्गाने जाणारी...
आम्हीही त्या सुटसुटीत गर्दीचा एक भाग बनत चंदिगडचा निरोप घेत होतो. आदल्या दिवसापासून
चंदीगडच्या मातीने लक्ष वेधून घेतलं होतं, तिथली माती अगदी फिक्या राखाडी रंगाची. राखेत
पांढरी शुभ्र रांगोळी मिसळावी अशी, तेव्हा मनात विचार आला आपल्या कोकणाची माती लाल
लाल चुटूक... अनवाणी थोडं जरी चाललं तरी तळपाय लगेच लाल लाल होणार... परिसर बदलला की
कसं सगळं बदलतं नाही ! ही अशीच माती पंजाबचीही... निदान आम्ही जेवढ्या पंजाबमधून फिरलो
तिथे तरी ही अशीच माती... कुठे लाल, कुठे काळी, कुठे राखाडी, कुठे अजून कुठल्या रंगाची
माती... आपल्याच देशाच्या निरनिराळ्या भागाची... साध्या मातीतही किती वैविध्य...
चंदीगडला अगदी लागून असणाऱ्या
मोहालीतून आम्ही पंजाबमध्ये शिरलो. पंजाबमधून आम्ही हिमाचल प्रदेश या राज्यात शिरणार
होतो. चंदीगडला हिमाचलशी जोडणारा हा रस्ता मोठा असला तरी तो दृतगती मार्ग किंवा महामार्गही
नाही पण रस्ता स्वच्छ आणि अतिशय उत्तम परिस्थितीतला, खड्डे आम्हाला त्या रस्त्यावर
दिसलेच नाहीत. या मार्गावरही गाडीच्या वेगमर्यादा आहेत आणि त्या पाळल्या नाहीत तर दंड.
एवढंच काय गाडीत संगीत लावण्यावरही बंधनं, हे बंधन नाही पाळलं तरी लगेच दंड. आमच्या
ड्रायव्हरने अगदी भीत भीत हळू आवाजात गाणी लावली होती.
कुठल्याही राज्याचा बाज जाणून
घ्यायचा असेल तर त्या राज्याच्या खेड्यांमध्ये जावं, शहरं पाश्चात्यांच्या मागे धावण्यास
उत्सुक असतात पण खेडी, निमशहरी भाग यांना त्या मानाने उशिरा हे पश्चिमेचं वारं लागतं.
आमचा हा हिमाचलकडे जाणारा मार्ग या अशाच गावागावांतून होत होता. रस्त्यांवर दिसणाऱ्या
पाट्या, फलकांतून हिंदी आणि इंग्रजीने कधीचाच निरोप घेतलेला होता आणि फक्त गुरमुखीतून
लिहिलेल्या पाट्या आमच्या समोर येत होत्या. एखादं खेडं आलं की बरोबर दिसायचे बाजार,
दुकानं, खास पंजाबी पठडीतली घरं आणि भक्कम बांध्याचे बलदंड पंजाबी नागरीक... ढाबेही
दिसायचे आणि त्या ढाब्यांच्या बाहेर संपूर्ण पंजाबी पेहरावातील पुरुष आणि स्त्री त्यांचं
पारंपारिक नृत्य करत असलेल्या मुद्रेतले दोन पुतळे दिसायचे. तिथून जाताना उडत उडत पंजाबी
संगीतही कानावर पडायचं... खेड्यांना मागे सोडलं की लागायची शेतं, कधी गहू तर कधी मोहरी
आणि त्यांच्या कडेला यांना सोबत देत उभी असणारी निलगिरीची झाडं. अगदी दाट पिवळसर हिरवं
गव्हाचं शेत आणि त्याला अगदी खेटून चमकदार सोनेरी असं मोहरीचं शेत, यांच्या कडेला उंचच
उंच दिसणारी निलगिरीची झाडं. निलगिरीची तिकडे बरीच झाडं दिसली. काड्यापेट्यांच्या काड्या
बनवण्यासाठी या झाडांच्या लाकडाचा उपयोग होतो. खूप महाग विकलं जातं या झाडाचं लाकूड.
आम्ही गेलो तेव्हा त्या झाडाची पानगळती झालेली होती. गव्हाची हिरवी शेतं आणि त्याच्या
शेजारी सरसोंची शेतं, आपली दृष्टी जिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत या दोन पिकांचे
जमिनीवर अंथरलेले गालिचे आणि त्यांच्यावर देखरेख करणारी ही निलगिरी... काय सुंदर दृश्य
! मोहरी कसली ती, साक्षात चकाकता सोन्याचा गालिचाच तो....! ही मोहरी कुठेही उगवलेली
दिसायची, फक्त शेतातच नाही. आपल्याला कशी छोटी मोठी झुडपं कुठेही दिसू शकतात तशीच ही
सोनेरी मोहरी तिथे अगदी गावागावांमध्ये राहत्या भागातही दिसायची.
आम्ही भले पंजाबच्या रस्त्यावरून
जात असलो तरी कुठल्यातरी नंदनवनातूनच फिरत असल्याचा भास आम्हाला होत होता. या नंदनवनाच्या
थोडं आत शिरण्याची मनात इच्छा निर्माण झाली आणि आमच्या ड्रायव्हरला याची मी अगदी पुसटशी
कल्पना द्यायला लागले. तो लगेच म्हणाला, जायचंय सरसोंच्या शेतात ! लगेच एका शेतापाशी
गाडी थांबवत म्हणाला, शेत बघून या... मी म्हणाले, कोणी काही बोलणार नाही ? तर तो म्हणतो,
नाही कोणी काही नाही बोलणार. मी आहे ना, जा तुम्ही बिनधास्त... असं म्हणत तोही गाडीतून
खाली उतरला आणि आमचा अंगरक्षक असावा अशा अविर्भावात तिथे शेताकडे तोंड करून उभा राहिला.
आम्ही रस्त्यावरून खाली उतरत पांढरट राखाडी मातीला तुडवत त्या चमकदार पिवळसर सोनेरी
शेतात गेलो.
समस्त देवांनी आकाशातून सोन्याचे
बारीक बारीक कण शेतातल्या जमिनीवर सोडावेत, त्या बारीक कणांची रोपं येऊन सगळीकडे मनसोक्त
डोलावीत आणि त्यांचं ते डोलणं पाहण्यासाठी आम्ही त्या शेतात उतरावं असं काहीतरी वाटत
होतं. “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या चित्रपटात काजोल शाहरुखला भेटण्यासाठी या
अशाच सोनेरी सरसोंच्या शेतातून धावत येते, तेव्हा तिला काय वाटलं असेल ! असा विचार
माझ्या तेव्हा मनात आला. ते शेत तर खूप मोठं होतं. जरी म्हटलं की तो एक सिनेमा होता,
ते सगळं खोटं खोटं असतं... तरी या अशा निसर्गाच्या सौंदर्यावर कोण मोहीत होणार नाही
? ती एक कलाकार असली म्हणून काय झालं ! आधी ती एक सामान्य माणूसही आहेच. हवेवर डोलणाऱ्या
त्या सोनेरी मोहरीच्या फुलांचा वास घेऊन बघितला, वास तर कुठला आला नाही.
या निसर्गाच्या
किमयेला डोळ्यात साठवून लवकर फिरावं लागलं कारण आम्ही तेव्हा फक्त पंजाबातच होतो आणि
आम्हाला एक मोठा पल्ला पार पाडायचा होता. कुठे कुठे नुसतीच एकत्रित दिसणारी ताठ निलगिरीची
झाडं तर कुठे या मोहरी आणि गव्हाचा रखवालदार म्हणून उभी असणारी निलगिरीची झाडं, मस्त
ताजी हवा, त्या भागाला असणारा खास असा पंजाबी स्पर्श आणि एकंदर छानसं वातावरण बघून
वाटलं, व्वा... कधीतरी भविष्यात आयुष्यातले सगळे व्याप संपवून इथे एखाद्या पंजाबातल्या
गावात येऊन रहायला पाहिजे. इतकं मोहात टाकलं त्या छोट्याश्या पंजाबी भागाने...
हे असे विचार येतच होते तितक्यात
आमच्या पठाणकोटी पंजाब्याने गाडी एका ढाब्यापाशी नेऊन थांबवली. इथे हवं तर काही खाऊन
पिऊन घ्या, पुढचा रस्ता चांगला नाहीये आणि आता इतक्यात आपल्याला कुठेही खायला मिळणार
नाही. तिथे बाहेर पंजाबी वेशभूषेतले स्त्री पुरुष त्यांचं नृत्य करण्याच्या मुद्रेतले
दोन पुतळे होतेच. तिथेच कुठूनतरी गुरुद्वारात भजनं चालतात तशा भजनांचा आवाजही येत होताच.
ढाबा असला तरी तिथे इतरही खाद्यपदार्थ मिळत होते. आम्ही पंजाबातल्या ढाब्यात सकाळच्या
वेळी आलू पराठा मागवला आणि चहाकॉफी नाही तर लस्सी. दोन्ही पदार्थ केवळ अप्रतिम...
पंजाबच्या या ढाब्याला सोडलं
आणि आम्ही काही वेळातच पंजाबचाही निरोप घेत हिमाचल प्रदेशात प्रवेश केला. त्याबरोबरच
पंजाबीच्या गुरमुखीतल्या पाट्यांनाही आम्ही मागे सोडलं, आणि दिसायला लागल्या सगळीकडे
हिंदीतल्या पाट्या. आपली पंजाबी ओळख गुरमुखीतल्या पंजाबी भाषेतून ताठ मानेने मिरवणाऱ्या
पंजाबातून आम्ही स्वतःच्या भाषेच्या वेगळ्या ओळखीसाठी अजिबातच आग्रही नसणाऱ्या हिमाचलमध्ये
प्रवेश केला, हा झालेला बदल मनाला मात्र खटकला... इतका वेळ अतिशय सुस्थितीतल्या रस्त्यावरून
आमचा प्रवास चालू होता पण आता रस्त्यांची अवस्था बिघडली. डोंगर चढायला घेतला आणि या
रस्त्यांची पूर्णपणे कोलमडलेली स्थिती बघायला मिळाली. तिथला रस्ता मोठा करण्याचं काम
चालू आहे आणि म्हणून तिथले डोंगर फोडत आहेत. हिमाचल प्रदेश हे एक अतिशय नावाजलेलं डोंगराळ
भागातलं राज्य म्हणजेच हिल स्टेशन पण याच डोंगरांना चक्क फोडण्याचं काम तिकडे जोरात
चालू आहे. हे डोंगर फोडून रस्ते मोठे करणार आणि, सोयीसाठी म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास
करणार. या सगळ्यामुळे तिकडे या रस्त्यांची अवस्था प्रचंड खराब आणि त्यात मोठमोठ्या
वळणांचे रस्ते. यातच आम्हाला साथ देण्यासाठी आलेली सतलज नदी दिसली, पंजाबच्या पाच नद्यांपैकी
एक. हिने आमची खूप सोबत केली. तिचं ते विशाल पात्र बघायला खूप छान वाटायचं...
आता सुरु झालेला रस्ता हा
तुमची आणि तुमच्या तब्येतीची परीक्षा बघणारा होता. तुम्ही जरी गाडीत सरळ बसलेला असलात
तरी तुम्ही एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे ४५-९० अंशात पूर्ण आडवे होणार हे नक्की आणि
असा हा रस्ता जणू काही कधीच न संपणारा... मध्येच एखादं गाव आलं की रस्ता सरळ होणार
नाहीतर तुमचं मी डोलकर डोलकर... हे सुरूच आणि हे डोलकर... सगळ्यांनाच झेपेल असं नाही.
गाव आलं की तिथली छोटी छोटी दुकानं दिसायची किंवा कधी कुठल्या खानावळीची पाटी. पाटी
असायची, पंजाबी भोजनालय आणि खाली मॅगी, च्याऊ मिन आणि काय काय मिळेल, ही अशी. अरे काय
हे ? तुम्ही पहिल्यांदा जे लिहिलंत त्याचा खालचे पदार्थ लिहून अपमान काय करता ! या
मॅगीने आमची पाठ शेवटपर्यंत कधीच सोडली नाही. आपल्याकडे जसे वडापाव, मिसळ, पावभाजी
असे पदार्थ पदार्थांच्या तक्त्यात हमखास दिसतात तशीच तिकडे ही मॅगी संपूर्ण हिमाचल
प्रवासात दिसली.
हे डोंगर चढत अगदी ९० अंशात
डोलकर बनत आम्ही आता उंचावर पोहोचलो. रस्त्यांची अवस्था खरोखर वाईट, सगळीकडे रस्त्याच्या
कामांचे आवाज, धूळ आणि त्याबरोबर मनाला बोचणारी एक खंत, हिमाचलच्या वाढत्या गर्दीची
सोय म्हणून रस्तारुंदीकरण करता करता हे लोक स्वर्गासारख्या निसर्गावर चालून आले आहेत.
याबद्दल आम्ही आमच्या ड्रायव्हरला विचारलंही. तो पडला पर्यटकांना हिमाचल फिरवणारा,
तो काय उत्तर देणार ! त्याने हे डोंगर फोडणं योग्य असल्याचंच सांगितलं. आता आम्हाला
तिथल्याच रस्त्यांवर वेगवेगळ्या ठिकाणांच्या पाट्या दिसायला लागल्या, हे इतके किलोमीटर,
ते तितके... आजूबाजूला हिमाचलच्या गावातले गावकरी दिसायला लागले, हिमाचल प्रदेशच्या
राज्याच्या बसेस दिसायला लागल्या आणि ज्या ठिकाणासाठी मुंबईहून निघालो होतो, तिथे पोहोचत
असल्याची जाणीव व्हायला लागली. तिथल्या गावांमधली घरं अशी की जणू दाट गवतांवर बांधलेली
असावीत. इतकी हिरवीगार गावं आहेत तिकडची ! घरांना अगदी खेटून तिकडे हिरवाई नांदते.
अधूनमधून सोनेरी मोहरी दिसते, अगदी कुठेही... अगदी घरांच्या आजूबाजूलाही गावांमध्ये
मोठे रस्ते नाहीतच. हा आम्ही प्रवास करत असलेलाच काय तो बऱ्यापैकी मोठा रस्ता, नाहीतर
सगळ्या पायवाटाच... खोऱ्यात पाहिलं की अतिशय मोठ्या पात्राची सतलज आणि समोर सगळं हिरवं
हिरवं, उंचच उंच हिरवी झाडं नाहीतर हिरवी शेतं... गावातली लोकं अतिशय साधी, मूळची पंजाबी
असली तरी पंजाब्यांकडे असणारा तो ताठरपणा यांच्याकडे नाही. शहरीकरणापासून कित्येक कोस
दूर असणारे हे लोक आणि यांची साधी पण निसर्गाची विशेष कृपा असणारी खेडी, ही कोणालाही
आकर्षित करून घेतील.
हे ९० अंशात डोलकर करत आम्हाला
जिथे जेवणासाठी थांबायचं होतं ते मंडी आलं आणि अचानक हवामान बदललं. पावसाची चिन्हं
दिसायला लागली. आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा मनालीचं हवामान कसं आहे हे बघितलं
होतं आणि तेव्हा मनालीत पाऊस दाखवला होताच, त्यामुळे आम्ही थंडीप्रमाणेच पावसाच्या
तयारीनेही आलेलो होतोच. पावसाळ्यात आपल्या सह्याद्रीच्या घाटांमध्ये जसं वातावरण तयार
होतं अगदी तसंच वातावरण तिथे निर्माण झालं. मंडी हे एक पर्यटन स्थळच आहे. अगदी उंचावर
दुर्गम ठिकाणी इथे काही अतिशय सुंदर तळी आहेत. ही तळी खूप प्रसिद्ध आणि हिमाचलच्या
नावाला साजेसेच... इथे सिनेमांचं चित्रीकरणही होतं. पण इथे जायचं तर मे महिन्याशिवाय
पर्याय नाही कारण तिथली प्रचंड थंडी सोसवणारी नाही. इथे मोठ्या संख्येने प्राचीन अशी
मंदिरंही आहेत आणि त्या मंदिरांमध्ये लोकांना येणारे अनुभवही ऐकले आहेत. हिमाचल प्रदेशला
देवभूमी म्हणतात, त्यामुळे प्राचीन मंदिरांचा खजिना इथे बघायला मिळतो.
जेवणासाठी उतरलो आणि बारीक
पाऊस सुरु झाला. दुपारी सुद्धा अंधारून आलं. हे हिल स्टेशन वगैरे नंतर पण पावसाळ्यात
मस्त मजा करण्यासाठी असलेलं ठिकाण वाटायला लागलं. त्यामुळे, आता पुढचा डोलकर प्रवास
पावसात होणार हे नक्की होतं. इतकी जीवघेणी वळणं होती पण आमचा ड्रायव्हर गाडी अतिशय
सराईतपणे चालवत होता, त्यामुळे पुढच्या प्रवासाची काहीच काळजी नव्हती. कधीच न संपणारा
प्रवास असावा असा आमचा घाटातला प्रवास सुरु झाला. पण, आसपासचा निसर्ग सुंदर असल्याने
हा प्रवास सुखकर होता.
आता आमची साथ करणारी मैत्रीण
बदलली, सतलजची
जागा आता बियास या नदीने घेतली. या नवीन मैत्रिणीची सोबत तर मनालीत पण असणार होती.
या बियास नदीवर खूप मोठं पंडोह धरण बांधलंय, ते तिथून जाताना अगदी छान बघायला मिळालं आणि पुढे जात
जात आम्ही कुल्लू जिल्ह्यात येऊन पोहोचलो.
कुल्लूची दरी विशेष प्रेक्षणीय आणि तिच्या
कडेकडेनेच आमचा प्रवास सुरु होता. खाली बियास, समोर कुल्लू दरी आणि मस्त पावसाळी वातावरण.
आधीच ते थंड हवेचं ठिकाण आणि या पावसामुळे गारठा अजूनच वाढलेला... कुल्लूहून मनालीला
जाताना एक खूप मोठा बोगदा लागतो. जवळ जवळ आठ दहा मिनिटं हा बोगदा पार करायला लागतात.
देशातले लांब बोगदे या यादीत या बोगद्याचा समावेश केलेला आहे.
![]() | |
| कुल्लू व्हॅलीचं धावत्या गाडीतून घेतलेलं छायाचित्र |
हा बोगदा पार करून पुढे आलो.
बाजूच्या एका डोंगरावर एक देऊळ दिसलं. तिथपर्यंत जायला रस्ता नाही. होडीतून जायचं.
पण पुढे डोंगर चढण्यासाठी मात्र चांगली वाट बनवलेली होती. मी धार्मिक आहे म्हणून नाही
पण एक वेगळा अनुभव म्हणून तिकडे जायची इच्छा होती पण त्यावेळी ते शक्य नव्हतं, एक तर
वेळही नव्हता आणि तिकडे जाण्याची ती योग्य वेळही नव्हती. आम्हाला या पावसाळी हवेतून
मनाली गाठायचं होतं. मी आमच्या ड्रायव्हरला त्या देवळाबद्दल विचारलं. ते एक देवीचं
देऊळ होतं. तिचंच एक देऊळ मुख्य रस्त्यावरही आहे आणि, उलट त्या डोंगरावरच्या देवळापेक्षाही
हे रस्त्यावरचं देऊळ जास्त छान आहे असं त्याचं म्हणणं. रस्त्यावरच्या देवळासमोर त्याने
गाडी थांबवली, आम्ही गाडीतूनच देवीचं दर्शन घेतलं. मूर्ती फार सुंदर...
बियासवर छोटे छोटे पूल बांधले
आहेत. खाली जमिनीत कुठलाही आधार नाही असे हे पूल, हिमाचलमध्ये बऱ्याच ठिकाणी सहज दिसतात.
गावकऱ्यांना नदीला पार करता यावं म्हणून बांधलेले, कुठली गाडी वगैरे तिकडे त्या पुलांवर
जात नाही. कुल्लू मनाली रस्त्यावर हिमाचल सरकारच्या व्हॉल्वो बसही धावतात. या व्हॉल्वो
मूळ स्वरूपातल्या, अगदी खऱ्याखुऱ्या, बनावट नाही. मुंबई-पुणे शिवनेरी व्हॉल्वो आहे
पण ती व्हॉल्वो बनावट आहे, मूळची नाही. या व्हॉल्वो आम्हाला बऱ्याच दिसल्या, बाहेरून
तरी छानच वाटल्या आणि तिकीटही त्याचं फार जास्त नाही म्हणतात. आम्ही कुल्लूला काही
वेगळे येणार नव्हतो. कुल्लूची दरी बघण्यासारखी, आणि त्या दरीला पार करूनच आम्ही पुढे
जात होतो. वाटेत तिथला भुंतर विमानतळही दिसला, बियासवर चालणाऱ्या राफ्टींगच्या जागाही
दिसल्या. चित्तथरारक खेळांमध्ये रस असणाऱ्यांसाठी हे इथलं राफ्टींग खासच... प्रवासात
इकडची तिकडची माहिती सांगत, किस्से सांगत, आम्हीही त्याच्याशी आस्थेने गप्पा मारत इथपर्यंत
आलो होतो. त्यामुळे एक प्रकारचा जो अवघडलेपणा असतो तो आता त्याच्या बोलण्यात राहिलेला
नव्हता. दक्षिण भारतातली महाविद्यालयीन मुलं इथेच बियास नदीत वाहून गेली होती, बोलता
बोलता मी त्या दुर्घटनेचा उल्लेख केला आणि त्याने त्या दुर्घटनेच्या अगदी बारीक सारीक
गोष्टीही सांगितल्या, अगदी ती जागाही दाखवली आणि आता तिथे लागलेले सतर्कतेचे मोठमोठे
फलकही त्याने दाखवले.
कुल्लूला लोकं जातात ते तिथल्या
अतिशय प्रसिद्ध अशा शाली घेण्यासाठी. आता शालींचा आणि मुंबईकरांचा काय संबंध ! त्यामुळे
त्या दुकानांमध्ये जावं की नाही इथपासून प्रश्न होता. मुंबईत शालींचा काही उपयोग नाही
असं आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगितलं होतं आणि तरीही त्याने एका प्रसिद्ध अशा दुकानासमोर
गाडी थांबवली आणि लोकं कसे दूर दूरहून इथे येऊन बरंच सामान घेऊन जातात. इथला माल कसा
चांगला असतो, वगैरे वगैरे आम्हाला ऐकवायला लागला. ते दुकान खूप प्रसिद्ध आहे, त्या
दुकानाचं नाव मी ही ऐकलेलं होतं. त्यामुळे त्याचं ऐकून असं नाही पण एकंदर दुकान बघण्यासाठी
आम्ही गाडीतून उतरलो. कुल्लूच्या सुंदर शाली बघाव्यात असं कुठेतरी मनात वाटत होतंच
आणि त्यात तिथे पंजाबी ड्रेस मटेरियलही मिळत असल्याने त्या दुकानात अगदीच विंडो शॉपिंगसाठी
आत शिरावं लागेल असं वाटलं नाही. गाडीत बरंच उबदार होतं पण बाहेर पडल्यावर कळलं की
बाहेर चांगलाच गारठा आहे. एखादा गरम कपडा घालून सहन न होणारी थंडी आम्हाला पहिल्यांदाच
तिथे अनुभवायला मिळाली आणि मनाली तर अजून लांब होतं, अजून उंचावर...
दुकानात शिरलो. दुकान म्हणजे
भला मोठा हॉल आणि तो हॉल गिऱ्हाईकांनी तुडुंब भरलेला. सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे
भाव, जे हवंय ते अगदी हवं तसं मिळालं म्हणून आनंद, चला बाबा एकदाचं मिळालं म्हणून समाधान,
हवं तसं का मिळत नाहीये किंवा किंमत फार आहे म्हणून काळजी, वगैरे... पण यांचे चेहऱ्यावरचे
भाव निदान त्या गरम कपड्यांशी संबंधित तरी होते. ते कपडे त्या सगळ्या लोकांची गरज तरी
होती पण आम्हीच त्यात असे होतो की तिथे जे काही चाललं होतं, त्याचा आमच्याशी फारसा
काही संबंध नव्हता कारण गरम कपडे आम्हा मुंबईकरांच्या नशिबात कधी लिहिलेलेच नाहीत.
कधी कुठे असं थंड हवेच्या ठिकाणी गेलो किंवा चुकून माकून मुंबईतच या कपड्यांची गरज
भासलीच तर त्यासाठी लागणारे कपडे आमच्याकडे होतेच. पण कुल्लूच्या शाली बघण्यासाठी म्हणून
आम्ही त्या दुकानात शिरलो होतो. आपण कुल्लूमधूनच मनालीला गेलो. वाटेत दुकानंच्या दुकानं
होती, पण आपण दुकानात साधे जाऊनही आलो नाही म्हणून त्या दुकानाच्या आत शिरलो. त्या
दुकानाच्या आसपास अगणित दुकानं आहेत. या कुल्लू शाली आणि तिथे मिळणारे सर्व प्रकारचे
गरम कपडे इतरही दुकानात मिळतात पण गंमत अशी की इतर कुठल्याही दुकानात साधं चिटपाखरूही
आम्हाला दिसलं नाही आणि या एवढ्या एका मोठ्या दुकानात मात्र पाय ठेवायला जागा नाही,
एवढी गर्दी...
आत शिरलो तर उजव्या बाजूला
दुलईंचा एक मोठा ढीग ठेवलेला होता. विमानात जेवढे किलो समान नेऊन चालतं त्यापेक्षा
आमचं समान जास्त झालेलं होतं आणि आता त्यात ही दुलई कशी नेणार ! आणि त्यात परत तेच
थंडीसाठीची दुलई मुंबईत ! पण डोळ्यांनीच मुलायम जाणवणाऱ्या त्या दुलयांना हात लावल्याशिवाय
राहवलंही नाही. हात लावला, तर काय तो मऊसरपणा ! टेडी बेअरला किंवा सशाला हात लावला
तर कसं वाटेल तशी ती दुलई... एक नाही दोन नाही अनेक प्रकारच्या दुलया आणि त्याप्रमाणेच
त्यांच्या किमती... मऊसरपणा कमी झाला की किंमतही कमी... त्या दुलायांना तिथेच ठेवून
जड अंतःकरणाने आम्ही पुढे जाऊ लागलो तर तिथला माणूस आम्हाला त्या घेण्यासाठी गळ घालू
लागला. इच्छा नसूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आम्ही पुढे गेलो. पुढे खूप मोठ्या भागात
शाली विकायला होत्या, अर्धी शाल, पूर्ण शाल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाली आणि त्या
घेण्यासाठी आलेले असंख्य लोक, आणि त्यांच्या पुढ्यात एकापेक्षा एक मनमोहक अशा अगणित
शाली... तिथे आलेल्या बायका, मुली अगदी छान शाली गुंडाळून आल्या होत्या. सगळी गर्दी
उत्तरेकडच्या भागाचीच... ते एकंदर सगळं पाहिलं आणि मला मनाला फार फार वाईट वाटायला
लागलं. एवढं सगळं दिसत आहे पण आपण यातलं काहीच घेऊ शकत नाही. इथे पंजाबी ड्रेस मटेरीअल्सही
मिळतात असं माहीत होतं. म्हणून विचार केला की तडक तिकडेच जावं. तिथल्याच एका विक्रेत्या
मुलीला आम्ही ही मटेरीअल्स कुठे मिळतील याबद्दल विचारलं. अतिशय शुभ्र रंगाची, खूप गोड
चेहऱ्याची मुलगी. अस्सल हिमाचली किंवा पहाडी सौंदर्य. तिथले हे ड्रेस मटेरीअल्सही खास
तिकडच्या कलाकुसरीचे. आम्हाला अगदी मनापासून आवडले आणि मनालीला पोहोचण्याआधीच आमची
पहिली खरेदीही झाली. परत एकदा लक्ष तिकडच्या सुंदर कलाकुसर केलेल्या शालींकडे गेलं
आणि तेव्हाच तिने आम्हाला शालींबद्दल विचारलं. हे तिने आम्हाला दुसऱ्यांदा विचारलं
होतं. तिला परत तेच उत्तर दिलं की आम्ही मुंबईहून आलोय आणि मुंबईला थंडी पडत नाही.
मी कुठल्या हिब्रू भाषेत बोलत आहे आणि तिला काहीच कळत नाहीये असा चेहरा तिने परत दुसऱ्यांदाही
केला. थंडीच नाही हा प्रकार काय असतो, हे कायम थंडीतच जगणाऱ्या तिकडच्या लोकांना समजण्यापलीकडचं
आहे.
आपण जर हात लावला तर त्या
दुलईवर एखादा ओरखडा उमटेल की काय असं वाटावं एवढी मऊसर असणारी दुलई आमच्या डोक्यातून
काही जात नव्हती. विमानातून हे एवढं नेणार कसं हा प्रश्न बाजूला ठेवत, आपण सारखं सारखं
कुल्लूला येत नाही असा विचार करून आम्ही एक भलीमोठी दुलईही विकत घेतली. थंडी नाही गारवा
तर असतोच ना मुंबईत... मग ! परत लगेच त्या मुलीचा तोच प्रश्न, शाली नाही पहायच्या
? आणि माझं परत तेच उत्तर आणि तिचे परत हिब्रू भाषेतलं अगम्य काहीतरी ऐकलंय असे भाव...
हा एकच प्रश्न तिने आम्हाला कितीतरी वेळा विचारला व मी ही तिला तितक्याच वेळेला तेच
उत्तर दिलं आणि त्यानंतर तिने प्रत्येक वेळी तेच अगम्य चेहऱ्यावर तिच्या दाखवले. तिथली
लोकं सरळ साधी आणि गोड आहेत, खुनशी किंवा स्वतः कोणी मोठे आहोत असा भाव नाही. त्यामुळे
तिने किंवा त्या दुकानात विचारलेल्या अशा प्रकारच्या कुठल्याही प्रश्नाचा राग वगैरे
आला नाही. स्वेटर्सचा मोह आम्हाला तिकडे काही झाला नाही पण शालींचा मोह काही आवरत नव्हता
आणि कधी मिरवण्यासाठी म्हणून बारीक नाजूक कशिदा केलेली एक शालही आम्ही घेतलीच. कोण
जातं सारखं सारखं तिकडे आणि एक आठवण असते ना तिकडची...
आणि आम्ही भली मोठी खरेदी
करून त्या दुकानातून बाहेर पडलो... विमानातून कसं न्यायचं, वगैरे वगैरे प्रश्न तेव्हा
बाजूला ठेवले. आमची खरेदी बघून इथे लोकं कसं भरपूर समान नेतात याची टेप परत एकदा ड्रायव्हरने
सुरु केली. संध्याकाळ, त्यामुळे झालेला अंधार, चांगलीच थंडी... आणि आम्हाला अजून चढण
चढून मनालीला जायचं होतं. रस्त्यांवर अगदीच तुरळक गर्दी आणि आम्हाला अजून साधारण अडीच
तासांचा प्रवास करून जायचं होतं. आता आम्ही आमच्या गंतव्य स्थानी जाण्यासाठी निघालो.
आम्ही केव्हाचे सकाळची न्याहारी करून चंदीगडहून निघालो होतो, रात्र व्हायला लागली तरी
आमचा प्रवास काही संपत नव्हता... बस्स ते हिमाचल असल्याने प्रवास सुखकारक होत होता,
एवढंच... बारीक पाऊस तर सुरुच होता... आणि शेवटी ज्यासाठी हा जवळ जवळ ११ तासांचा प्रवास
केला ते मनाली काय ते एकदाचं आलं..
फार रात्र झालेली नव्हती,
संध्याकाळच होती पण तरीही मनाली मात्र शांत निपचित पडून होतं. इकडे हे घेऊ नका तिकडे
ते घेऊ नका, तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं आमचं काम आहे,
वगैरे वगैरे... आमच्या ड्रायव्हरचं आम्हाला सांगणं सुरु झालं. अचानक बाहेर वाहनांवर
आम्हाला बर्फ दिसायला लागला. चार चाकी गाड्यांवर बर्फच बर्फ, त्या बर्फाने अगदी माखलेल्या.
ते पाहून ड्रायव्हर म्हणतो, डोंगराच्या खालच्या भागात पाऊस झाला, आणि इथे बर्फ... मी
म्हणालो होतो ना इथल्या हवामानाचं काहीही सांगू शकत नाही... पण मला तो बर्फ काहीतरी
वेगळा वाटला. मी त्याला म्हणाले, नाही हो इथे बर्फवृष्टी झालीय असं वाटत नाहीये. पण
त्याचं मला तो बर्फ दाखवत परत तेच...
आम्ही अगदी असहनीय अशा अतिशय
कडाक्याच्या थंडीत आमच्या हॉटेलच्या बाहेर गाडीतून उतरलो. एक जर्किन असं कितीसं रक्षण
करणार थंडीपासून ! भराभरा आत हॉटेलमध्ये शिरलो. सागर, माझा नवरा स्वागत कक्षाच्या इथे
हॉटेलच्या खोलीचा ताबा घेत होता आणि मी तिथेच उभी होते. मला अचानक जाणवलं की माझं नाक
आतून घट्ट झालंय. आपलं नाक आतून अगदी थोडंसं ओलसर असतं आणि तिथे तापमान इतकं कमी होतं
की तो नाकातला ओलसर भागही एकदम घट्ट झाला होता, आणि तेव्हा मला रस्त्यावर दिसलेल्या
बर्फाचं रहस्य समजलं. पावसाचं रस्त्यांवर साचलेलं, गाड्यांवर जमलेलं पाणी गोठलेलं होतं
आणि तसाही आम्ही गेलो होतो तो काळ बर्फवृष्टीचा नव्हताच. हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या
खूप उबदार वाटलं. हॉटेल पूर्ण लाकडी, तिथेच समोर शेकोटीही पेटवलेली होती.
सकाळी लवकर चंदीगडचं हॉटेल
सोडल्यावर सुरु झालेला प्रवास मनाली हॉटेलच्या खोलीत शिरल्यावर संपला. खोलीच्या खिडकीतून
समोरच्या डोंगरावर बर्फ दिसत होता. जेव्हा खालच्या भागात पाऊस पडला तेव्हा मनालीच्या
वरच्या भागात बर्फवृष्टी झाली होती आणि त्या डोंगरावरची उंचच उंच अशी देवदारची झाडं
या बर्फाने पूर्ण माखून गेली होती. हॉटेलमध्ये छानसं उपहारगृह असल्याने आम्ही जेवायला
तिथेच गेलो. काचेचा दरवाजा घट्ट बंद होईल असा दरवाजा होता त्या उपहारगृहाला आणि आत
सगळ्या प्रकारच्या ऋतूत चालेल अशा वातानुकुलीत यंत्रणेतला हीटर चालू होता. पिण्यासाठी
तिथे कोमट पाणी देत होते. याचा विरोधाभास आपल्या इथे बघायला मिळतो, वातानुकुलीत यंत्रणा
हवा थंड करत असते आणि प्यायला थंडगार पाणी दिलं जातं. मनालीला आल्या आल्या दिसलेला
हा असा टोकाचा बदल बघून गंमत वाटली.
या उपहारगृहात आम्हाला जेवायला
खायला अगदी रुचकर पदार्थ मिळाले. आम्ही मसुरीला होतो आणि आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच्या
उपहारगृहाच्या बाहेर दाक्षिणात्य पदार्थ मिळतील असा फलक लावलेला होता. आम्ही त्या पहाडी
भागात आपलं नेहमीचं काहीतरी खायला मिळेल म्हणून अगदी आशेने त्या उपहारगृहात गेलो आणि
तिथले पदार्थ बघूनच फार वैतागलो होतो. चव तर भयंकरच... हे पदार्थ या उत्तरेकडच्या लोकांना
फारसे चांगले जमत नाहीत, हा निदान माझा तरी अनुभव पण या मनालीच्या हॉटेलमध्ये आम्हाला
अगदी चविष्ट दाक्षिणात्य पदार्थही मिळाले. एवढंच काय तिथे मराठी पदार्थही आपली जागा
पदार्थांच्या यादीत राखून होते. त्या यादीत पिठलं भाकरी हा पदार्थ महाराष्ट्रापासून
इतक्या दूर बसून वाचताना डोळ्यांना आणि मनाला जे काही सुख वाटलं ते खासच.
जेवण झाल्यावर ड्रायव्हरला
फोन केला. त्याची राहण्याची कशी काय सोय झालीय, याची चौकशी करायला... त्याचे सगळीकडे
ओळखीचे हॉटेलवाले आहेत आणि त्यांच्याकडे हा राहतो असं तो आम्हाला म्हणाला होता. फोनवर
म्हणाला की मला ताप भरलाय, उद्या आपण आरामात निघू आणि उद्या मनाली स्थानिक भागच फिरू.
चंदीगडपासून त्याला खोकताना पाहिलं होतं आणि शेवटी मनालीला त्याला ताप भरला. आजचा एवढा
मोठा प्रवास झाल्यावर दुसऱ्या दिवशी तसंही आरामातच हॉटेलमधून बाहेर पडणं योग्य होतं.

ताई..मी जाणार आता कुल्लू मनाली ला..अशी ही खुप इच्छा आहे माझी..!!
ReplyDeleteअरे जा ना रोहित, खूप छान भाग आहे तो
Deleteलवकर ठरवून टाक
व्वा...वाचताना प्रत्यक्ष आम्हीच हे पहात,अनुभवत असल्याची अनुभूती येतेय.मस्तच...
ReplyDeleteखूप खूप आभार 🙏
Deleteअप्रतिम लिहीत आहात !! मनाली, कुल्लु खूप अगोदर गेले आहे मी. तुमचं प्रवासवर्णन वाचून परत जायची जबरदस्त इच्छा झाली..👍👍
ReplyDeleteजा परत
Deleteतो भागच मस्त आहे
मी पण दुसऱ्यांदा गेले होते. सिमला पण आहे यात.